वडगाव मावळ न्यायालयच्या नवीन इमारतीसाठी १०९ कोटीचा खर्चाला शासनाची मंजुरी

मावळ मराठा न्युज -वडगाव-मावळ, जि.पुणे येथे अस्तित्वात असलेली जुनी न्यायालयीन इमारत पाडून तेथे नवीन न्यायालयीन इमारत (बेसमेंट तळ+८ मजले) (२० कोर्ट हॉल) बांधकामाबाबतचा प्रस्ताव मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी उपरोक्त संदर्भाधीन पत्रान्वये शासनास सादर केला आहे. सदरहू प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.याबाबतचा शासन निर्णयाला दिनांक २५ ऑगस्ट रोजी वडगाव-मावळ,जि.पुणे येथे अस्तित्वात असलेली जुनी न्यायालयीन इमारत पाडून तेथे नवीन न्यायालयीन इमारत (बेसमेंट,तळमजला ८ मजले)(२० कोर्ट हॉल) बांधण्याकरीता रु. १०९.०८ कोटी (रुपये एकशे नऊ कोटी आठ लक्ष फक्त) इतक्या अंदाजित खर्चाच्या कामास या शासन निर्णयाद्वारे प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.यात १) बांधकाम सुरु करण्यापूर्वी नमूना नकाशा, मांडणी नकाशा तसेच विस्तृत नकाशास वास्तुविशारदांकडून मंजूरी घेवूनच सुरु करावे.२) सदरचे अंदाजपत्रक हे नमूना अंदाजपत्रक असल्याने या कामांच्या सविस्तर अंदाजपत्रकांना तांत्रिकदृष्ट्या मान्यता देत असताना मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे यांच्या सहमतीने तरतूदी अंतीम करण्यात याव्यात.३) नियोजित जागा उपभोक्ता विभागाच्या ताब्यात असल्याचे प्रमाणपत्र प्राप्त करुन सदर कामाच्या निविदा सूचना प्रसिध्द करण्यात याव्यात.४) सदर कामाची निविदा काढताना प्रत्येक कामाची स्वतंत्रपणे निविदा न काढता नमूद सर्व कामांसाठी एकत्र एकच निविदा काढण्यात यावी.५) काम सुरू करण्यापुर्वी सर्व संबंधित स्थानिक संस्था/प्राधिकरणे यांची मान्यता घेण्यात यावी.६) प्रत्यक्ष काम करतेवेळी पर्यावरण विभाग, शासन निर्णय क्र. इएनव्ही-२०१३ /प्र.क्र.१७७/ तां.क.१, दिनांक १० जानेवारी, २०१४ मध्ये उल्लेख करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार कार्यवाही करण्यात यावी.७) सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन निर्णय, क्र. बीडीजी २०१७/प्र.क्र.६०/इमारती-२. दिनांक ७ जुलै, २०१७ अन्वये कार्यवाही करण्यात यावी.८) सदर कामाकरिता सुधारीत प्रशासकीय मान्यतेची आवश्यकता लागणार नाही अश्या अटीवर मान्यता देण्यात आली आहे. या शासन निर्णयामुळे वडगांव मावळ येथील न्यायालयात काम पूर्ण झाल्यावर वकील वर्गाची पार्किंग ची अडचण सुटणार आहे कारण बेसमेंट आणि तळमजला पार्किंग साठी असल्याने पक्षकार वकील यांची पार्किंग ची समस्या सुटणार आहे आणि नागरिकांना चांगल्या सुविधा मिळणार आहेत.या साठी वडगांव बार असोसिएशन आणि वडगांव लीगल प्रॅक्टिशनर यांनी यासंदर्भात पाठ पुरावा केला होता त्याला यश येताना दिसत आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page