भांबर्डे येथील संपर्क विद्यालयाला तालुक्यात प्रथम क्रमांक







मावळ मराठा न्युज -भांबर्डे, ता. मुळशी : पुणे जिल्हा परिषद (माध्यमिक शिक्षण विभाग) व पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये राबविण्यात आलेल्या शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियानात संपर्क ग्रामीण विद्या विकास केंद्र, भांबर्डे या विद्यालयाने गट अ (इयत्ता ५ वी ते १२ वी) मध्ये तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे.या उल्लेखनीय यशामुळे विद्यालय परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामीण भागातील शैक्षणिक क्षेत्रासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती, शिक्षकांचे समर्पण, शिस्तबद्ध वातावरण आणि पालकांचा विश्वास या बळावर विद्यालयाने हे यश संपादन केले आहे.या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ गुरुवार, दिनांक २३ एप्रिल २०२६ रोजी गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट, पुणे येथे मोठ्या उत्साहात पार पडला. महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालक (माध्यमिक) डॉ. महेश पालकर, पुणे विभागीय उपसंचालक डॉ. गणपत मोरे, पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर, राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव नंदकुमार सागर, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रसाद गायकवाड, सचिव शिवाजी कामथे तसेच कार्याध्यक्ष राजेश गायकवाड यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी संस्थेच्या वतीने सौ. नवनिता चॅटर्जी दीदी, प्राचार्य श्री दत्तात्रय चाळक, श्री रफिक पठाण, श्री कैलास खरात, श्रीमती शबानाबी इनामदार, श्री गणेश बुरकुले, श्री योगेंद्र कुलकर्णी व श्री विश्वनाथ पदमुले यांनी पुरस्कार स्वीकारला.या कार्यक्रमास मुख्याध्यापक संघाचे आजी-माजी पदाधिकारी, शहर व तालुका अध्यक्ष, सचिव तसेच जिल्हाभरातून साडेतीन हजारांहून अधिक मुख्याध्यापक, संस्थाचालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.या यशाबद्दल विद्यालयाचे संचालक मंडळ, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग, माजी विद्यार्थी तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



