तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत महायुतीचा झेंडा; चार उमेदवार बिनविरोध विजयी

मावळ मराठा न्युज -तळेगाव दाभाडे :(श्रावणी कामत)तळेगाव दाभाडे नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीने आपली दमदार ताकद दाखवत चारही जागा बिनविरोध जिंकल्या असून निवडणूक प्रक्रियेत हा महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. प्रभाग क्रमांक १३ मधील दीपक निवृत्ती भेगडे व शोभा सुनील परदेशी, प्रभाग क्रमांक ९ मधील हेमलता चंद्रभान खळदे तर प्रभाग क्रमांक १ मधील निखिल उल्हास भगत हे महायुतीकडून बिनविरोध निवडून आले आहेत. कोणत्याही उमेदवाराने त्यांच्याविरोधात उमेदवारी कायम न ठेवता या चौघांच्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली.






बिनविरोध निवडीची माहिती समोर येताच महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, पेढे वाटून व घोषणाबाजी करत चारही उमेदवारांचे जल्लोषात स्वागत केले. परिसरात सणासुदीची आणि उत्साहाची भावना पाहायला मिळाली. विजयी उमेदवारांनी सर्वप्रथम गावाच्या ग्रामदेवतेचे दर्शन घेत आशीर्वाद मिळवला. श्री डोळसनाथ महाराजांच्या मंदिरात चौघांनीही उपस्थित राहून आगामी कार्यकाळासाठी मार्गदर्शन व बळ मिळावे अशी प्रार्थना केली. याप्रसंगी आमदार सुनील शेळके व माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे यांनी चारही विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. महायुतीने एकत्रितपणे दिलेल्या लढतीचे हे यश असून आगामी काळात नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी दृढनिश्चयाने काम करावे, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील या बिनविरोध निवडीमुळे स्थानिक राजकीय वातावरणात उत्साह निर्माण झाला असून पुढील निवडणूक प्रक्रियेतही महायुतीची भूमिका अधिक बळकट झाल्याचे चित्र आहे.या बिनविरोध विजयामुळे संबंधित प्रभागांमध्ये विकासाच्या कामांना गती मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल चारही विजयी उमेदवारांनी कृतज्ञता व्यक्त करत पुढील काळात प्रभागांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्याचा संकल्प केला. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील या घडामोडींमुळे स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकीय समीकरणांना नवीन दिशा मिळण्याची चिन्हे आता स्पष्ट दिसत आहेत.



