सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पीसीसीओईआर ला पुरस्कार जाहीर

मावळ मराठा न्युज -पिंपरी, पुणे (श्रावणी कामत)दि. १० फेब्रुवारी २०२६पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट ही केजी टू पीएचडी शिक्षण देणारी देशातील एक अग्रेसर शैक्षणिक संस्था आहे. पीसीईटीमध्ये आकुर्डी, रावेत आणि साते, वडगाव मावळ अशा तीन भव्य कॅम्पसचा समावेश आहे. यामध्ये शिशुवर्ग पासून डॉक्टरेट होण्यापर्यंत उच्च शिक्षण देणाऱ्या एकूण दहा संस्थांचा समावेश आहे. यामध्ये २०१४ साली रावेत येथे स्थापन केलेल्या पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रीसर्च (पीसीसीओईआर) या महाविद्यालयाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा “उत्कृष्ट महाविद्यालय (व्यावसायिक कोर्स) पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे हे अभिमानास्पद आहे असे गौरवोद्गार पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी काढले. पीसीसीओईआर ला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा “उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार (व्यावसायिक कोर्स) २०२५-२६” जाहीर झाला आहे. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांनी तसे पत्र महाविद्यालयाला दिले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान सोहळा विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये होणार आहे. रुपये १,५०,०००/-, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. याविषयी अधिक माहिती देताना पीसीसीओईआर चे संचालक, प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांनी सांगितले की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि नाशिक येथील मराठा विद्या प्रसारक समाज मंडळाचे कर्मवीर ॲड.बाबुराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये २०२५-२६ या वर्षासाठी “सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार (व्यावसायिक अभ्यासक्रम) शहरी भाग” साठी पीसीसीओइआर ची निवड झाली आहे. यापूर्वी पीसीसीओइआर ला दोन वेळा ‘एनबीए’ (नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडिशन) मानांकन तसेच आयएसओ प्रमाणपत्र प्राप्त आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत एआयसीटीइ, नवी दिल्ली आणि डीटीइ, मुंबई यांच्या द्वारे मान्यता मिळाली आहे. नॅक (३.५४) द्वारे ‘ए++’ दर्जा मिळाला आहे. पीसीसीओईआर मध्ये ४४ पीएचडी धारक आणि ५५ पीएचडी करणारे प्राध्यापक आहेत. अत्याधुनिक पायाभूत सुविधा, शिक्षण, संशोधन आणि नवीन उपक्रमांसाठी अनुकूल वातावरण असलेल्या पीसीसीओईआरने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पहिल्या पाच महाविद्यालयात स्थान प्राप्त केले आहे. या महाविद्यालयाने आतापर्यंत ४१९ पेटंट दाखल केले आहेत. ज्यामध्ये २८५ प्रकाशित, ५० मंजूर आणि ३ पेटंट यशस्वीरित्या व्यावसायिकृत सुरू झाले आहेत. १६ फेब्रुवारी २०१८ रोजी, एकाच दिवसात सर्वाधिक कॉपीराईट अर्ज दाखल करून या महाविद्यालयाने ‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया’ चे प्रमाणपत्र मिळवले आहे. तसेच १७ डिसेंबर २०१९ रोजी, एकाच दिवशी पेटंट दाखल करणाऱ्या पीसीसीओईआरच्या ३८ महिला प्राध्यापकांना देखील ‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया’ ने मान्यता प्रमाणपत्र दिले आहे. उत्पादन विकास, नवीन उपक्रम, प्रकाशन, पेटंट आणि कॉपीराइट फायलिंग, इंक्युबेशन आणि उद्योजकता यावर आधारित प्रकल्प सादर करून उच्चशिक्षित संशोधक घडवणे यावर महाविद्यालय काम करीत असते. यासाठी नेहमीच विश्वस्त मंडळाचा पाठिंबा मिळत असतो. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी पीसीसीओईआर च्या सर्व प्राध्यापक कर्मचारी वर्गाचे हा पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page