*देहुरोडच्या २९ एफ.ए.डी.मध्ये रक्षाबंधन उत्साहात; डॉ. रमेश बन्सल यांच्या संकल्पनेतील उपक्रमाचे अकरावे वर्ष*







मावळ मराठा न्युज – देहुरोड,दि. २७ ऑगस्ट : देशाच्या सीमांचे आणि नागरिकांचे रक्षण करणाऱ्या सैन्यदलातील अधिकारी व जवानांसोबत देहुरोड येथील २९ एफ.ए.डी. येथे राखी पौर्णिमा उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. विविध सामाजिक संस्थांच्या महिला पदाधिकाऱ्यांनी सैनिक बांधवांना राखी बांधून त्यांच्या शौर्याला, त्यागाला आणि देशसेवेला सलाम केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रमेश बन्सल यांनी केले. ते म्हणाले, “आमचे सैनिक बांधव ऊन, पाऊस, वारा आणि थंडीची पर्वा न करता अखंडपणे देशाच्या सीमा आणि देशवासीयांचे रक्षण करतात. त्यांच्या त्यागाची आणि समर्पणाची आम्हाला सदैव जाणीव आहे. त्यामुळे रक्षाबंधन, दिवाळी यांसारखे सण सैनिक व सैन्य अधिकाऱ्यांसोबत साजरे करण्यात एक वेगळाच आनंद मिळतो. या माध्यमातून सैनिकांशी असलेले आपले भावनिक नाते अधिक दृढ होते.”यावेळी २९ एफ.ए.डी.च्या कमांडंट लेफ्टनंट कर्नल अपेक्षा उप्पल यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्या म्हणाल्या, “भारताच्या प्रत्येक राज्यात विविध संस्कृती आणि परंपरा जपल्या जातात व वेगवेगळे सण साजरे केले जातात. या सर्व उत्सवांचा मुख्य उद्देश आनंदाची देवाणघेवाण करणे, एकमेकांविषयी आदर व्यक्त करणे आणि आपले नाते अधिक घट्ट करणे हा आहे. आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने विविध संस्थांच्या वतीने मोठ्या संख्येने भगिनी येथे उपस्थित झाल्या आहेत. त्या संपूर्ण समाजाच्या प्रतिनिधी म्हणून आपल्या सैनिक बांधवांना राखी बांधत आहेत. त्यामुळे सैनिकांनाही कौटुंबिक सोहळ्याचा आनंद मिळतो आणि त्यांना एक नवी ऊर्जा मिळते.”यावेळी Ladies Circle India – PMLC-53 च्या पदाधिकारी चैताली शहा, सोनी अग्रवाल, शकुंतला बन्सल, विश्व हिंदू परिषद मातृशक्तीच्या संयोजिका शारदा रिकामे, मीरा कुलकर्णी, ज्योती तिखे, निशा राठोड, निमाच्या अध्यक्षा डॉ. मंजुषा सावंत आदी उपस्थित होत्या. उपस्थित भगिनींनी सैन्यदलातील अधिकारी व जवानांना औक्षण करून राखी बांधली आणि त्यांच्या देशसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.कार्यक्रमाचे संयोजन भास्कर रिकामे यांनी केले, तर त्यांनीच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुभेदार मेजर सदाशिव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.डॉ.रमेश बन्सल यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाचे यंदा अकरावे वर्ष होते. गेल्या अकरा वर्षांपासून रक्षाबंधनाच्या निमित्ताने सैन्यदलातील अधिकारी व जवानांसोबत हा भावनिक आणि सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम सातत्याने हा उपक्रम राबविला जात आहे.



