पत्रकारितेस भ्रष्टाचा-यांची रखेल बनवू नका -ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर

मावळ मराठा न्यूज, सरन्यायाधिश एन.व्ही.रमण यांनी एका समारंभात जाहिर वक्तव्य केले आहे, *देशातून शोध पत्रकारिता दुर्दैवाने नाहीशी होत चालली आहे. सद्या देशात गोडी गुलाबीचे धोरण दिसत आहे. पत्रकारितेचा दर्जाही घसरत चालला आहे.इतकेच बोलून ते थांबले नाहीत तर पुढे म्हणतात, घोटाळे, गैरवर्तन या बद्धल वृत्तपत्रांनी दिलेलेया बातम्यांचा मोठा परिणाम होत असे हे या आधी आम्ही पाहिलेे आहे. मात्र तसा परिणाम साधणा-या एक दोन वगळता गेल्या काही वर्षात सत्य प्रखरपणे उजेडात आणणा-या बातम्या माझ्या पाहण्यात आलेल्या नाहीत.सद्या सगळीकडेच गोडी गुलाबीचे धोरण आहे. पुर्वी वर्तमानपत्रे अनेक गैरव्यवहार,चुकीच्या गोष्टींना निर्भिडपणे बाण्याने प्रसिद्ध करीत असत.हे खडे बोल सुनावणारी व्यक्ति कोणी सर्वसामान्य नसून सरन्यायाधिश पदावरील सर्वोच्च मान्यवर व्यक्तिमत्व आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या पत्रकारांनी आत्मपरिक्षण करून स्वतःची योग्यता तपासायला हवी. एखाद्या भांडवलदार अथवा कंपनीच्या दैनिकात वर्षानुवर्षे खर्डेघाशी करून त्या बदल्यात वेतन व भत्ते घेणारे अनेकजण ज्येष्ठ व श्रेष्ठ म्हणून आपली पाठ थोपटून घेतात. मालकाची चाकरी करता करता खासदारकी मिळवतात, चाकोरीबद्ध व एकांगी लेखन करणारे पत्रकार देखील आहेत. स्वतंत्रपणे विचार मांडू न शकणारे मालकांच्या घाण्याला जुंपलेले बैल देखील स्वतःला मोठे पत्रकार- संपादक म्हणवतात. इतकेच नव्हे तर बाळशास्त्री जांभेकर पत्रकारिता पुरस्कार,जीवन गौरव पुरस्कार लाटतात.वय किती व किती वर्षे पत्रकार म्हणून कार्यरत राहिलात हे निकष अशा पुरस्कारांसाठी ठरवले जातात. हीच खरी शोकांतिका आहे.सरन्यायाधिश एन.व्ही रमण यांनी व्यक्त केलेली खंत सार्वत्रिक आहे. घोटाळे, गैरवर्तन या सारख्या घटनांचा शोध घेणारी पत्रकारिता करणारे पत्रकार अपवादानेच आहेत. बाकी सर्व आलबेल व गोडी गुलाबीचे वातावरण आहे. पत्रकारिता ही औषधी गुण असलेल्या व आरोग्यवर्धक कडू कारल्या प्रमाणे असावी. आजच्या पत्रकारितेत बहुतांश कडू कारल्याचे गुण दिसत नाही, कारल्यात बासुंदी वा बर्फी भरून खावी अशी पत्रकारिता बेचव झाली आहे.बहुतांश पत्रकार स्वतःची आरती स्वतःच ओवाळल्या प्रमाणे स्वतःला विशेषणं उपाध्या चिकटवतात. कोणी दबंग पत्रकार, कोणी बादशहा,कोणी सम्राट तर कोणी बहुजन नायक, ज्येष्ठ समीक्षक म्हणवतात, म्हणवून घेतात. परंतू त्यांची दबंगिरी, बादशहा पण, नायकत्व,सम्राटपद पेड न्यूज, पेड मुलाखती, मॅरेथाॅन मुलाखती, चाटूकारिता व भाटगिरी च्या जोखडा खाली गुमान व गुलाम झालेली दिसते. माझ्या ४१ वर्षाच्या पत्रकारितेत अनेक “वाघ” शेळी होताना, संजय डोळ्यावर स्वामी निष्ठेची पट्टी बांधलेले, सम्राट व नायक आपल्या तत्वांना समाज बांधवांच्या भावनांना पायदळी तुडवून श्रीमंत झालेले पाहिले आहेत.अनेक पत्रकार त्यात एक उल्हासनगरकर ही आहे दरवर्षी पुरस्काराच्या रांगेत असतात.कधी बहुजन नायक पुरस्कार, कधी मुक नायक पुरस्कार तर सामाजिक राजकिय पुरस्कारावर घाला घालून पुरस्कारांनी आपली कपाटं भरतात. एक पत्रकार (?) तर गर्वाने म्हणतो, मला दिड हजार पुरस्कार मिळाले आहेत. एखाद्या समारंभात स्वागत करताना दिलेले बुके व स्मृतिचिन्हं हे देखील त्यांच्या लेखी पुरस्कार मानले जातात.एक अतिशहाणा पत्रकार; पत्रकार दिनाच्या लेखात, पत्रकारांना गि-हाईकाच्या शोधात वाट पाहणा-या वारांगणेची उपमा देतो.मग तो कोण ? कोठी चालवणारी अम्मा का ? पण लाचार पत्रकार त्याला जाब विचारू शकत नाहीत.कारण तो ज्येष्ठ व श्रेष्ठ पत्रकार म्हणवतो. पत्रकार म्हणवून घ्यायला पुर्वी पासून शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता नाही. कोणीही उठावे, वृत्तपत्र निबंधकाकडे अर्ज करावा, टायटल मिळाले की झाला पत्रकार. कित्येक जण तर आपल्या गोरख धंद्यांना संरक्षण मिळावे म्हणून पत्रकारीेतेचा वापर करतात.आता मी माझ्या पत्रकारितेचे देखील आत्मपरिक्षण या निमित्त केले नाही तर ते उचित ठरणार नाही. यात आत्मप्रौढी अजिबात नाही.मी पत्रकारितेच्या ध्येयाने व छंदाने पछाडला गेलो आणि वयाच्या ३० व्या वर्षी कायम स्वरूपी व मलईदार अशा सार्वजनिक बांधकाम विभागातील स्टेनोग्राफरची सरकारी कार्यालयातील नोकरी सोडली परंतू पत्रकारिता हे माझ्या उपजीविकेचे साधन कधीच मानले नाही. निष्पक्ष निर्भीडपणे पत्रकारीता केली. त्यामुळेच मला धमक्या मिळाल्या, प्राणघातक हल्याचे दोन प्रयत्न झाले, माझ्या विरोथात मुर्दाबादच्या घोषणा देत स्वकियांनीच मोर्चे काढले, माझ्या साप्ताहिकाची होळी केली गेली. पोषण आहारात लेंडी पेरून माझ्या पत्नीचा स्वयंरोजगार हिरावून घेण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. मंत्री पुत्र व खासदारास प्रोटोकाॅल न पाळल्या बद्धल समज देताच ६०-७० कार्यकर्ते माझ्या घरावर चालून आले.एका अद्यापक महाविद्यालयाच्या संचालकाने १९८७ साली माझ्या विरोधात धादांत खोटा व पोलीसांशी संगनमत करून गुन्हा दाखल केला.अशा असंख्य प्रकारांना तोंड देत व यशस्वीपणे मुकाबला करीत मी पत्रकारितेचा धर्म पाळला.उल्हासनगर महापालिकेतील अनेक घोटाळे व गैर व्यवहार उघडकीस आणले. त्यात फुटबाॅल स्पर्धा घोटाळा, चिक्की घोटाळा, डस्टबीन टेंडर घोटाळा, ५-२-२ अंतर्गत १५ कोटींचा घोटाळा, महिला व बाल कल्याण समितीतील शैक्षणिक साहित्य व डस्टबीन घोटाळा, स्थायी समितीतील वैद्यकिय साहित्य खरेदी घोटाळा या सारखे अनेक घोटाळे उघडकीस आणून ते रोखले व ५०-६० कोटी वाचवले.गेली साडेतीन वर्षे मी महापालिकेतील एक भ्रष्ट व बनवेगिरीत तज्ज्ञ अशा जनसंपर्क अधिकारी युवराज धोंडू भदाणे याची सर्व बनवेगिरी, मनमानी,महापालिका निधीचा अपहार उघडकीस आणण्यासाठी शोध व धारदार पत्रकारिता अक्षरशः पणास लावली व हा लढा आता अंतिम टप्यात आहे.या माझ्या संघर्षमय पत्रकारितेत बहुतांश पत्रकारांनी माझी साथ देण्याऐवजी प्रतिपक्षाकडून लाच घेऊन मुक पत्रकारिता करण्यातच धन्यता मानली. असे मुक व विकाऊ पत्रकार बहुसंख्य आहेत व धीरोदात्तपणे या संघर्षात साथ देणारे पत्रकार अत्यल्प आहेत. मला गुरूस्थानी मानणा-या व मित्र असलेल्या संपाकांनी देखील या संदर्भातील बातम्या- लेख देण्याचे टाळून संबंधितांशी आपले गोडी गुलाबीचे संबंध अबाधित राखण्यात धन्यता मानली. बुमधारी पत्रकारांनी तर माझे आंदोलन हे पर्वणी मानून कोणी १५-१५ हजारापासून अगदी ५०० ते दोन हजारात आपली पत्रकारिता ही धंदेवाली असल्याचे सिद्ध केले. माझ्या आंदोलनाची बातमी न देण्यासाठी पार्टी व पाकिटात पत्रकारितेस भ्रष्टाचा-यांची रखेल बनवण्यात धन्यता मानणारी एक टोळी सक्रिय राहिली.त्यामुळे सरन्यायाधिश एन.व्ही.रमण यांनी पत्रकारांबद्धल केलेले वक्तव्य किती खरे आहे, याची माझ्या वाचकांना खात्री पटेल. प्रामाणिक व सच्च्या पत्रकारांसमोर मी नेहमीच नतमस्तक होत आलो आहे पण बदमाश पत्रकारांची बनवेगिरी व चापलूशी उघड उघड करून सत्य दर्शन घडवणे हीदेखील पत्रकारितेची सेवाच आहे, असे विनम्रपणे नमुद करून मी येथेच थांबतो. पत्रकार दीन का झाला ?, चौथा स्तंभ कि चोथा स्तंभ, बोगस पत्रकारांवर फवारणी आवश्यक, या सारख्या पत्रकारितेवरील लेखांचे महाराष्ट्रभर जंगी स्वागत झाले तसेच या नव्या लेखाचे देखील स्वागत होईल, याची मला खात्री आहे.




