तळेगावात सत्तेचा रणसंग्राम; बंडखोरीला उधाण, १०० अपक्ष रिंगणात,तुला ही तिकीट,यालाही तिकीट,असे आश्वासन देणाऱ्या नेत्यांची दमछाक

मावळ मराठा न्युज -तळेगाव दाभाडे,(श्रावणी कामत)नगरपरिषद निवडणुकीने सत्ताधाऱ्यांचे साखळदंड हलवले असून राजकीय गल्लीबोळांमध्ये भीषण गोंधळ माजला आहे. मावळ तालुक्याचे धडधडते हृदय मानल्या जाणाऱ्या या शहरात सर्व पक्षांनी स्वतःला ‘अजेय’ समजणाऱ्यांची झोप उडवली आहे. कारण, उमेदवारी अर्जांच्या ढिगाऱ्यातून अपक्ष आणि बंडखोरांची ताकद गगनाला भिडल्याचे चित्र उघड झाले आहे.नगराध्यक्षपदासाठी ५ तर नगरसेवक पदांसाठी तब्बल १३३ अर्ज दाखल झाले आहेत. यापैकी जवळपास १०० अर्ज अपक्ष व बंडखोरांचे असल्याची नोंद आहे. म्हणजेच पक्षांचे निष्ठावान किती आणि का? नाराज आहे.याचे खरे गणितच उलटे झाले आहे. तळेगावात सत्तेची चावी आता कोणाच्या हातात राहणार, याचा थांगपत्ता पक्ष नेत्यांनादेखील लागत नाही.या सर्व गोंधळाला रंग चढवणारी गोष्ट म्हणजे आमदार सुनिल शेळके आणि माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे यांची एकत्र एंट्री. राजकारणात कधी एकमेकांवर कुरघोडी करणारे हे नेते अचानक हातात हात घालून मैदानात उतरले आणि त्यानंतर समीकरणे मोडायला सुरुवात झाली. ‘मामा–भाच्या ’ची ही नवी जोडी अपक्षांना माघारी फिरवण्यासाठी धडपडत आहे; पण बंडखोर मात्र “आम्ही कोणाचेही ऐकणार नाही” या मुद्यावर ठाम दिसत आहेत.तुलाही तिकीट देतो काळजी करू नकोस अशी आश्वासनामुळे अपक्षउमेदवारांचे पेव फुटले आहे. भाजप वाल्याना राष्ट्रवादी ने आश्वासन दिले आणि राष्ट्रवादी वाल्याना भाजप ने आश्वासन दिले आणि वेगळेच समीकरण पुढे आल्यानेमात्र नेत्यांची दमछाक होताना दिसते. तिकीट वाटपातील डावपेच,गटबाजीची धुसफूस आणि ‘आपलाच माणूस’ पुढे नेण्याच्या हट्टामुळे पक्षांचे घरटे अस्ताव्यस्त झाले आहे. काही प्रभागांमध्ये तर अधिकृत उमेदवारांना स्वतःच्या घरच्या मंडळींचाच विरोध सहन करावा लागत आहे. तळेगावात राजकारण नव्या पद्धतीने लिहिले जात असल्याचे हे संकेत आहेत.कॉंग्रेसनेही नगराध्यक्षपदासाठी उमेदवार दिला आहे. त्यामुळे मैदानात पंचरंगी लढत होणार हे निश्चित. मतदारांनी याला “सत्ता हवी म्हणजे गोंधळ करावा” असा शिक्का मारला आहे. शहरात रोज नवी अफवा, नवे दावे आणि नवी धावपळ दिसत आहे.सत्तेच्या शर्यतीत प्रत्येक पक्ष ‘आम्हीच विजयी’ म्हणत असला तरी अर्ज माघारीनंतर तळेगावचे खरे राजकीय चित्र समोर येणार आहे. अपक्ष-वाऱ्याची लाट सुरूच राहिली, तर निष्ठावान कार्यकर्त्यांना उराशी धीर लावण्यावाचून पर्याय उरणार नाही. आणि बंडखोरांनी नांगर रोवला, तर नेत्यांचे सत्तेचे स्वप्न हवेतच विरघळण्याची शक्यता नाकारता येत नाही.तळेगावाचे राजकारण आज तापले आहे… उद्या उकळेल… आणि निवडणुकीच्या दिवशी शिजून निघेल, हेच खरे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page