सूर साधनाच्या ‘बॉलिवूड सुपर स्टार’ कार्यक्रमात रोटरी क्लब, लोणावळाचा विशेष सन्मान

मावळ मराठा न्युज – लोणावळा, सूर साधनाच्या ‘बॉलिवूड सुपर स्टार’ कार्यक्रमात रोटरी क्लब लोणावळाचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी जुन्या-नव्या हिंदी चित्रपट गीतांनी रंगली संगीताची सुरेल मैफल; गायक संकेत कुलकर्णी यांना रसिकांची दादलोणावळा : सूर साधना संगीत परिवाराच्या वतीने महिला मंडळ हॉल, लोणावळा येथे आयोजित करण्यात आलेला ‘बॉलिवूड सुपर स्टार’ हा संगीत कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात आणि रसिकांच्या भरघोस प्रतिसादात संपन्न झाला. जुन्या आणि नव्या हिंदी चित्रपटांमधील लोकप्रिय गीतांची सुरेल मेजवानी या कार्यक्रमातून रसिकांना अनुभवायला मिळाली.या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रोटरी क्लब ऑफ लोणावळा या संस्थेचा विशेष सन्मान. ज्येष्ठ समाजसेवक नंदकुमार वाळंज यांच्या हस्ते रोटरी क्लब लोणावळा या संस्थेला त्यांच्या सामाजिक आणि सेवाभावी कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. सामाजिक कार्याची दखल घेत कलाकारांच्या व्यासपीठावरून संस्थेचा गौरव करण्यात आल्याने उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर डॉ. ममता काळे यांनी सुरेल गणेश वंदना सादर करून कार्यक्रमाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ करून दिला.या संगीत मैफलीचे आणखी एक प्रमुख आकर्षण ठरले ते म्हणजे परदेशातून मायभूमीत परतलेले सुरेल गायक संकेत कुलकर्णी. त्यांनी नव्या हिंदी चित्रपटांमधील लोकप्रिय गाणी आपल्या सुमधुर आवाजात सादर करून रसिकांची विशेष वाहवा मिळवली. त्यांच्या सादरीकरणाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.सूर साधना परिवाराचे संचालक प्रदीप वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ गायिका मंगला राणे, मीनाक्षी गायकवाड, किरण कुलकर्णी, सोनिया खोब्रागडे, सिद्धांत कांबळे, डॉ. संदीप डोबले, डॉ. ममता काळे आणि सुनील पाणगावकर यांनी विविध लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतांचे सादरीकरण केले. प्रत्येक कलाकाराने आपल्या गायकीतून जुन्या आठवणींना उजाळा देतानाच नव्या पिढीतील संगीतप्रेमींनाही मंत्रमुग्ध केले.कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन अॅड. मोनाली कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाचे व्यवस्थापन सुरेश गायकवाड यांनी पाहिले, तर ध्वनी संयोजनाची जबाबदारी नितीन वाळंज यांनी उत्तम प्रकारे पार पाडली.या कार्यक्रमाला ज्येष्ठ समाजसेवक धीरूभाई कल्याणजी, नंदकुमार वाळंज, ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष व रोटरीयन रवींद्र कुलकर्णी, वानखेडे सर, दिलीप पवार, मावळ वार्ता फाउंडेशनचे सचिव बापूलाल तारे, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षा उमा मेहता, ज्येष्ठ पत्रकार सी. बी. जोशी, दत्तात्रय लाड, विशाखा गोलपकर, नीता शहा, प्रवीण कदम, मनोज गवळी, शत्रुघ्न खंडेलवाल यांच्यासह अनेक मान्यवर आणि संगीतप्रेमी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.संगीताच्या माध्यमातून नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, ज्येष्ठ कलाकारांच्या कलेला प्रोत्साहन देणे आणि सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांचा गौरव करणे, हा सूर साधना परिवाराचा स्तुत्य उपक्रम या कार्यक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाला. संगीत, कला आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम घडवणारा हा ‘बॉलिवूड सुपर स्टार’ कार्यक्रम रसिकांच्या स्मरणात राहणारा ठरला.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page