अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड च्या ‘कलाकार कट्टा’ची दिमाखदार रंगतदार वर्षपूर्ती

मावळ मराठा न्युज -चिंचवड, दिनांक -२४ ऑक्टोबर रोजी मा .लोकनेते भाऊसाहेब भोईर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘कलाकार कट्टा’ने यशस्वी वर्षपूर्तीचा टप्पा गाठला. नवोदितांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे आणि सांस्कृतिक क्षेत्रातील प्रतिभेला नवी ओळख मिळावी, या उद्देशाने सुरू झालेल्या या उपक्रमाच्या बाराव्या पुष्पात विविध कलाविष्कारांची रंगतदार मेजवानी रसिकांना अनुभवायला मिळाली.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने शनिवार, दि. २४ ऑक्टोबर २०२६ रोजी पंडित पद्माकर कुलकर्णी कलादालन, प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ‘वर्षपूर्ती हक्काच्या मंचाची, नांदी नव्या पर्वाची!’ ही या सोहळ्याची संकल्पना वर्षभरातील यशस्वी वाटचालीचे प्रतीक ठरली.कार्यक्रमात कराओके गायनात शालन पायगुडे, कविता सादरीकरणात शशिकला देवकर, आकाश थिटे, आसाराम कसबे यांनी झांज आणि ढोलकी या वाद्याची माहिती दिली आणि ऋषिकेश गायकवाड आणि ओंकार गायकवाड यांनी वाद्याचे सादरीकरण केले. मधुषा भागवत यांच्या चित्रांचे सर्व रसिकांनी कौतुक केले, भारूडमध्ये राजश्री वाघमारे, जोगवा सादरीकरणात माधुरी डिसूजा व शीला पाटील, बोधकथेत राज अहेरराव, पियानो वादनात श्रिजा पोवार, अभिवाचनात जयश्री श्रीखंडे, लोकवाद्यात आसाराम कसबे, तसेच नाट्यछटांमध्ये सुखदा शिंदे, देवज दीक्षित आणि दिविजा दीक्षित यांनी आपापल्या कलागुणांचे दर्शन घडवले. विविध कलाप्रकारांतील या सादरीकरणांनी कार्यक्रमात उत्साह आणि वैविध्य निर्माण केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक गौरी लोंढे यांनी केले. त्यांनी ‘कलाकार कट्टा’च्या वर्षभरातील वाटचालीचा आढावा घेत या उपक्रमामागील संकल्पना आणि उद्देश स्पष्ट केला. या कार्यक्रमाचे राजेंद्र बंग, पंकज चव्हाण, रवी दामोदरे, आकाश थिटे आदींनी संयोजन केले. सूत्रसंचालन सीमा गांधी यांनी केले, तर प्रकाश ढवळे यांनी आभार व्यक्त केले.एका संकल्पनेतून सुरू झालेला हा प्रवास बारा पुष्पांच्या माध्यमातून अनेक कलाकारांच्या कलागुणांना व्यासपीठ देणारा ठरला. कलाकारांना प्रोत्साहन, रसिकांची दाद आणि नव्या प्रतिभेला मिळालेली संधी ही या वर्षपूर्तीची वैशिष्ट्ये ठरली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page