लोणावळ्यातील दिव्यांग बांधवांच्या उदरनिर्वाह भत्त्यात वाढ, आता वर्षाला १८ हजार ऐवजी मिळणार ३० हजार


मावळ मराठा न्यूज – लोणावळा नगर परिषद हद्दीतील दिव्यांग बांधवांना मिळणाऱ्या उदरनिर्वाह निधीत दरमहा १००० रुपयांनी चालू आर्थिक वर्षापासून वाढ करण्यात आली आहे अशी माहिती लोणावळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी दिली.लोणावळा नगर परिषद हद्दीत राहणाऱ्या जवळपास २०० अपंग,अंध बंधू, भगिनींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. लोणावळा नगरपरिषदेच्या माजी नगर अध्यक्षा सुरेखा जाधव आणि माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी ह्या शहरातील अपंग ,अंध बांधवांसाठी ही योजना सुरू केली होती.त्यावेळी महिना १५०० म्हणजे वर्षाला १८००० रुपये त्यांचा उदरनिर्वाह साठी मिळत होते. आता देखील जाधव आणि पुजारी यांनी सदर रक्कम ही उदरनिर्वाह साठी तुटपुंजी आहे त्यात वाढ करून ती ३६ हजार वर्षाला करण्यात यावी असे लेखी पत्र २० डिसेंबर २०२२ रोजी दिले होते. ह्या त्यांच्या पत्राचा विचार करून मुख्याधिकारी तथा प्रशासक पंडित पाटील यांनी वार्षिक ३० हजार म्हणजेच महिन्याला २५०० रुपये केली आहे. त्यामुळे अपंग आणि अंध बंधू भगिनींना महागाई मुळे उदर निर्वाह भत्ता यात १ महिन्याला हजार रुपयांनी वाढ झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.




