श्रीमंत प्रतापशेठजी एक आदर्श व्यक्तिमत्व

मावळ मराठा न्यूज :-अमळनेर,आदर्श व्यक्तिमत्व ही पातळी ज्यांना त्यांच्या लहानपणीच नियतीने घडविण्यासाठीचे योजिले होते त्यात तशा परिस्थितीने हुंकार दिला. अन्यथा ज्या मुलाला चोपड्याचे शेठजींचा वारसदार म्हणून निवड करण्यासाठी राजस्थानला गेलेल्या शेठजींच्या जाणकार मंडळींनी प्रश्न विचारला, जसे इतरांना त्यांनी विचारले तू कोण होणार? आणि श्रीमंत प्रतापशेठजींनी जे ग्रामीण भागात लहानपणी शेळी मेंढी चारण्याचे काम करीत असत त्यांनी त्याच क्षणी सांगितले की मी राजा होणार… चोपड्याला आल्यावर शेटजी जिथे दत्तक गेले त्यांचा कपाशी जिनिंगचा उद्योग होता. त्यात शेठजींनी भरभराट करीत त्यातूनच पुढील व्यवसाय म्हणून कापड विक्रीचा उद्योग करण्याचा बेत आखला. श्रीमंत प्रतापशेठजी कापड विक्रीच्या उद्योग संबंधात येवला येथे गेले असताना तेथील एका मोठ्या व्यापारी यांच्याशी चर्चा करीत असताना त्यांचे गुणवैभव पाहून त्या व्यापाऱ्यांने शेठजींना कापड विक्रीचा उद्योग काय करतोस कापडाची गिरणी काढ असे सुचविले. शेठजींनी त्यांना त्वरित सांगितले, माझ्याकडे एवढे पैसे नाहीत येवल्याच्या व्यापाऱ्यांनी त्यांना भागभांडवल मार्गाने पैसा उभा करण्याची सुचविले, यावर शेठर्जींनी शंका उपस्थित केली की, माझे भाग कोण घेईल ? कारण भाग घेण्याकरिता कंपनीचा सूचक (प्रमोटर) चा इतिहास पाहिला जातो. प्रगतीचा आलेख पाहिला जातो त्यावर येवल्याच्या शेठजींनी सांगितले तू भाग विक्रीला काढ, जेवढे विक्री होतील तेवढी विक्री कर. राहिलेले भाग घेणेस मी बांधील आहे असे आश्वासन दिले. त्याचवेळी पहिल्या महायुद्धाची पूर्वतयारीचे वातावरण तयार होत होते. शेटजींनी जुनी मशिनरी विदेशातून म्हणजेच इंग्लंड येथील मँचेस्टर, लंकशायर येथून मागविली. महायुद्धात इंग्लंडचे औद्योगिक नुकसान जबर झाले. त्याचा फायदा प्रताप मिलला झाला. कापड निर्यात वाढली. ग्रामीण भागातून सहा महिन्याच्या विश्वासावर उधारीने कापूस मिळे. त्याचवेळी शेठजी पंचक्रोशीत त्यांच्या कर्तुत्वाने नावारूपाला आले होते. शेठजींनी कापड उद्योगाबरोबरच सामाजिक बांधिलकीचे कार्य एका मागोमाग एक सुरू ठेवले होते. आयुर्वेदिक औषधांसाठी रसायन शाळा, धर्मार्थ तत्त्वावर प्रताप रुग्णालय त्यानंतर शैक्षणिक गरज ओळखून शिक्षण क्षेत्रात खानदेश शिक्षण मंडळाच्या माध्यमातून अमळनेर येथे हायस्कूल, कॉलेज उभे केले होते. हायस्कूल व महाविद्यालयासाठी लागणारी जागा अमळनेरातील दानशूर व्यक्तींनी दान केल्या होत्या. आज अमळनेरात नावारुपाला आलेल्या डी आर कन्या हायस्कूलला भांडारकर परिवाराने जागा दिली होती व त्याचे ऋण म्हणून त्या शाळेला भांडारकर परिवारातील मातोश्री द्रोपदीबाई रामचंद्रशेठ यांचे नाव देण्यात आले. यामध्ये ”भांडारकर परिवारांची आई ती माझी आई” असे गौरवपूर्ण उदगार भांडारकर परिवाराबद्दल प्रतापशेठजींनी काढले होते. यामध्ये सामाजिक कार्याचा उद्देश दिसून येतो. त्यानंतर प्रतापशेठजींनी तत्त्वज्ञान मंदिरातून त्यांच्या ज्ञानाच्या तळमळीची साक्ष दिली. त्यानंतर लागलीच त्यांनी तत्त्वज्ञान मंदिरात त्यांचे गुरु सावळाराम नाईक गुरुजींचा पूर्णाकृती पुतळा उभारून त्याची चिरंतन स्मृती जपली. त्याचबरोबर अमळनेरात भव्यदिव्य असे श्रीराम मंदिराची आपल्या सह-धर्मचारिणीच्या इच्छेखातर स्थापना केली. पंचक्रोशीत असलेल्या आपल्या विषयीच्या आदराला त्यांनी कधीही तडा जाऊ दिला नाही. शेठजींनी सगळ्या संस्था लोकांच्या सहकार्याने चालविल्या. त्यांनी कधीही आंधळ्यासारखे दान केले नाही व संस्थांच्या कामकाजात कधीही हस्तक्षेप केला नाही. त्यांना परिणामाचे स्वारस्य होते. त्यांच्यात माणसाला पारखण्याची एक अनुभवातून आलेली कला होती. पुढे प्रताप गिरणीच्या उद्योगात स्पर्धा आली त्यांनी आपला विस्तार हा धुळे, चाळीसगाव येथे भागीदारी करून उभा केला. त्यांनी दत्तक घेतलेल्या मुलाला कापड धंद्याऐवजी चित्रपट क्षेत्राकडे रुची असल्याने त्याला पूर्ण स्वातंत्र्य दिले. अशा परिस्थितीमध्ये कापड मिल शेवटचे घटके मोजत असताना, त्या मिलमध्ये असलेल्या कामगारांची उपासमार होऊ नये म्हणून शासन दरबारी आपले वजन वापरून शासनास प्रताप मिल चालविण्यास भाग पाडले. व्यापारी असूनसुद्धा शेठजीं देशासाठी असलेले आपले कर्तव्य कधीही विसरले नाहीत. स्वातंत्र्य चळवळीत भाग घेणाऱ्या आपल्या कामगार बंधूची तसेच स्वातंत्र्य सैनिकांची, त्यांच्या परिवाराची ते नेहमी काळजी करीत असत. आपल्याकडून शक्य असलेली पाहिजे ती मदत ते करत. कामगारांच्या सुरु असलेल्या संपात परमपूज्य साने गुरुजी जेव्हा तापी नदीवर जीव देण्यास निघाले होते तेव्हा त्यांना प्रतापशेठजींनी अशी टोकाच्या भूमिका घेण्यापासून परावृत्त केले व माघारी बोलावले. त्याचवेळी अधिकार वाणीने सांगितले, ‘हे तुमचे क्षेत्र नाही, गैरसमज करू नका’ आणि गंमतीची गोष्ट म्हणजे गुरुजींनीही नंतर कामगार क्षेत्रापासून अंतर ठेवले. भावना आणि व्यवहार या मधले अंतर त्यांना प्रतापशेठजींनी दाखवून दिले. दुर्दैवाने भावनिक होऊन पुढे साने गुरुजींना आत्महत्या करावी लागली तो एक वेगळा विषय आहे.जय हिंद जय महाराष्ट्र सदरचा लेख प्रताप मिलमधील कर्मचारी दिपक रामदुलारी तिवारी यांनी लिहिलेला असून या लेखाचे शब्दांकन ज्येष्ठ व मुक्तपत्रकार श्री राजेंद्र सुतार व श्री योगेश पाने यांनी केले आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page