सामाजिक जाणिवेतून राज्यातील पत्रकार संघ ही कामं करतात- एस एम देशमुख

कर्जत येथील पत्रकारांचा सन्मान सोहळा

मावळ मराठा न्युज -कर्जत,पत्रकारांबद्दल कोणी कितीही नाकं मुरडू देत,एक वास्तव कोणी नाकारू नये,महाराष्ट्रातील अनेक तालुका पत्रकार संघ पत्रकारांच्या हितासाठी, त्यांच्या ऐक्यासाठी तर काम करीत असतातच त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी जपत आपल्या भागाच्या विकासासाठी, समाजाहितासाठीही कार्य करताना दिसतात. कुठे रक्तदान शिबिरं , कुठे वृक्षारोपण, कुठे प्रदूषण विरोधी चळवळ, गावातील अतिक्रमण विरोधी मोहिमा आदि बरोबरच गाव दत्तक घेऊन त्या गावाचा सर्वागिण विकास करण्याची जबाबदारी पत्करलेली काही तालुका, जिल्हा पत्रकार संघ राज्यात आहेत.रायगड प्रेस क्लबनं मुबई – गोवा महामार्गासाठी गेली पंधरा वर्षे सलग चळवळ चालवून ती यशस्वी करून दाखविली, मुरूड तालुका पत्रकार संघानं “जंजिरा मुक्ती दिन” शासकीय स्तरावर साजरा करावा यासाठी शांततेच्या मार्गानं पाठपुरावा सुरू ठेवलाय.. रत्नागिरी तालुका पत्रकार संघ असेल, किंवा संग्रामपूर तालुका पत्रकार संघ असेल यांनी गावं दत्तक घेऊन त्या त्या गावच्या विकासाची जबाबदारी पत्करली.मराठवाड्यातील अतिवृष्टीच्या काळात काही तालुका संघ शेतकरयांच्या मदतीला धावून गेले.. गावागावात जाऊन गरजूंना मदत केली..ही सारी पत्रकारांची कामं आहेत का? असा प्रश्न जर कोणी विचारला तर ठामपणे सांगेल की, “हो समाजासाठी योगदान देणं हे समाजाचा एक घटक या नात्यानं पत्रकारांचं आणि त्यांच्या संघटनेचं कामच आहे” . सामाजिक जाणिवेतून राज्यातील पत्रकार संघ ही कामं करतात, मात्र माध्यमात असताना देखील पत्रकारांची, संघटनांची ही कामं जनतेपर्यंत पोहोचतच नाहीत.त्यांच्या कामाचं कौतूक ही व्हायला हवं.. दुर्दैवानं तेही होत नाही.. मला जेव्हा या वास्तवाची जाणीव झाली तेव्हा, सर्वोत्कृष्ट कार्य करणारया तालुका आणि जिल्हा संघांचा राज्यस्तरावर गौरव करायचा निर्णय अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही घेतला.प्रत्येक महसूल विभागातून एक तालुका पत्रकार संघ आणि राज्यातून एक जिल्हा संघ निवडून त्यांचा गौरव करायचा अशी ही कल्पना.ग्रामीण पत्रकारांसाठी सातत्यानं कार्य करणारे वसंतराव काणे आणि संचारकार पत्रमहर्षी रंगाअण्णा वैद्य यांच्या नावानं दहा वर्षांपुर्वी ही पुरस्कार योजना सुरू झाली.. पहिला कार्यक़म नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाला.. त्यानंतर पाटण, गंगाखेड, वडवणी, अक्कलकोट, कर्जत (अहिलयानगर) बोर्डी (पालघर) माहूर, सेलू, आदि ठिकाणी हे पुरस्कार वितरण सोहळे पार पडले.. यंदा रायगड जिल्ह्यात कर्जत येथे गौरव सोहळा दणक्यात पार पडला.नुकताच कर्जतरायगड येथे ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई, आयबीएन मराठीचे संपादक मंदार फणसे, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते चामोर्शी (गडचिरोली) बेला (नागपूर) अंबाजोगाई (बीड) पळूस (सांगली), मनमाड (नाशिक) पनवेल (रायगड) संग्रामपूर (बुलढाणा) आंबेगाव (पुणे) किनवट (नांदेड) मुंबई उपनगर आदि पत्रकार संघाना गौरविण्यात आले.राज्यभरातून ८०० पत्रकार सोहळयास उपस्थित होते.कर्जत प्रेस क्लबने आयोजनाची जबाबदारी स्वीकारली होती.. अत्यंत दिमाखात सोहळा पार पडला. परिषदेचे पदाधिकारी तसेच पाहुण्याचं गावाच्या वेशिवर स्वागत करून उघड्या जीपमधून मिरवणूक काढत सभास्थानी आणलं गेलं.आलेल्या पाहुण्याचं स्वागत, आदरातिथ्य, भोजन व्यवस्था सारं काही जबरदस्त होतं..सोहळा यथासांग पार पडला. कर्जतयेथील हा कार्यक्रम आयुष्यातील अविस्मरणीय दिवस ठरला असेही देशमुख यांनी आवर्जून सांगितलं . परिषद म्हणजे कुटुंब . कुटुंबात दिसणारा जिव्हाळा, आपलेपण, प्रेम हे सारं कर्जत मध्ये दिसलं. पुरस्कार वितरण सोहळा कमालीचा यशस्वी झाला.आयोजक कर्जत प्रेस क्लब कुठंही आणि कशातही कमी पडले नाहीत.संजय मोहिते, दर्वेश पालकर आणि कर्जत प्रेस क्लबच्या टिमनं पंधरा दिवस प्रचंड मेहनत घेतली. असे कट्टर कार्यकर्ते परिषदेजवळ आहेत हेच परिषदेचं बळ आहे.यशाचं गमक आहे.तुम्हा सर्वांची परिषदेला कायम गरज असणार आहे. असे मत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी व्यक्त केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page