शिवसेवा प्रतिष्ठानच्या २०२६ च्या ‘वंदे मातरम’ रोजनिशीचे दिमाखात प्रकाशन








मराठा न्युज – लोणावळा,भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा आत्मा ठरलेल्या वंदे मातरम या गीताला यंदा ७ नोव्हेंबर २०२५ रोजी १५० वर्षे पूर्ण झाली. भारताच्या मातीतला प्रत्येक शब्द, प्रत्येक सूर, प्रत्येक स्वप्न हे सर्व या महामंत्राच्या गौरव गाथेत गुंफलेले आहेत. या इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी शिवसेवा प्रतिष्ठान ने विशेष स्मृती रोजनिशी (डायरी) २०२६ तयार केली. या वैशिष्ट्यपूर्ण रोजनिशी (डायरी) चे प्रकाशन रविवार दिनांक ७ डिसेंबर २०२५ रोजी बृहनमहाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स( BMCC )पुणे च्या टाटा सभागृहामध्ये अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. या कार्यक्रमासाठी शिवसेवा प्रतिष्ठान चे अनेक कार्यकर्ते व देणगीदार उपस्थित होते. मध्यरेल्वे पुणे विभागाचे मॅकेनिकल विभागाचे प्रमुख श्री विजय दडस व विश्व हिंदू परिषद केंद्रीय संघटन मंत्री श्री दादा वेदक यांचीही या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती होती.अतिशय सुंदर अशी सचित्र डायरी पाहून सर्व उपस्थित मान्यवर अतिशय प्रभावित झाले व शिवसेवा प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे त्यांनी भरभरुन कौतुक केले.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून वंदेमातरम् चे गाढे अभ्यासक श्री. मिलींदजी सबनिस उपस्थित होते. त्यांनी गेली ३०-३२ वर्ष वंदेमातरम् चा अभ्यास करत असताना आलेले त्यांचे अनुभव सांगितले.प्रमुख वक्ते या.स्व.संघाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य, श्री. प्रमोद कुलकर्णी लाभले होते. त्यांनी वंदेमातरम् या दोन शब्दांची ताकद किती मोठी आहे हे समजावून सांगत असतानाच शिवसेवा प्रतिष्ठान ने प्रकाशित केलेली ही अमूल्य डायरी प्रत्येकाने आपल्या संग्रही रोज ठेवावी असे आवाहन केले. आजच्या तरुण पिढीमधे यातून नक्कीच ‘ राष्ट्र प्रथम ‘ ही भावना जागृत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.कार्यक्रमाची सुरुवात भारतमातेच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन. संकेत खळदकर व गुरुराज कुंभार यांनी केले.शिवसेवा प्रतिष्ठानचे सदस्य श्री. सुनील व्हरांबळे यांनी संस्था स्थापने पासून राबवत असलेल्या सर्व उपक्रमांची माहिती सादर केली. आभार प्रदर्शन सौ मंजिरी भुसारी यांनी केले. शिवसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष, श्री.धनंजय चंद्रात्रे यांनी या डायरी प्रकाशनाचे प्रयोजन व ती तयार करत असताना मिळालेली अद्भुत माहिती व कल्पना सुचल्या पासून ती प्रत्यक्षात येई पर्यंत आलेले अनुभव अतिशय उत्साहवर्धक शब्दांत वर्णन केले.या कार्यक्रमासाठी. स्वरतरंग अकादमी च्या १५ बाल कलाकारांनी अतिशय सुरेल आणि रोमहर्षक देशभक्तीपर सादर केलेली गीते या कार्यक्रमात विशेष लक्षवेधी ठरली.शिवसेवा प्रतिष्ठान च्या सर्व कार्यकर्त्यांनी नेहमी प्रमाणेच अत्यंत मेहनतीने व उत्साहाने हा दैनंदिनी प्रकाशनाचा सोहळा यशस्वीपणे संपन्न केला.



