योग सेवा अभियान फेज १ यशस्वीरीत्या संपन्न; फेज २ ला सुरुवात








मावळ मराठा न्युज -लोणावळा,मानसिक आरोग्याची जाणीव पोहोचविण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या योग सेवा अभियानाच्या पहिल्या टप्प्याचा (फेज १) समारोप महिला मंडळ हॉल, लोणावळा येथे यशस्वीरीत्या पार पडला.
हा उपक्रम सूक्ष्म योग फाउंडेशनचे संस्थापक व प्रमुख प्रशिक्षक पंकज शर्मा यांच्या संकल्पनेतून साकार झाला. “योग हा व्यवसाय नसून सेवा आहे” या भावनेतून सुरू करण्यात आलेल्या या अभियानात ९० दिवसांचा मोफत योगाभ्यास देण्यात आला.
फेज १ ची ठळक आकडेवारी
१५० पेक्षा अधिक नागरिकांनी नोंदणी केली
१२० पेक्षा अधिक सहभागी नियमितपणे ९० दिवस योगाभ्यासात सहभागी झाले
७० हून अधिक साधकांनी योग आपल्या दैनंदिन जीवनशैलीचा भाग बनवला
समारोप कार्यक्रमात नियमित योगाभ्यास करणाऱ्या साधकांचा सत्कार करण्यात आला. तसेच फेज १ चा सविस्तर अहवाल सादर करण्यात आला आणि काही सहभागी साधकांनी आपले अनुभव मनोगताच्या माध्यमातून व्यक्त केले.
या उपक्रमाच्या यशात योग शिक्षकांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले. विप्रा चौहान, अनिता मंकर, निकिता शर्मा, आयेशा शेख, प्रिया, मोनी मिश्रा आणि सोनाली या योग शिक्षकांनी संपूर्ण ९० दिवसांच्या या दीर्घकालीन, टप्प्याटप्प्याने राबविलेल्या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला व मार्गदर्शन केले.
याशिवाय महिला मंडळ, लोणावळा यांचे मोलाचे सहकार्य लाभले. महिला मंडळाच्या अध्यक्ष मनिषा बंबोरी मॅडम आणि प्रतिमा खळदकर व संपूर्ण कार्यकारणी यांनी या उपक्रमासाठी सतत मार्गदर्शन, प्रेरणा व पाठिंबा दिला.
समारोप कार्यक्रमात आयोजकांनी जाहीर केले की योग सेवा अभियानाचा फेज २ सुरू झाला असून, पुढील टप्प्यांमध्ये मावळ तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात वेगवेगळ्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. प्रत्येक टप्प्यात ९० दिवसांचा मोफत योगाभ्यास देण्यात येणार आहे.
योग सेवा अभियानाच्या माध्यमातून समाजात शारीरिक आरोग्य, मानसिक स्थैर्य व सातत्यपूर्ण योगसाधनेचे महत्त्व अधोरेखित करण्यात येत असून, योग ही आयुष्यभराची साधना असल्याचा संदेश देण्यात येत आहे.



