कलापिनीच्या रंगमंचावर गंधर्व युग अवतरलेपं. साखवळकर, पं. आल्पे आणि संपदा थिटे यांचे बहारदार गायन








मावळ मराठा न्युज -तळेगाव दाभाडे,कलापिनी संस्थेत कै. सौ. कमलिनी व कै. ऍडव्होकेट पुरुषोत्तम परांजपे स्मृतीपुष्प अर्पण कार्यक्रम झाला ‘देणे गंधर्व युगाचे’! त्या निमित्ताने सुरगंधर्व पं. सुरेशजी साखवळकर यांच्या सहस्रचंद्रदर्शन आणि पं. विनोदभूषणजी आल्पे यांच्या अमृतमहोत्सव निमित्ताने त्यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. बाल गंधर्व, छोटा गंधर्व, देव गंधर्व, कुमार गंधर्व यांच्या निवडक रचना रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा हा रंजक, श्रवणीय आणि प्रेक्षणीय कार्यक्रम कलापिनी कलामंडळाने आयोजित केला होता.गंधर्वकालीन माहौल प्रवेशद्वारापासून सुरू झाला होता. नऊवारी आणि पारंपरिक दागिने परिधान केलेल्या कलापिनी महिला मंचाच्या भगिनींनी हळदीकुंकू, अत्तर आणि गुलाबपाण्याने स्वागत करून पुढे होऊ घातलेल्या कार्यक्रमाची चाहूल दिली. पुढे फुलांच्या सुंदर रांगोळीने लक्ष वेधून घेतले. समोर रंगमंच, ठेवणीतल्या पैठण्या आणि तत्सम साड्यांनी आकर्षक सजविला होता. पावसाने आदल्या दिवशी केलेल्या दंगा विसरायला लावेल असे वातावरण होते. कार्यक्रमाची सुरुवात दोन्ही उत्सवमूर्तीना औक्षण करून झाली. त्यानंतर नटराजपूजन करून श्री अभ्यंकर यांनी छोटेखानी भाषण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. डॉ. परांजपे यांनी प्रास्ताविक केले. दादा म्हणजे ऍडव्होकेट पुरुषोत्तम परांजपे यांच्या कल्पनेतून साकारलेला ‘देणे दोन गंधर्वांचे’ हा कार्यक्रम पुढे १२ गंधर्वांचा व्हावा ही इच्छा डॉक्टरांनी मांडली. मंचावरील दिग्गज लोकांचे मार्गदर्शन मिळून कलापिनीचे एखादे संगीत नाटक व्हावे असेही डॉक्टर परांजपे म्हणाले. पं.सुरेशजी साखवळकर, पं. विनोदभूषणजी आल्पे यांना पारंपरिक पद्धतीने शाल, श्रीफळ व पेशवाई पगडी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला, तर गायिका संपदा थिटे, स्मिता आल्पे, साथ संगतीसाठी आलेले मान्यवर संजय गोगटे, माधव मोडक आणि सुरेश कुलकर्णी यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. उत्सवमूर्तींनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. गंधर्व युग अनुभवलेले पं. साखवळकर यांनी तळेगावची श्रीमंती कशात आहे हे सांगितले. पं. आल्पे यांनी लहानपणीच्या आठवणी सांगितल्या. सत्कारमूर्तींचा परिचय आणि सूत्रसंचालन ऋचा पोंक्षे ह्यांनी केले. मंगेश राजहंस यांनी आभार प्रदर्शित केले.साखवळकर सरांच्या षष्ट्यब्दी पूर्तीला “देणे गंधर्वांचे” हा कार्यक्रम साजरा झाला होता. त्यावेळी ऍडव्होकेट पु. वा. परांजपे उपस्थित होते आणि असेच कार्यक्रम करत रहा असे सांगितले होते. अमृत महोत्सवी वर्षात त्यांनी “देणे दोन गंधर्वांचे” सादर झाला. त्याच वेळेला सहस्रचंद्र दर्शनाला “देणे गंधर्व युगाचे” असा कार्यक्रम करणे असे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार बालगंधर्व, छोटा गंधर्व, कुमार गंधर्व आणि देवगंधर्व भास्कर बुवा बखले यांच्या रचनांवर आधारित हा कार्यक्रम सादर करण्यात आला. शाकुंतल नाटकातील नांदीने रंजक व श्रवणीय अशा कार्यक्रमाची सुरुवात झाली. सर्वच नाट्य पदांची निवड विचारपूर्वक केली होती आणि पंडित साखवळकर त्यांच्या शैलीत प्रत्येक पदाशी निगडीत असलेल्या आठवणी रंगवून सांगत होते आणि त्या संगीत नाटकांच्या दुनियेत प्रेक्षकांना घेऊन जात होते. स्वकुल तारक सुता, लाल शाल जोडी, मधुकर वन वन फिरत, अजून रुसून आहे, चांद माझा हा हसरा, विराट ज्ञानी, नैया मोरी निक निक हे निर्गुणी भजन, फुलला मनी वसंत बहार, तू माझी माऊली, लई नाही मागणे ह्या गाण्यांनी सगळे श्रोते अगदी तृप्त झाले होते. अजूनी ऐकायचे आहे…. अशी अवस्था झाली होती. ह्या गाण्यासोबत त्यांची वैशिष्ट्ये कळून गाणी ऐकण्याचा अनुभव तर वेगळ्याच स्तरावरचा होता. ८२व्या आणि ७५व्या वर्षी असे सादरीकरण असेल तर त्यांच्या तरुणपणीची गायकी काय असेल ह्याची कल्पना करता येत नाही. बहारदार कार्यक्रम झाला. आवर्जून नमूद करावे असे वाटते, ते म्हणजे संजय गोगटे यांचे ऑर्गनची आणि माधव मोडक यांची तितक्याच ताकदीची तबल्यावरची साथ. खरंतर महत्वाचे म्हणजे गाण्याचे बारकावे …. भीमपलासचा वर्ज निषाद घेऊन गाणे प्रस्तूत करणे, वेगवेगळे ताल एक गाण्यात घेणे, मध्येच सुरुवात करून समेवर येणे, कुमार गंधर्वांच्या खन्कन समेवर येण्याची लकब, त्याचा तानपुरा लावण्याचा हातखंडा,आणि असं बरंच काही मनात साठवून, भरल्या आणि तृप्त मनाने श्रोते घरी परतले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कलापिनीच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.



