मावळच्या प्रतिक देशमुखने रांची येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक पटकावले






मावळ मराठा न्युज -लोणावळा:- मावळ तालुक्यातील सडवली गावचा आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर व राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता युवा मल्ल प्रतिक शंकर देशमुख याने रांची झारखंड येथे झालेल्या २३ वर्षांखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ग्रिकोरोमन कुस्ती प्रकारातील १३० किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावले आहे. प्रतिक याने सात राष्ट्रीय स्पर्धेत पाच राष्ट्रीय स्पर्धेत विविध वजनी गटात पदके पटकावली आहेत. तर बिस्किक, किर्गिझस्तान येथे तीन.व वर्षांपूर्वी झालेल्या १७ वर्षांखालील एशियन चॅम्पियनशिप आंतरराष्ट्रीय स्पर्धेत १२५ किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावले आहे. रांची झारखंड येथे नुकत्याच झालेल्या २३ वर्षांखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत मावळ तालुक्यातील सडवली गावचा आंतरराष्ट्रीय युवा मल्ल प्रतिक शंकर देशमुख याने ग्रिकोरोमन कुस्ती प्रकारातील १३० किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावले आहे. या स्पर्धेत चार लढतींपैकी तीन लढतीत प्रतिकने राजस्थानच्या सोनू कुमार, पंजाबच्या अश्विनी सिंग व गुजरातच्या अमित यादव यांना चितपट करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र अंतिम लढतीत हरियानाच्या जोगिंदर सिंग याने प्रतिकचा ८/४ अशा गुणाधिक्याने पराभव सुवर्णपदक पटकावल्याने प्रतिकचे सुवर्णपदकाचे स्वप्न भंगले आणि त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.प्रतिक देशमुखने यापूर्वी झालेल्या सहा राष्ट्रीय स्पर्धांपैकी चार राष्ट्रीय स्पर्धेत एक सुवर्ण व दोन रौप्य पदके व एक कांस्यपदक अशी चार पटकावली आहेत. राजस्थान येथे झालेल्या सब ज्युनिअर विभागात ९२ किलो वजनी गटात सुवर्ण, दिल्ली आणि आसाम येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत ८५ किलो वजनी गटातील रौप्यपदकांचा समावेश असुन, आसाम येथील रौप्यपदक हे खेलो इंडिया या राष्ट्रीय स्पर्धेतील आहे. तर रांची झारखंड येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ११० किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले आहे.
प्रतिक हा पुण्यातील सह्याद्री कुस्ती संकुल येथे वस्ताद विजय बराटे, संदीप पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव व कुस्तीचे धडे घेत आहे.प्रतिकच्या यशाबद्दल ऑलंम्पिकवीर कुस्तीगीर व शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित पै.मारूती आडकर, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे विभागीय सचिव पै. मारुती बहिरु आडकर, राष्ट्रीय सुवर्णपदक विजेते पै. संभाजी राक्षे, मावळ तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष व महाराष्ट्र चॅम्पियन पै. खंडू वाळूंज, कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष विद्यापीठ चॅम्पियन पै.सचिन घोटकुले, पै.मनोज येवले, महाराष्ट्र चॅम्पियन पै. तानाजी कारके, कुस्तीगीर संघाचे सचिव व राष्ट्रीय कुस्तीगीर पै.बंडू येवले, सहसचिव व महाराष्ट्र चॅम्पियन पै.पप्पु कालेकर, कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष व राष्ट्रीय कुस्तीगीर पै. नागेश राक्षे, राष्ट्रीय कुस्तीगीर पै. निवृत्ती काकडे, राष्ट्रीय कुस्तीगीर पै. भरत लिमण, पै. धोंडिबा आडकर, पै.विष्णु शिरसाट, पै. बाळासाहेब काकरे, पै. सुरेश आगळमे, पै. बाळू वाळूंज, पै. संदीप काळे, पै. अंकुश काकरे, पै. दिपक दाभाडे, पै. नवनाथ बोडके, पै. चंद्रकांत शिंदे, संघाचे सल्लागार पै. राजु बच्चे, पै.देविदास कडू यांनी अभिनंदन केले आहे.



