लोणावळ्यात २० हजारांची लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षक केकाण ACB च्या जाळ्यात; यापूर्वी १ लाख ३० हजार रुपये घेतल्याचा आरोप






मावळ मराठा न्युज -लोणावळा, गुन्ह्यातील कलमे कमी करण्यासह जामीन मिळवून देण्यासाठी मदत करण्याच्या मोबदल्यात यापूर्वी १ लाख ३० हजार रुपये स्वीकारल्याचा आरोप असलेल्या लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला आणखी २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. नाथा रामकिसन केकाण (वय ३८) असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून, सोमवार (१६ नोव्हेंबर) रोजी सायंकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास लोणावळ्यातील मॅप्रो गार्डनजवळील फूड कोर्ट परिसरात ही कारवाई करण्यात आली.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील ३३ वर्षीय तक्रारदाराच्या भावाविरुद्ध लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक नाथा केकाण यांच्याकडे होता. दाखल गुन्ह्यातील कलमे कमी करणे आणि जामीन मिळवून देण्यासाठी मदत करण्याच्या मोबदल्यात केकाण यांनी यापूर्वी वेगवेगळ्या वेळी एकूण १ लाख ३० हजार रुपये स्वीकारल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.त्यानंतर १४ नोव्हेंबर रोजी तक्रारदाराच्या भावावरील चॅप्टर केसच्या कारवाईत मदत करणे, गुन्ह्याच्या पुढील तपासात सहकार्य करणे आणि दोषारोपपत्र लवकर न्यायालयात दाखल करण्यासाठी केकाण यांनी आणखी ३० हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने पुणे ACB पथकाने लाच मागणीची पडताळणी केली. यानंतर तडजोडीअंती २० हजार रुपये स्वीकारण्याचे ठरल्याची बाब पडताळणीत समोर आली.त्यानुसार १६ नोव्हेंबर रोजी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लोणावळ्यातील मॅप्रो गार्डनजवळील फूड कोर्ट परिसरात सापळा रचला. सायंकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास पंचांसमक्ष तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षक नाथा केकाण यांना पथकाने रंगेहात पकडले. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ मधील कलम ७ अन्वये लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.या कारवाईचे नेतृत्व पोलीस निरीक्षक मिथुन म्हात्रे यांनी केले. पोलीस उपअधीक्षक सतीश वाळके यांच्या पर्यवेक्षणाखाली महिला पोलीस हवालदार वनिता गोरे, पोलीस अंमलदार रवी दिवेकर आणि चालक पोलीस हवालदार दगडू सोनवणे यांनी सापळा कारवाईत सहभाग घेतला. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.पोलीस खात्यातील जबाबदार पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याविरुद्धच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कारवाई करावी लागल्याने लोणावळा परिसरात या घटनेची चर्चा सुरू झाली आहे. शासकीय कामांसाठी लाचेची मागणी करणाऱ्यांविरोधात नागरिकांनी पुढे येऊन तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आले आहे. लाचेची मागणी झाल्यास नागरिकांना १०६४ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविता येते.



