शिवम काशिद नावाच्या मुलाचा मृतदेह एकोले व्हॅली मधून बाहेर काढण्यास शिवदुर्ग टीम ला अखेर यश




मावळ मराठा न्यूज :-एकोले व्हॅली अपघात दिनांक ०३/०६/२०२४ दुपारी पौड पोलीस स्टेशनचा फोन आला की शिवम काशिद नावाच्या मुलगा एकोले व्हॅली येथे मिसींग आहे. दोन मित्रांच्या बरोबर हा एकोले व्हॅली येथे फिरायला आला होता. रिल्स बघून आम्ही इकडे आलो असे त्याच्या मित्रांनी सांगितले. हे झाले की मिल्की बार धबधबा पुढच्या आठवड्यात बघायला जाणार होते. नवीन नवीन रिल्स बघून ही तरुणाई आकर्षीत होत आहेत व स्वतःचे आयुष्य संपवीत आहेत. रिल्स मध्ये सुरवातीला काही पायऱ्या दाखवतात व नंतर डायरेक्ट धबधबा दाखवला जातो. मध्ये जे एक दिड तास खडतर अंतर ते दाखवत नाही. या कुंडातील पोहण्याचे व्हिडिओ रिल्सच्या माध्यमातून प्रसारित करतात. पण प्रत्यक्षात या सर्व कुंडातील पाणी इतके दुषीत झालेले आहे की पाण्याला दुर्गंधी येत आहे. व रंग गडद हिरवा झालेला आहे. अशा ठिकाणी कोणी पोहायला उतरु नये . शेवाळा मुळे वर येणे सुध्दा अवघड आहे व जिवावर बेतू शकते . समजलेल्या माहिती नुसार साहित्य घेतले आदल्या दिवशीचा थकवा जाणवत होता टिम मध्ये थोडा बदल करून निघालो. साडे पाच वाजता एकोले व्हॅली कडे जाताना रोडवर एक छोटे हनुमान मंदिर लागते तिथे पोचलो. तीथे या मिसींग असलेल्या मुलाचा एक मित्र थांबला होता. त्यानेच सगळ्यांना निरोप दिले होते. अंधार पडायच्या आत जागेवर पोचायला पाहिजे म्हणून लगेच सर्व साहित्य घेऊन निघालो. या मित्राने जी माहिती सांगीतली होती त्यावरून तो हातपाय धुवायला कुंडाजवळ गेला व तो गायब झाला त्यामुळे पाण्यात पडून बुडाला असावा असा अंदाज होता. इतर कुठेही जाण्याची जागा नव्हती किंवा दरीत पडण्याची शक्यता दिसत नव्हती. मुख्य रस्ता सोडून आत गेल्यावर काही टू व्हीलरचे जळालेल्या अवस्थेतील सांगाडे दिसले . काही दिवसांपूर्वी तो अपघात झालेला होता. मग डाव्या बाजूला कडा ठेवून खाली उतरणाऱ्या पायऱ्या लागल्या . आताच बनवलेल्या असतील जास्त प्राचीन वैगरे नाही. पॉईंटवर जाण्यासाठी सोय आहे. पायऱ्या संपल्यानंतर पाण्याची दरीकडे जाणारी दोन डोंगरांच्या मधील घळई आहे. पावसाळ्यात पाणी जमा होऊन याच वाटेने वेगाने फेसाळत खाली जात असावे. व त्यामुळे दोन्ही बाजूला कातळ गुळगुळीत झालेले आहेत. पाणी गोल गोल फिरत रांजण खळगे तयार झालेले आहेत. एका बाजूने कडेकडेने चालत दगडगोट्यातून सर्व टिम पुढे पुढे चाललो होतो सर्व अडथळे दिसत होते.शेवटच्या कुंडात जाण्यासाठी दोन वेळा दोरीच्या साहाय्याने खाली उतरून जावे लागत होते. आता सहज जाऊ पण परत येताना मृतदेह घेऊन चालता येईल का असा प्रश्न पण पडत होता. मृतदेह उचलून आणायला मॅन पावर लागते आम्ही टिममध्ये ९ जण होतो पौंड पोलीस स्टेशनचे दोन कर्मचारी बरोबर होते. व पुणे व वडगाव चे काही लोक बरोबर होते. वडगावची मुले सुद्धा या रोडवर फिरायला आलेली होती व रस्त्यावर थांबून काही तरी चर्चा करीत होती आम्ही लोकेशन विचारायला तिथे थांबलो तर ते सुद्धा बरोबर आले . व मिसिंग मुलांचा मित्र मदतीसाठी नंबर शोधाशोध करीत होता त्यावेळी पुण़्याच्या ग्रुपला बातमी समजली व ते सुद्धा थांबले व मदतीला आले. खडतर वाट दगड गोटे पायाखाली घालून मार्गक्रमण करीत होतो. थोड्या वेळापूर्वी पावसाने दगड गोटे ओले झाले होते व चिकट असतील की काय म्हणून प्रत्येक पाऊल जपून टाकत होतो. कुंडांची माळच या ठिकाणी दिसते काही गोलाकार काही लांबलचक व खाली काळे झालेले पाणी सुध्दा होते . शेवटच्या टप्प्यात गेल्यावर हे कुंड दिसले पण तिथे जाण्यासाठी दोन वेळा दोरी धरुन धरुन जावे लागत होते. या मार्गाने येताना याचा तिसरा मित्र सुध्दा भेटला त्याला स्पॉट दाखवण्यासाठी बरोबर घेतले होते. त्याने पाण्यात पडलेला आवाज ऐकला होता व पाण्यातून बुडबुडे पण पाहिले होते. योगायोग दोघे जर जवळ असते किंवा त्यांनी वाचवण्यासाठी पाण्यात उतरले असते तर त्यांनाही जीव गमवावे लागले असते . माहिती घेऊन काम चालू झाले आकाश मोरे पाण्यात उतरताना घसरला व आजूबाजूला खुप शेवाळ येऊन चिकट झाले म्हणून सर्वांना सावव केले.अजय शेलार, सुध्दा पाण्यात उतरला होता.महेश भाऊ मसने गळ टाकून शोधायला लागले व दुसऱ्याच प्रयत्नाला मृतदेह सापडला. तरुण मुलांचे जीव जातात बघून हाळहळ वाटली व अंधारात काम करायला अवघड जाणार म्हणून घाई करायला लागलो. मृतदेह बाहेर काढून स्केड च्या स्ट्रेचर वर पॅक केला . पहिल्या टप्प्यातील काम थोडे अवघड होते. एका कुंडातुन मृतदेह बाहेर घेतला व स्ट्रेचरला एक बाजूने मोठी दोरी बांधून घेतली दुसऱ्या बाजूला सुध्दा दहा फुटाचा रोप लावून घेतली.मोठी दोरी वर दिली व स्ट्रेचरला दुसऱ्या कुंडात सोडलै वरुन दोर ओढून घेतला परत काही अंतर दगडगोटे ओढाताण नंतर परत लांब लचक घळई होती पाणी पण होतेच लांब दोरी वर देऊन स्ट्रेचर पाण्यातुनच पुढे पुढे घेतले व तेच सोईस्कर होते. निट पाऊल ठेवायला जागा नाही अशा ठिकाणी स्ट्रेचर घेऊन चालणे अवघडच होतं. काही वेळाने परत मोठे दोन कुंड आली ती एकमेकांना पाण्यात जोडलेली होती तिथेही पाण्यातुन स्ट्रेचर पुढे काढला आता आयडिया आली होती व काम सोपे झाले होते. स्टेचर घासून घासून एक दोन ठिकाणी फाटले सुध्दा. पण आता मदत करायची तर विचार करायचा नाही अडथळ्यांची शर्यत पुर्ण करुन मग पायऱ्या आल्या व त्यावरुन सुध्दा स्ट्रेचर हळूहळू ओढून वर घेतले व मृतदेह पोलीस प्रशासनाच्या ताब्यात दिला. रात्री साडे अकरा वाजले होते. आवराआवर करून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. एक वाजता सर्व टिम सुखरूप घरी पोचली.शिवदुर्ग मित्र लोणावळा, वन्यजीव रक्षक संस्था, तैलबैल पोलीस पाटील, पौंड पोलीस स्टेशन कर्मचारी व वडगाव व पुणे येथील पर्यटन या सर्वांची खुप मदत झाली.या टीम मध्ये सुनिल गायकवाड, महेश मसने, कुणाल कडु, योगेश दळवी,आनंद गावडे, आकाश मोरे,सागर कुंभार,अजय शेलार,सागर दळवी यांनी आपला सहभाग नोंदवला.