लोणावळा महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाचे आंतरराष्ट्रीय यश; संशोधनाची जागतिक पातळीवर दखल; इंग्लंडच्या प्रतिष्ठित टेलर आणि फ्रान्सिसच्या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये संशोधन शोधनिबंध प्रकाशित








मावळ मराठा न्युज – लोणावळा : लोणावळा एज्युकेशन ट्रस्टच्या डॉ. बी. एन. पुरंदरे आर्ट्स, एस.एस.जी.जी. कॉमर्स आणि एस.एस.ए.एम. सायन्स कॉलेज, लोणावळा येथील रसायनशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. मल्हारी नागटिळक आणि प्रा. संदीप लबडे यांच्या संशोधनाची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आली आहे. “बायोफिजिकल अँड कम्प्युटेशनल इल्युसिडेशन ऑफ द इंटरमॉलिक्युलर बेंडिओकार्ब–बीएसए इंटरॅक्शन ॲट साइट I : स्ट्रक्चरल अँड डायनॅमिक पर्स्पेक्टिव्ह्स” या त्यांच्या शोधनिबंधाची इंग्लंडस्थित टेलर आणि फ्रान्सिस ग्रुप प्रकाशित जर्नल ऑफ बायोमॉलिक्युलर स्ट्रक्चर अँड डायनॅमिक्स (JBSD), प्रभाव गुणांक : २.६ (Impact Factor 2.6) या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संशोधन नियतकालिकात प्रकाशनासाठी निवड झाली आहे. या संशोधकांच्या मार्गदर्शन उपप्राचार्या प्रोफेसर डॉ. रंजना जाधव (एस. एम. जोशी महाविद्यालय, हडपसर, पुणे) आणि निवृत्त प्राचार्या प्रोफेसर डॉ. शकुंतला सावंत (रसायनशास्त्र विभाग, आर. एस. बी. महाविद्यालय, औंध-खटाव, सातारा) यांनी सहलेखक म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.मानवी आरोग्याशी थेट संबंधित संशोधनया संशोधनात बेंडिओकार्ब या कार्बामेट वर्गातील कीटकनाशकाचा मानवी शरीरावर होणाऱ्या संभाव्य परिणामांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) बेंडिओकार्बला “मध्यम धोकादायक (वर्ग २)” म्हणजेच मध्यम धोकादायक कीटकनाशक म्हणून वर्गीकृत केले आहे. आजच्या काळात अन्नपदार्थ, फळे-भाज्या आणि पेयांमधून अनेक व्यक्ती विविध कीटकनाशकांच्या संपर्कात येत आहेत. संशोधनानुसार अशा रसायनांचा दीर्घकालीन संपर्क झाल्यास ती शरीरात साचू शकतात आणि त्याचे गंभीर आरोग्यविषयक परिणाम होऊ शकतात. संशोधनात असे स्पष्ट करण्यात आले आहे की बेंडिओकार्ब हे रक्तातील अल्ब्युमिन या प्रमुख वाहक प्रथिनाशी बंध तयार करते. त्यामुळे हे कीटकनाशक शरीरात काही काळ टिकून राहते आणि विविध अवयवांपर्यंत पोहोचू शकते. यामुळे त्याची जैवउपलब्धता, शरीरातील वितरण, विषगतिज आणि शरीरातील वर्तनावर परिणाम होतो.संशोधनात नमूद केल्याप्रमाणे, दीर्घकाळ संपर्कामुळे डीएनएचे नुकसान, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस, रक्तपेशींमध्ये बदल, विविध ऊतींमध्ये विकृती, मज्जासंस्थेवरील दुष्परिणाम, चक्कर येणे, श्वास घेण्यास त्रास होणे यांसारखे गंभीर परिणाम उद्भवू शकतात. काही अभ्यासांमध्ये कर्करोगासारख्या दीर्घकालीन आजारांचा धोका वाढण्याची शक्यता देखील नमूद करण्यात आली आहे. संशोधनातील आणखी एक चिंताजनक निष्कर्ष म्हणजे घरगुती कीटकनाशकांच्या संपर्कात येणाऱ्या गर्भवती महिलांच्या शरीरातही बेंडिओकार्बचे अवशेष आढळले आहेत, ज्यामुळे मानवी शरीरातील संभाव्य संपर्क अधिक स्पष्ट होतो.संशोधनातील महत्त्वाचे निष्कर्षया संशोधनातून प्रथमच बेंडिओकार्ब आणि बोव्हाइन सीरम अल्ब्युमिन (BSA) यांच्यातील आण्विक स्तरावरील परस्परसंवाद इतक्या व्यापक पद्धतीने स्पष्ट करण्यात आला आहे. सदर संशोधनासाठी फ्लुरोसन्स स्पेक्ट्रोस्कोपी, यूव्ही–व्हिजिबल स्पेक्ट्रोस्कोपी, सीडी (सर्क्युलर डायक्रोइझम), मॉलिक्युलर डॉकिंग, डीएफटी (डेन्सिटी फंक्शनल थिअरी), १०० नॅनोसेकंद एमडी (मॉलिक्युलर डायनॅमिक्स) सिम्युलेशन, एमएम/जीबीएसए बाइंडिंग एनर्जी विश्लेषण आणि स्विसएडीएमई-आधारित एडीएमईटी विश्लेषण यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. या सर्व विश्लेषणांतून बेंडिओकार्ब हे बीएसए (बोव्हाइन सीरम अल्ब्युमिन) प्रथिनाच्या साइट I वर स्थिर पण परिवर्ती (Reversible) बेंडिओकार्ब–बीएसए संयुक्त रेणू (Complex) तयार करतो, ज्यामुळे शरीरातील त्याचा प्रवास, वितरण आणि विषारी परिणाम अधिक स्पष्टपणे समोर आले.तीन परदेशी संशोधकांचे सहकार्यया संशोधनाची आणखी एक विशेष बाब म्हणजे तीन प्रथितयश आंतरराष्ट्रीय संशोधकांनी या संशोधनात सक्रिय सहभाग नोंदवला आहे.यामध्ये— डॉ. विजयसिंह परिहार – टॅम्पेरे विद्यापीठ, फिनलंड डॉ. सीमा झरगर – किंग सौद विद्यापीठ, सौदी अरेबिया डॉ. तनवीर ए. वानी – किंग सौद विद्यापीठ, सौदी अरेबियायांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या या सहकार्यामुळे संशोधनाचा दर्जा अधिक उंचावला असून प्रगत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात आला.जागतिक दर्जाच्या नियतकालिकात प्रकाशनजर्नल ऑफ बायोमॉलिक्युलर स्ट्रक्चर अँड डायनॅमिक्स हे जैव-अणुरचना, जैवरसायनशास्त्र आणि संगणकीय जीवशास्त्र क्षेत्रातील जगातील अत्यंत प्रतिष्ठित संशोधन नियतकालिकांपैकी एक आहे. या नियतकालिकाचे प्रकाशन युनायटेड किंगडम (इंग्लंड) येथील टेलर अँड फ्रान्सिस समूह ही जगप्रसिद्ध शैक्षणिक प्रकाशन संस्था करते. या जर्नलमध्ये संशोधन प्रकाशित होणे हे कोणत्याही संशोधकासाठी मोठे आंतरराष्ट्रीय यश मानले जाते.प्रकाशनाबाबत विशेष बाबया आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये संशोधन लेख ‘ओपन ॲक्सेस’ (Open Access) स्वरूपात प्रकाशित करण्यासाठी साधारणपणे ४,७४० अमेरिकन डॉलर्स (अंदाजे ₹४.५१ लाख) इतके ‘आर्टिकल प्रोसेसिंग चार्जेस’ (APC) आकारले जातात. मात्र, सदर संशोधन लेख ‘सबस्क्रिप्शन पब्लिकेशन’ (Subscription Publication) अंतर्गत प्रकाशित झाल्यामुळे लेखकांना कोणतेही एपीसी (APC) शुल्क भरावे लागले नाही.या संशोधनामागील चिकाटी आणि संघर्षया संशोधन लेखासाठी सुमारे सहा महिन्यांचे सातत्यपूर्ण संशोधन, लेखन आणि सुधारणा कराव्या लागल्या. सुरुवातीला हा संशोधन लेख २७ डिसेंबर २०२५ रोजी एका आंतरराष्ट्रीय नियतकालिकाकडे पाठविण्यात आला होता. त्यानंतर विविध आंतरराष्ट्रीय नियतकालिकांकडे तो सादर करण्यात आला. एकूण विविध १२ आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये हा लेख क्रमाने प्रकाशनासाठी पाठविण्यात आला होता; परंतु त्यांच्या कार्यक्षेत्रात बसत नसल्याचे कारण देत स्वीकारला नाही.अखेर १३ व्या प्रयत्नात, ८ मार्च २०२६ रोजी हा लेख जर्नल ऑफ बायोमॉलिक्युलर स्ट्रक्चर अँड डायनॅमिक्सकडे पाठविण्यात आला. त्यानंतर दोन अज्ञात आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी त्याचे त्रयस्थ व तटस्थपणे परीक्षण (Peer Review) केले. १५ एप्रिल २०२६ रोजी परीक्षक आणि संपादकांकडून ३४ हून अधिक तांत्रिक प्रश्न व सूचना प्राप्त झाल्या. सर्व प्रश्नांना वैज्ञानिक पुराव्यांसह समर्पक उत्तरे देऊन शोधनिबंधामध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्यात आल्या आणि १३ मे २०२६ रोजी सुधारित लेख पुन्हा सादर करण्यात आला. सर्व सुधारणा समाधानकारक असल्याचे नमूद करत २९ जून २०२६ रोजी संशोधन लेख अंतिमतः प्रकाशनासाठी स्वीकारण्यात आला आणि आता तो अधिकृतपणे प्रकाशित झाला आहे.भविष्यातील महत्त्वहे संशोधन केवळ बेंडिओकार्ब या कीटकनाशकाच्या विषारी परिणामांपुरते मर्यादित नसून मानवी आरोग्य संरक्षण, अन्नसुरक्षा, पर्यावरणीय जोखमीचे मूल्यमापन, विषविज्ञान, तसेच भविष्यात अधिक सुरक्षित आणि पर्यावरणपूरक कीटकनाशकांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण वैज्ञानिक दिशा देणारे ठरणार आहे. या संशोधनामुळे कीटकनाशकांचे शरीरातील वर्तन, रक्तातील प्रथिनांशी होणारे परस्परसंवाद आणि त्यांचे दीर्घकालीन परिणाम समजून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण वैज्ञानिक माहिती उपलब्ध झाली आहे.प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख यांचे मनोगतमहाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख यांनी या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना सांगितले की,”लोणावळा एज्युकेशन ट्रस्टच्या डॉ. बी. एन. पुरंदरे आर्ट्स, एस.एस.जी.जी. कॉमर्स आणि एस.एस.ए.एम. सायन्स कॉलेजच्या रसायनशास्त्र विभागातील संशोधकांनी केलेल्या या संशोधनाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित जर्नल ऑफ बायोमॉलिक्युलर स्ट्रक्चर अँड डायनॅमिक्स या नियतकालिकात स्थान मिळणे ही संपूर्ण महाविद्यालयासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. आधुनिक विज्ञान, संशोधनातील नावीन्य आणि समाजोपयोगी दृष्टीकोन यांचा उत्कृष्ट संगम या संशोधनातून दिसून येतो. मानवी आरोग्य, अन्नसुरक्षा आणि पर्यावरण संरक्षणाशी संबंधित अत्यंत महत्त्वाच्या विषयावर केलेले हे संशोधन भविष्यातील वैज्ञानिक संशोधनासाठी दिशादर्शक ठरेल. या यशामुळे महाविद्यालयाची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन क्षेत्रातील ओळख अधिक दृढ झाली आहे. संशोधनातील सर्व लेखक, मार्गदर्शक आणि देश-विदेशातील सहकारी संशोधकांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. भविष्यातही महाविद्यालयामध्ये गुणवत्तापूर्ण संशोधनाला आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याला सातत्याने प्रोत्साहन दिले जाईल.”महाविद्यालयासाठी अभिमानाची बाबलोणावळा महाविद्यालयातील संशोधकांनी केलेल्या या संशोधनामुळे महाविद्यालयाच्या संशोधन परंपरेला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळाली आहे. आधुनिक स्पेक्ट्रोस्कोपी यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कीटकनाशकांच्या मानवी आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष श्री. दत्तात्रय पाळेकर, उपाध्यक्ष श्री. नंदकुमार वाळुंज (बाबूजी), सचिव अँडव्होकेट नीलिमा खिरे मॅडम, खजिनदार श्री. दत्तात्रय येवले, सहसचिव अँडव्होकेट अजय भोईर आणि संस्थेचे विश्वस्त पत्रकार विशाल पाडाळे तसेच इतर सर्व विश्वस्त व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख, उपप्राचार्य प्रा. विलास पाटील, रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. संदीप सोनटक्के, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी संशोधक आणि शोधनिबंधाचे लेखक डॉ. मल्हारी नागटिळक, सहलेखक सहाय्यक प्राध्यापक संदीप लबडे, त्यांच्या मार्गदर्शक तसेच फिनलंड आणि सौदी अरेबियातील आंतरराष्ट्रीय सहकारी संशोधक-सहलेखकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्यांच्या भावी संशोधन कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.



