एक ऋषीतुल्य मराठी उद्योगपती कैलासवासी दादासाहेब आर. के. पाटील
मावळ मराठा न्यूज , अमळनेर:-भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळात महाराष्ट्रातील अमळनेर ही उद्योग नगरी म्हणून सुप्रसिद्ध होती परमपूज्य संत सखाराम महाराजांची संतभूमी परमपूज्य साने गुरुजींची कर्मभूमी आणि श्रीमंत प्रतापशेठजी यांची उद्योग मिळून प्रसिद्ध होती. नगरशेठ कै. भिकाजी रामचंद्रशेठ भांडारकर आणि बंधूंच्या अनेक जिनिंग प्रेसिंग ऑइल मिल्स होत्या त्यामुळे हजारो अंमळनेरकरांना या ठिकाणी हमखास रोजगार मिळत असे, त्यात सन १९४५ साली दोन मोठ्या उद्योगांची भर पडली. त्यात प्रामुख्याने पै. हाशमशेठ प्रेमजी यांची विप्रो कंपनी व कै. दादासाहेब आर के पाटील यांची पटेल जर्दा यांचा समावेश होता.
आज विप्रो कंपनीची यशोपथा ही भारतातच नव्हे तर परदेशातही मोठ्या दिमाखात फडकत आहे. त्यामुळेच आम्ही मोठ्या अभिमानाने सांगतो की विप्रोची मातृसंस्था अमळनेर आहे. विप्रो कंपनी ही अमळनेर शहराचा श्वास आहे सन १९४५ हे वर्ष अमळनेरकरांसाठी खूपच भाग्याचे होते. २० जून १९४५ रोजी प्रताप कॉलेजची स्थापना, २७ नोव्हेंबर १९४५ रोजी गायछाप पटेल जर्दाची मुहूर्तमेढ, २९ डिसेंबर १९४५ रोजी सुप्रसिद्ध विप्रो कंपनीची मोठ्या दिमाखात सुरुवात. हाशमशेठ प्रेमजी यांच्या आदरणीय पिताश्रींचा २९ डिसेंबर वाढदिवस असल्यामुळेच त्या शुभ दिनी जगप्रसिद्ध विप्रोची अंमळनेर येथे स्थापना झाली. त्याची पुनरावृत्ती आर के दादांच्या वेळेस झाली. २७ नोव्हेंबर १९४५ हा दादांचा १९ वा वाढदिवस आणि त्याच दिवशी गाय छाप पटेल जर्दा या उद्योग समूहाची आर के दादांनी आपले पिताश्री कै. काळूबाबा पाटील व मातोश्री दुधाबाई पाटील यांच्या आशीर्वादाने तसेच लहान बंधू नारायणराव पाटील, साहेबराव पाटील यांच्या सहकार्याने सुरू केली. प्रताप मिलची स्थापना १९०६ सालची. त्यावेळेस प्रताप मिलमध्ये काम करण्यासाठी संयुक्त खानदेश जळगाव धुळे नाशिक तसेच पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर, सातारा, सोलापूर येथील हजारो कामगार रोजगारासाठी अमळनेर येथे आलेले होते. त्यामुळे त्यावेळी अमळनेर नगरीत २५ ते ३० हजार कामगारांना रोजगार देण्याची क्षमता होती. जळगाव व धुळे हे जिल्हे असून देखील त्यावेळी अमळनेरची बाजारपेठ मोठी होती. त्यामुळे राजकीय सामाजिक आर्थिक समीक्षक हे अमळनेर नगरीला मिनी मुंबई असे म्हणत. त्यामुळेच अमळनेर करांची खऱ्या अर्थाने छाती ५६ इंची होत असे आता तर वेगळी राजकारणी ५६ इंची छातीचा तथाकथित गवगवा करतात.
एक ऋषीतुल्य मराठी उद्योगपती कैलासवासी दादासाहेब आर के पाटील यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९२६ रोजी काळुबाबा व दोधाबाईंच्या पोटी झाला. दादांचे जेमतेम शिक्षण चौथीपर्यंत झाले. घरच्या शेतीमुळे त्यांना पुढील शिक्षण घेता आले नाही दादांचा रहिवास आमच्याच गल्लीत आम्ही देशमुख वाड्यात राहत असु. आणि देशमुख वाड्यालाच लागून बोरसे गल्ली होती देशमुख वाड्यात वतनदार देशमुखांची घरे वाडे होते. आणि बोरसे गल्लीत शेतकरी शेतमजूर राहत असत दादांचे कुळ बोरसे असल्यामुळेच बोरसेंची भाऊबंदकी मोठ्या प्रमाणावर बोरसे गल्लीत राहत होती. तसेच बोरसे व्यतिरिक्त कुणबी पाटील समाज धनगर समाजाचेही मोठ्या प्रमाणावर वास्तव्य होते ऐतिहासिक दगडी दरवाजा पासून ते भोई कोतवाल चौकापर्यंत बोरसे गल्ली होती. माझे आजोबा रामजी बाबा आणि काळू बाबा जीवलग मित्र तसेच माझी आजी पार्वतीबाई आणि दोधाबाई यांच्या मानलेल्या बहिणी.
माझे वडील पत्रकार माधवराव सुतार आणि आर के दादांची निस्वार्थ मैत्री त्याचप्रमाणे आत्ताच्या पिढीत मी राजेंद्र सुतार आणि दादांचे द्वितीय सुपुत्र उद्योगपती विनोदभैय्या पाटील आम्ही शालेय जीवनापासून बी.कॉम पर्यंत वर्गमित्र आहोत. आजही आम्ही ती मैत्री निस्वार्थपणे पुढे चालवीत आहोत. आर के दादांचा आणि माझा वाढदिवस एकाच दिवशी येतो. दादांच्या फॅक्टरीत अनेक वर्ष दादांच्या वाढदिवसासोबत माझाही वाढदिवस साजरा होत असे. दादांच्या वाढदिवशी आदरणीय दादांच्या शुभहस्ते माझेही अभिष्टचिंतन होत असे त्यामुळे मी पुरता भारावून जात असे. ही परंपरा दादांच्या एका जुनी सहकारी मित्र ख्यातनाम कर सल्लागार कै. दादासाहेब जी.एम.सोनार व पटेल जर्दा फॅक्टरीची लेबर ऑफिसर कै.अब्बासभाई बोहरी यांनी सुरू केली होती.
कैलासवासी दादासाहेब आर के पाटील हे चौफेर व्यक्तिमत्त्वाचे असामान्य व्यक्तिमत्व होते. सुरुवातीचे तीन-चार वर्ष दादांनी तंबाखू व्यवसायाची परिपूर्ण माहिती घेण्यासाठी तंबाखूचे व्यापारी कालिदासभाई पटेल विनूभाई पटेल यांच्याकडे नोकरी केली. त्यानंतर मे.आर के पटेल टोबॅको प्रोसेसर्स अँड मॅन्युफॅक्चरर्स या कंपनीची स्थापना करून गायछाप पटेल जर्दा निर्मिती केली. पहिली फॅक्टरी अंमळनेरला व दुसरी फॅक्टरी गुजरातच्या धर्माज येथे सुरू केली त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा बांधकाम व्यवसायाकडे वळविला. आपल्या नियोजित जागेत आर.के कन्स्ट्रक्शन कंपनीची स्थापना करून सर्वसामान्यकरांसाठी किफायतशीर किमतीत घरी उपलब्ध करून दिली. तंबाखूच्या व्यवसायात त्यांना त्यांचे बंधू नारायणराव पाटील व साहेबराव पाटील यांनी तुला मोलाची साथ दिली या तिघाही बंधूंनी प्रचंड मेहनतीने हे साम्राज्य उभे केले. आर. के दादा हे अमळनेरच्या उद्योग वसाहतीचे संस्थापक चेअरमन होते. अंमळनेर शहरापासून पाच किलोमीटरवर मंगरूळ येथे त्यांनी भव्य दिव्य अशी औद्योगिक वसाहत उभी केली. अनेक उद्योजकांना चालना देऊन शेकडो कामगारांना रोजगार मिळवून दिला व स्वतःची रवा, आटा, मैदाची पाच मजली मे. आर के फूड प्रॉडक्ट्स लिमिटेड ही फॅक्टरी मोठ्या जोमाने सुरू केली. त्याचप्रमाणे कपडे धुण्यासाठी आदर्श डिटर्जंट पावडर व तंबाखू सोबत अशोक चुना ही नवीन उद्योग दालने सुरू केली. तसेच धुळे रोडवर इंडियन ऑइल कंपनीचा आर के पटेल पेट्रोल पंप मोठ्या दिमाखात उभा केला आजही त्या पेट्रोल पंपावर तोच प्रामाणिकपणा व बेस्ट क्वालिटी ग्राहकांना मिळत आहे. व्यवसाय सांभाळून दादांनी शैक्षणिक सामाजिक बँकिंग क्षेत्र ही गाजविले आहेत अर्बन बँकेत अनेक वर्ष संचालक, खानदेश शिक्षण मंडळात अनेक वर्ष संचालक, लोकमान्य शिक्षण मंडळात अनेक वर्ष उपाध्यक्ष राहिलेले आहेत. अमळनेर सन १९७४ साली लोकनियुक्त नगराध्यक्षपदाची पहिलीच निवडणूक झाली होती. त्या निवडणुकीत दादा स्वतः नगराध्यक्ष पदासाठी उभे होते. दादा हे स्वतः कट्टर काँग्रेसचे होते परंतु त्या निवडणुकीत अनेक काँग्रेस उमेदवार अपक्ष उभा राहिल्याने दादांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यावेळी जनसंघाचे उमेदवार विजयी झालेले होते. त्याच कालावधीत विप्रोची नवीन येणारे प्रोजेक्ट अमळनेर बाहेर गेले. आणि अमळनेर तालुका अक्षरशः आर्थिकदृष्ट्या पन्नास वर्षे मागे आला. जर त्या निवडणुकीत दादा विजयी झाले असते तर विप्रोचे दोन प्रोजेक्ट बाहेर गेलेच नसते आणि अमळनेरचे नाव जगाच्या नकाशावर आले असते.
आर के दादा स्वतः निसिम गणेश भक्त होते २५ वर्षे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करून त्याचे रूपांतर आर के नगर येथील गणेश मंदिरात झाले. दादांचे गणेशोत्सवाचे नेत्र दीपक देखावे, सुबक गणेश मूर्ती अफलातून विसर्जन मिरवणूक अमळनेरकर विसरुच शकत नाही. दादा हे पाच पावली पोलीस कर्मचारी नवरात्री महोत्सवाचे तहयात अध्यक्ष होते त्या काळात आम्ही अनेक नावाजलेले मराठी नाटके पाहिलेली आहेत हे सर्व नियोजन दादांचे असत त्यांचा मित्रपरिवार ही मोठा होता त्यात जी.एम. दादा सोनार, माधवराव सुतार, पंडितशेठ भामरे, शंकरशेठ शिंपी, जगन्नाथभाऊ जोशी, बाळासाहेब शुक्ल, बाबूशेठ कासार, अंजूशेठ कासार, कांतीलालजी शाह भगवत सिंहजी कालरा, श्यामशेठ मुंदडा देवसीमामा जयत वाणी, लक्ष्मणशेठ वाणी, डॉ. बी. आर. बडगुजर, मधुभाऊ जोशी बंडूशेठ मुंदडा, मनीलाल भागचंद, पुनमचंद गुलाबचंद, नेमीचंदशेठ जैन, रतनशेट पहाडे यांचा समावेश होता.
आज २७ नोव्हेंबर २०२२ दादांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त आम्ही त्यांना अमळनेरवाशीयातर्फे आदरपूर्वक मानवंदना देत आहोत. आजही त्यांचे कुटुंबातील सदस्य सुपुत्र भास्कर अण्णा विनोद भैय्या वसंत बापू अशोकबापू सुपुत्री कमलताई, लताताई पुतणे सुरेशभाऊ आणि बंधू तसेच बिपिनबापू, कल्याणबापू नातू अभिषेकसह नातू- नाती, पणतू- पणती व संपूर्ण बोरसे परिवार श्रद्धापूर्वक आदरांजली वाहत आहे. 2026 हे दादांचे जन्मशताब्दी वर्ष व यावर्षी दादांच्या कुटुंबीयांतर्फे एक आगळे वेगळे दादांचे स्मारक व्हावे ही अंमळनेरकरांची सुप्त इच्छा आहे. पुनश्च एकदा एका ऋषीतुल्य मराठी उद्योजक आर के दादा पाटील यांना विनम्र अभिवादन!
कोण आहे.
मुक्त पत्रकार :- श्री राजेंद्र माधवराव सुतार,मुंबई,
मूळगाव अमळनेर, शब्दांकन:- श्री योगेश पाने