रक्तदान, नेत्रतपासणी आणि अभंगवाणीने प्रकटदिन उत्सवाची चिंचवड येथे सांगता

मावळ मराठा न्यूज:- पिंपरी (प्रदीप गांधलीकर)दिनांक : २७ मार्च २०२३) श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळ, चिंचवड आयोजित पाच दिवसीय श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सवाची सांगता रविवार, दिनांक २६ मार्च २०२३ रोजी रक्तदान, नेत्रतपासणी आणि अभंगवाणीने बुकॉऊ वुल्फ कॉलनी पटांगण, पिंपरी – चिंचवड लिंक रोड, चिंचवड येथे करण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष दिनकर चिंचवडे, उपाध्यक्ष दीपक टाव्हरे, कोषाध्यक्ष गणपती फुलारी, सचिव संजय आधवडे, सहसचिव मीनल देशपांडे, नितीन चिंचवडे, हेमा दिवेकर, मधू जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती; तसेच हिंदू राष्ट्रसेना या संस्थेचे संस्थापक – अध्यक्ष धनंजय देसाई, सिद्ध स्वामीभक्त गणेश शिंदे यांनी सदिच्छा भेट दिली. पंडित सुधाकर चव्हाण यांचे शिष्य भक्तिगंधर्व मुकुंद बादरायणी यांनी अभंगवाणी या सांगीतिक मैफलीत संतरचना, पारंपरिक गीते आणि स्वामी समर्थ यांच्याविषयीच्या प्रासादिक भक्तिगीतांच्या सुश्राव्य गायनातून रसिकांना मंत्रमुग्ध केले. वन्स मोअर देत श्रोत्यांनी त्यांच्या गायकीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्वरदा बादरायणी आणि प्रा. लक्ष्मण अवधानी यांनी त्यांना स्वरसाथ दिली; तसेच सर्वेश बादरायणी (तबला), सुजीत लोहार (पखवाज), रवी शिधये (व्हायोलिन), मंगेश क्षीरसागर आणि मकरंद बादरायणी (तालवाद्य) यांनी साथसंगत केली. श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळाच्या वतीने सर्व कलाकारांचा सत्कार करण्यात आला. कैलास भैरट यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. त्यापूर्वी, प्रकटदिन उत्सवात पहाटे ठीक ४:३० वाजता श्रींचा केशर दुधाने अभिषेक आणि पूजा करण्यात आली. सकाळी ७:३० वाजता श्रींची आरती करण्यात आली. त्यानंतर स्वामी स्वाहाकार यज्ञास प्रारंभ झाला. ८:३० वाजता सामुदायिक गुरुलीलामृत ग्रंथ पारायण सोहळ्यात परिसरातील भाविकांनी सहभाग घेतला. सकाळी १०:०० ते दुपारी ४:०० या कालावधीत सामाजिक कार्यकर्ते राजू शिवथरे आणि पिंपरी – चिंचवड ब्लड बँक यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये ५२ रक्तदात्यांनी सहभाग घेतला. त्याचप्रमाणे ईशा नेत्रालय, चिंचवड यांच्या सौजन्याने आयोजित केलेल्या नेत्रतपासणी शिबिराचा ७५ नागरिकांनी लाभ घेतला. सायंकाळी ५:३० वाजता श्रींची आरती करण्यात आली. महेश राजोपाध्ये यांनी धार्मिक विधींचे पौरोहित्य केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page