“कवितेचा सुगंधी मोगरा म्हणजे कवयित्री पुष्पांजली कुंभार यांच्या कविता.” – ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे

मावळ मराठा न्युज नेरूळ,नवी मुंबई: पुण्यातील नामांकित वेदांतश्री: प्रकाशनाच्या वतीने कवयित्री प्रा. डॉ. सौ पुष्पांजली कुंभार यांच्या ‘ प्रेमांकुर ‘ कवितासंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांच्या हस्ते फ्रुटवाला कल्चरल सेंटर ( मराठा हॉल ) नेरूळ, नवी मुंबई येथे रविवार दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी झाले.प्रमुख पाहुणे कवयित्री सौ. साधना जोशी, वेदांतश्री: प्रकाशनाचे सुनील उंब्रजकर, डॉ. ए. टी . कुंभार ( निवॄत्त आय. ए. एस. अधिकारी ), संत साहित्याचे अभ्यासक हरिभक्त परायण अशोकमहाराज गोरे, साहित्य संवर्धन समिती पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष सुरेश कंक, अग्निशमन दल अधिकारी सुधाकर भांबुरे, उद्योजक नितीन भागवत , न्यायाधीश सौ.रंजना कुंभार, साहित्यिका अनसूया कुंभार,शिवाजी भागवत या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक अरुण म्हात्रे म्हणाले, “कवयित्री पुष्पांजली कुंभार यांनी हिरवागार निसर्ग मनात साठवून कोऱ्या कागदावर अलगद जसाच्या तसा उतरविला आहे. त्यांच्या कविता निसर्गाचे अन् निसर्गप्रेमाचे गाणे आहे. प्रेमांकुर कविता संग्रह म्हणजे मोगऱ्याची सुगंधी फुले एकत्र करून केलेला एक सुंदर गजरा आहे. याचा सुगंध साहित्य विश्वात दरवळल्याशिवाय राहणार नाही.” व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यावर सौ. माधवी सूर्यवंशी यांच्या सरस्वती स्ततवनाने सोहळ्याचा प्रारंभ झाला. वेदांतश्री: प्रकाशनाचे लेखक, प्रकाशक सुनील उंब्रजकर म्हणाले, “आमच्या प्रकाशन संस्थेतर्फे हे २२६ वे पुस्तक प्रकाशित होत आहे. कविता हा अनेकांना सोपा वाटणारा लेखन प्रकार मुळातच अतिशय अवघड आहे. कविता केवळ लेखनाचा नव्हे तर जगण्याचा मार्ग आहे. निसर्ग आणि प्रेमाची अनुभूती म्हणजे ‘प्रेमांकुर’ हा एक आशयधन काव्यसंग्रह कवयित्री पुष्पांजली कुंभार यांच्या शब्दफुलातून साकारला आहे.” कवयित्री प्रा. डॉ. पुष्पांजली कुंभार यांनी आपल्या मनोगतातून काव्यसंग्रह निर्मितीविषयी सांगताना लहानपणापासूनच घरातून कवितेची आवड जोपासली गेली असल्याचे सांगितले. प्रमुख पाहुण्या कवयित्री, व्याख्यात्या सौ. साधना जोशी यांनी प्रा. डॉ. पुष्पांजली कुंभार यांच्या निवडक कवितांचे रसग्रहण करीत त्यातील भावविश्व उलगडून दाखविले. ज्येष्ठ कवी विलास कुंभार यांनी कवयित्री पुष्पांजली कुंभार यांच्या ‘ प्रेमांकुर ‘ कवितासंग्रहातील निवडक कवितांचे अभिवाचन केले.अरूण म्हात्रे आणि सौ. साधना जोशी यांच्या अभ्यासपूर्ण मनोगते म्हणजे काव्याचा आस्वाद कसा घ्यायचा असतो याचा श्रोत्यांसाठी एक परिपाठच होता. यावेळी डॉ. ए. टी कुंभार यांनी आपल्या भाषणातून कवी केशवसुतांच्या काव्यातील सौंदर्य उलगडून दाखविले.ज्येष्ठ साहित्यिक नारायण कुंभार ( एखतपूरकर ) यांनी कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन केले. सौ. निर्मला भागवत यांनी आभार मानले. सामुदायिक पसायदान म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली.वृत्तांकन – अशोकमहाराज गोरे७०८३७१२४ १९

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page