चिंचवडगाव येथे २८ नोव्हेंबर रोजी ‘रमेश पतंगे साहित्य संगिती’ समारोह
मावळ मराठा न्यूज ,पिंपरी (प्रदीप गांधलीकर)दिनांक : २५ नोव्हेंबर २०२२ ज्येष्ठ साहित्यिक रमेश पतंगे यांच्या साहित्यकर्तृत्वाला वंदन करण्यासाठी क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालित पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, चिंचवडगाव येथे सोमवार आणि मंगळवार, दिनांक २८ आणि २९ नोव्हेंबर २०२२ रोजी दोन दिवसीय ‘रमेश पतंगे साहित्य संगिती’ या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, दिनांक २८ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ठीक दहा वाजता ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांच्या हस्ते आणि पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात येईल.
त्यानंतर ‘महामानव डॉ. आंबेडकर : समरसतेचा परिपोष’ , ‘स्थानिक समस्यांचे जागतिक आकलन’ , ‘आत्मकथनाऐवजी’ या तीन परिसंवादांचे अध्यक्षस्थान अनुक्रमे डॉ. प्रसन्न पाटील, सुनील भंडगे, संजय तांबट भूषवतील. त्या अंतर्गत ममता सोनवणे, आसाराम कसबे, प्रा. डॉ. धनंजय भिसे, अमोल दामले, प्रा. पूनम गुजर, रमेश वाकनीस, सतीश अवचार, सुनीता सलगर, मंगला सपकाळे हे वेगवेगळ्या विषयांवर आपले विचार मांडतील. दरम्यानच्या काळात रवींद्र गोळे हे रमेश पतंगे यांची प्रदीर्घ मुलाखत घेऊन त्यांच्याशी मुक्तसंवाद साधणार आहेत.
मंगळवार, दिनांक २९ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी नऊ वाजेपासून ते दुपारी चार वाजेपर्यंत ‘भारतीय संविधान : आपली दृष्टी’ , ‘संस्कृती संस्कारांचा वारसा’ , ‘तथागतांचे विचार’ या तीन परिसंवादांच्या माध्यमातून आणि अनुक्रमे विभावरी बिडवे, नरेंद्र पेंडसे, उज्ज्वला हातागळे यांच्या अध्यक्षतेखाली सुनंदा भगत, प्रशांत यादव, प्रा. दिगंबर ढोकले, श्रीकांत चौगुले, रूपाली कालेकर, स्मिता जोशी, मारुती वाघमारे, रूपाली भुसारी,
ॲड. सतीश गोरडे विविध विषयांवर आपले विचार व्यक्त करतील. दरम्यानच्या काळात पुस्तक प्रकाशन करण्यात येईल. रमेश पतंगे साहित्य संगिती सोहळ्याचा समारोप ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. सदानंद मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून विनाशुल्क असलेल्या या सोहळ्याचा सर्व नागरिकांनी आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी केले आहे.