*’ताटी उघडा ज्ञानेश्वरा’ या महानाट्याचे प्रयोग व्हावेत म्हणून निश्चितच मदत करू – शर्मिला बाबर*

मावळ मराठा न्युज -पिंपरी (प्रदीप गांधलीकर) दिनांक : ०६ एप्रिल २०२६”ताटी उघडा ज्ञानेश्वरा’ या महानाटकाचे पिंपरी – चिंचवड शहरात प्रयोग व्हावेत म्हणून निश्चित मदत करू!’ असे उद्गार उपमहापौर शर्मिला बाबर यांनी रविवार, दिनांक ०५ एप्रिल २०२६ रोजी भरतमुनी रंगघन सभागृह, निगडी प्राधिकरण येथे काढले. ‘रुद्रंग’ने आयोजित केलेल्या अनुसंधान कला संस्थेच्या उद्घाटन समारंभात विशेष अतिथी म्हणून बाबर बोलत होत्या. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान अ.भा.नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी भूषविले होते तर प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री गिरीश प्रभुणे व नगरसेविका शैलजा मोरे, ‘रुद्रंग’चे अध्यक्ष रमेश वाकनीस आदी मान्यवर उपस्थित होते. अनुसंधानचे उद्घाटन वाशी येथील माजी नगरसेवक रमेश शिंदे यांच्या शुभहस्ते झाले. शिंदे यांनीदेखील या प्रसंगी ‘ताटी उघडा..’चे प्रयोग आपण नव्या मुंबईत घडवून आणू अशी ग्वाही दिली. उद्घाटन सत्राचा समारोप करताना भाऊसाहेब भोईर यांनीदेखील ज्ञानेश्वर माउलींच्या भक्ती आणि प्रेमधर्माचा जागर ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’ या नाटकाद्वारे आपण शहरात निश्चितपणे घडवू असे आश्वासन दिले. दुसऱ्या सत्रात ‘ताटी उघडा’चे लेखक, कवी, दिग्दर्शक सुरेश कोकीळ यांची प्रकट मुलाखत विशेष रंगली. मुलाखतकार होते ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले व सिनेअभिनेते संदीप साकोरे. ‘संत महिमा गात गात जीवनाचे सार्थक व्हावे…’ अशी भावना सुरेश कोकीळ यांनी व्यक्त केली. सुमारे तीन तास चाललेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता कुलकर्णी व उज्ज्वला केळकर यांनी केले. किशोरी व नंदीन सरीन यांनी गायिलेल्या गणेशस्तवन, नांदीमुळे कार्यक्रमाची रंगत वाढली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शशीधर बडवे, नागेश जोशी, माधुरी ओक, बाळासाहेब विभूते, अरुणा वाकनीस, सागर यादव, भूषण कोकीळ, अनीष कोकीळ यांनी सहकार्य केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page