*धर्मरक्षणाबाबत सामान्य हिंदू बेसावध – डॉ. गौतम खट्टर*

मावळ मराठा न्युज -पिंपरी (प्रदीप गांधलीकर)दि. २७ फेब्रुवारी २०२६ – ‘धर्मरक्षणाबाबत सामान्य हिंदू बेसावध असूनहिंदूंच्या अज्ञानातून आणि बेसावधपणातून होणारे मतांतर हे राष्ट्रांतर असते!’ असे ठाम प्रतिपादन डॉ. गौतम खट्टर यांनी केले. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ आयोजित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार २०२६’ सोहळा ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे गुरुवारी (दि. २६) उत्साहात पार पडला. प्रमुख अतिथी म्हणून बोलताना डॉ. खट्टर यांनी राष्ट्र, धर्म आणि संस्कृती यांचा समन्वय साधणारे राष्ट्र हीच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची संकल्पना असल्याचे सांगितले. तसेच धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या परखड विचारांचीही त्यांनी आठवण करून दिली.मंडळाच्या वतीने गेल्या सतरा वर्षांपासून राष्ट्रनिष्ठ कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना पुरस्कार प्रदान करण्यात येत असून, यंदा नलगोंडा (तेलंगणा) येथील रामावत नर्यानाईक यांना राष्ट्रीय पुरस्कार तर अकोला येथील गजानन सोलकर यांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह व प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप होते. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले.रामावत नर्यानाईक यांनी नलगोंडा जिल्ह्यात सात हजारांपेक्षा अधिक धर्मांतरित हिंदूंची घरवापसी घडवून आणल्याचा उल्लेख करण्यात आला. त्यांनी गोरमाटी भाषेत केलेल्या मनोगतात अंधश्रद्धा व अज्ञानामुळे धर्मांतर नव्हे, तर मतांतर घडते; ‘मतांतर’ हा शब्द अधिक योग्य असल्याचे मत व्यक्त केले. गजानन सोलकर यांनी अकोला जिल्ह्यातील ५३ पैकी ४१ गावांमध्ये घरवापसीचे कार्य केल्याचे सांगितले. सावरकरांच्या नावाने मिळालेला हा सन्मान म्हणजे पुनर्जन्मच असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन, ग्रंथपूजन व शस्त्रपूजनाने झाली. सचिव ॲड. हर्षदा पोरे यांनी प्रास्ताविकातून मंडळाच्या कार्याचा आढावा घेतला. शैलेश भिडे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला, तर नारायण देशपांडे यांनी आभार व्यक्त केले. ध्वनिचित्रफितीद्वारे पुरस्कारार्थींच्या कार्याचा परिचय सादर करण्यात आला. विराज सवाई यांनी सूत्रसंचालन केले. शुभांगी डोंगरे यांनी सादर केलेल्या ‘वंदे मातरम्’ गीताने सोहळ्याची सांगता झाली.कार्यक्रमाला सावरकर प्रेमींसह शहरातील विविध क्षेत्रांतील नागरिक, लोकप्रतिनिधी व संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page