श्रेय कोणीही घ्या; माझ्या मावळच्या शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे ? मग आमदार सुनील शेळके असो कि माजी मंत्री संजय उर्फ बाळा भेगडे ; भात उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता






मावळ मराठा न्यूज- मावळ,मावळमधील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दोन दिवसांत शासकीय समिती मावळ तालुक्याच्या दौन्यावर येणार असल्याचे माजी आमदार बाळाभाऊ भेगडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
दुष्काळ निवारण समितीचे अध्यक्ष तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे यांनी फोनवर झालेल्या चर्चेमुळे मोठा दिलासा मिळणार असल्याचा दावा केला आहे,मावळ तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या दिशेने सरकारचे महत्त्वाचे पाऊल,असल्याचे संजय भेगडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे त्यात त्यांनी २६ ऑक्टोबर चे पत्राचा हवाला दिला आहे तर
मावळ तालुक्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटाची दखल घेत आमदार सुनील आण्णा शेळके यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला महत्त्वपूर्ण यश मिळाल्याचे आमदार सुनील शेळके यांनी प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी शासकीय समिती येत्या दोन दिवसांत मावळ तालुक्याच्या दौऱ्यावर येणार आहे. दुष्काळ निवारण समितीचे अध्यक्ष तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत मंत्रालय स्तरावर झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मावळ तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीच्या अनुषंगाने शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे. मावळ तालुका हा राज्यातील प्रमुख भात उत्पादक क्षेत्रांपैकी एक म्हणून ओळखला जातो. मुबलक पाऊस, अनुकूल हवामान आणि सुपीक जमीन यामुळे मावळमध्ये भातशेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. येथील इंद्रायणी भाताला राज्यासह देशभरात मोठी मागणी असून, तालुक्यातील हजारो शेतकरी भात पिकावर आपल्या आर्थिक उत्पन्नासाठी अवलंबून आहेत. तालुक्यात दरवर्षी १२ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर भात लागवड केली जाते. त्यामुळे भात पिकाचे नुकसान म्हणजे केवळ शेतीचे नुकसान नसून, ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही त्याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सुनील आण्णा शेळके यांनी काही दिवसांपूर्वी मावळ तालुक्यातील विविध भागांचा दौरा करून पावसाअभावी बाधित झालेल्या भातशेतीची शेतकऱ्यांचा बांधावर जाऊन पाहणी केली होती. शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांनी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि तालुक्यातील गंभीर परिस्थिती शासनाच्या निदर्शनास आणून दिली. भात उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान, पावसाची कमतरता आणि शेतीसाठी पाण्याची उपलब्धता या मुद्द्यांवर त्यांनी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला.
याच पाठपुराव्याच्या अनुषंगाने मंत्रालयात झालेल्या बैठकीत मावळ तालुक्याच्या दुष्काळसदृश परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी शासकीय समिती पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या दोन दिवसांत ही समिती तालुक्यात येऊन विविध भागांतील पीक परिस्थिती, पावसाची स्थिती, शेतीसाठी पाण्याची उपलब्धता आणि झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहे. त्यानंतर समितीकडून शासनाला अहवाल सादर केला जाणार आहे.
मावळ तालुका दुष्काळग्रस्त घोषित झाल्यास लागू असलेल्या शासन निकषांनुसार बाधित शेतकऱ्यांना मदत व सवलती मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे समितीच्या पाहणीमध्ये प्रत्यक्ष नुकसानीची योग्य नोंद होणे, बाधित क्षेत्राचे अचूक मूल्यांकन होणे आणि अहवाल शासनाकडे तातडीने सादर होणे महत्त्वाचे ठरणार आहे. दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी पूर्ण होण्याच्या दिशेने शासनाने पाऊल उचलल्याने शेतकऱ्यांमध्ये आशा निर्माण झाली आहे.
श्रेय कोणीही घ्या पण मावळच्या शेतकऱयाला भरीव मदत मिळायला पाहिजे ही अपेक्षा मावळतील शेतकऱ्यांची आहे. मावळ चे आमदार सुनील शेळके यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून शेतकऱ्यांचे आसू पुसण्याचे आणि त्यांचा बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आहे. त्याच प्रमाणे नुसती पाहणी केली नाही तर मंत्रालय स्तरावर त्याचा पाठपुरावा करून शासनाच्या निदर्शनास देखील आणून दिले आहे तर माजी मंत्री बाळा भेगडे यांनी काल म्हणजे २६ ऑक्टोबरला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र पाठवले आहे. जनतेला कळतं खरा पाठपुरावा कोणी केला ते,श्रेय कोणीही घ्या मावळच्या शेतकऱ्यांना भरीव मदत मिळू द्या बास्स.



