कार्ला खटकाळा जिल्हा परिषद गटामध्ये स्वर्गीय अजितदादा पवार यांचा रक्षा कलश दाखल; श्रद्धांजली अर्पण करताना नागरिकांना भावना अनावर







मावळ मराठा न्युज – लोणावळा,कार्ला खटकाळा या जिल्हा परिषद गटांमध्ये आज महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचा रक्षा कलश आणण्यात आला होता. पाथरगाव येथील दत्त मंदिर समोर या रक्षा कलशाचे पूजन करत स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करत ही रक्षा कलश यात्रा लोणावळा ग्रामीण परिसरामध्ये सुरू झाली. ज्या नागरिकांना आपल्या लाडक्या नेत्याच्या अंत्यसंस्कारासाठी बारामती या ठिकाणी जाता आले नाही, त्या सर्व नागरिकांना या रक्षा कलशाच्या माध्यमातून अजित दादा यांचे दर्शन होत आहे. अजित दादा यांच्या प्रतिमेला व कलशाला पुष्प अर्पण करत नागरिक त्यांना श्रद्धांजली वाहत होते. श्रद्धांजली वाहत असताना नागरिकांच्या विशेषतः महिला भगिनींच्या भावना अनावर होत होत्या. अनेकांचे डोळे हे ओले होत होते. मावळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी स्वर्गीय अजितदादा पवार यांनी आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांचा निधी दिला आहे. प्रत्येक गावामध्ये या निधीच्या माध्यमातून कोणती ना कोणती विकास कामे सुरू आहेत या सर्व गोष्टींना उजाळा या कलश यात्रेच्या निमित्त दिला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे, श्री एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे, जगद्गुरु संत तुकाराम महाराज झाड पादुका स्थान येथील अध्यक्ष व ज्येष्ठ नेते भरत येवले, लक्ष्मण बालगुडे, बाळासाहेब भानुसघरे, जिल्हा परिषदेच्या उमेदवार दीपाली हुलावळे, पंचायत समितीचे उमेदवार रेश्मा देवकर व समीर जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून यात्रेची सुरुवात करण्यात आली.
अजित दादा पवार यांच्या दुःखद निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळ करत आहे. कामाचा माणूस अशी ओळख असलेल्या या लोकनेते विषयी भावना व्यक्त करताना अनेकांच्या डोळ्यातून अश्रू ढळत होते. सध्या राज्यात सर्वत्र जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून अजितदादा यांच्या निधनामुळे कोठेही मोठ्या डामाडौलामध्ये व वाजत गाजत प्रचार न करता घरोघरी जाऊन नागरिकांना पत्रके वाटून प्रचार करण्याच्या सूचना पक्षाकडून देण्यात आले आहेत. रक्षा कलश यात्रेच्या माध्यमातून नागरिकांच्या भेटी घेत त्यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा वापर करत मावळ तालुक्यातील नागरिकांसाठी स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या आवाजामध्ये एक व्हिडिओ तयार करण्यात आला असून त्याचे सादरीकरण प्रत्येक गावामध्ये केले जात आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून व तदनंतर संबंधित गावातील प्रमुखांकडून गावातील नागरिकांना आव्हान करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना म्हणजेच घड्याळाला मत हीच अजितदादा पवार यांना खरी श्रद्धांजली असणार असल्याचे सांगत भावनिक आव्हान देखील केले जात आहे.
ग्रामीण भागातील जनता सुज्ञ आहे. आमदार सुनील शेळके व अजितदादा पवार यांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये होत असलेला विकास त्यांना माहित आहे. प्रत्येक गावामध्ये विकास कामे सुरू आहेत व ही जनता निश्चितपणे राष्ट्रवादीला मतदान करेल असा विश्वास पक्षाकडून व्यक्त केला जात आहे.



