वाचन प्रेरणा दिनानिमित्त लोणावळा महाविद्यालयात विविध उपक्रम








मावळ मराठा न्युज -लोणावळा, लोणावळा एज्युकेशन ट्रस्टच्या डॉ. बी. एन. पुरंदरे कला, श्रीमती एस. जी. गुप्ता वाणिज्य व श्रीमती एस. ए. मिठाईवाला विज्ञान महाविद्यालय, वळवण, लोणावळा येथे दि.१५-१०-२०२६ प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख यांच्या हस्ते डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्राचार्य डॉ. देशमुख यांनी सांगितले की, प्रत्येकाने नियमितपणे वाचन करणे आवश्यक आहे. वाचनामुळे ज्ञानात भर पडते, विचारांना दिशा मिळते आणि व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. काही उदाहरणांच्या साहाय्याने त्यांनी वाचनाचे महत्त्व स्पष्ट केले. वाचनातून निरीक्षणात्मक व चिकित्सक वृत्ती निर्माण होते, असे प्रतिपादन करून त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता इतर पुस्तके वाचण्याचे आवाहन केले.वाचन प्रेरणा दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेतील प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांक पटकावलेल्या विजेत्यांना यावेळी प्राचार्यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. तसेच डॉ. रंजू बाला यांच्या मार्गदर्शनाखाली वाचन प्रेरणा दिनानिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल योगेश कवडे यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व सांगितले आणि ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या पुस्तकांचा लाभ घेण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. धनराज पाटील यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य पाटील सर, डॉ. राजेंद्र देवरे सर, महाविद्यालयीन प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा कार्यक्रम ग्रंथालय व माहिती विज्ञान समितीतर्फे आयोजित करण्यात आला होता, कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समितीतील सदस्य व ग्रंथालय कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.



