अतिवृष्टीग्रस्त संपर्क बालग्राम संस्थेला फ्रेंड्स ऑफ नेचर असोसिएशनचा मदतीचा हात







मावळ मराठा न्युज – ( ऍड गणेश जगताप ) तळेगाव दाभाडे : अतिवृष्टीमुळे भाजे (मळवली) येथील संपर्क बालग्राम संस्थेच्या परिसरात दरड कोसळून मोठे नुकसान झाले. या संस्थेत ४ ते १४ वर्षे वयोगटातील अनाथ मुले वास्तव्यास असून, या आपत्तीमुळे त्यांच्या राहण्याबरोबरच जेवणाचीही मोठी अडचण निर्माण झाली होती.संस्थेने मदतीचे आवाहन केल्यानंतर फ्रेंड्स ऑफ नेचर असोसिएशन, तळेगाव यांनी तातडीने मदतीचा हात पुढे केला. संस्थेतर्फे रुपये ५,००१ चा धनादेश देण्यात आला. तसेच असोसिएशनच्या पदाधिकारी, समिती सदस्य आणि सभासदांनी वैयक्तिक स्वरूपात जमा केलेल्या रुपये १०,२०० च्या मदतीतून ७८ किलो गहू, २५ किलो तांदूळ, २० किलो तूरडाळ, १० किलो मूगडाळ, १५ लिटर खाद्यतेल तसेच इतर आवश्यक किराणा साहित्य खरेदी करून संस्थेला देण्यात आले.गुरुवार, दि. ९ जुलै रोजी सायंकाळी ७.३० वाजता निसर्गअभ्यासिका, यशवंतनगर, तळेगाव दाभाडे येथे आयोजित कार्यक्रमात हा धनादेश व किराणा साहित्य संपर्क बालग्राम संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष श्री. अमितकुमार बॅनर्जी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.यावेळी श्री. बॅनर्जी यांनी फ्रेंड्स ऑफ नेचर असोसिएशनच्या तात्काळ मदतीबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले. तसेच भविष्यात आणखी मदत किंवा श्रमदानाची आवश्यकता भासल्यास निश्चित कळवावे, असे आश्वासन असोसिएशनच्या वतीने देण्यात आले.या मदत उपक्रमात श्री. महेश महाजन, डॉ. गणेश सोरटे, श्री. ज्ञानेश्वर लष्करी, श्री. निशिकांत पंचवाघ, श्री. गणेश भोसले, ॲडव्होकेट गणेश जगताप, श्री. प्रकाश पंडित, सौ. मेधा तारे, सौ. ज्योती गोखले, श्री. सुनील गोडसे, श्री. विश्वास देशपांडे, श्री. मारुतराव सावंत आणि श्री. बाळासाहेब झोळ यांनी वैयक्तिक स्वरूपात सढळ हाताने आर्थिक मदत केली.विशेष म्हणजे, सर्व सदस्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे अवघ्या काही तासांच्या आत आवश्यक निधी संकलित करून किराणा साहित्याची खरेदी करण्यात आली आणि ते तातडीने संपर्क बालग्राम संस्थेकडे सुपूर्द करण्यात आले. या कार्यातून सामाजिक बांधिलकी आणि आपत्तीच्या काळात एकत्रितपणे उभे राहण्याचा आदर्श फ्रेंड्स ऑफ नेचर असोसिएशनने घालून दिला.



