*महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना करा; स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाने द्या – महेश पाटील*








मावळ मराठा न्युज -येरवडा, पुणे – येरवडा पोलीस स्टेशन अंतर्गत शास्त्रीनगर चौक येथे महिलांनी मोठ्या संख्येने एकत्र येत नसरापूर (ता. भोर) आणि पर्वती-स्वारगेट परिसरात अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचारांच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन केले. या आंदोलनातून महिलांमध्ये वाढत चाललेली असुरक्षिततेची भावना स्पष्टपणे व्यक्त झाली.या वेळी 70 वर्षीय इंगळे आज्जी यांच्यासह अनेक महिलांनी हातात फलक घेऊन सिग्नलवर उभे राहून “न्याय हवा”, “आरोपीला फाशी द्या” अशा घोषणा दिल्या. “अशा हृदय हेलावून टाकणाऱ्या घटना थांबल्या पाहिजेत, अन्यथा आम्हाला न्याय मिळवण्यासाठी कठोर पावले उचलावी लागतील,” असा संतप्त सूर महिलांनी व्यक्त केला.साम्राज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश पाटील यांनी आंदोलनात सहभागी होत महिलांच्या स्वसंरक्षणासाठी पोलीस प्रशासनाने शस्त्र परवाने देण्याची मागणी केली. तसेच, अशा गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा, आवश्यक असल्यास फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली.कविता घाडगे यांनी, “अशा घटना वारंवार घडत असतील तर महिलांना सुरक्षितता कशी मिळणार?” असा प्रश्न उपस्थित करत प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर सवाल उपस्थित केला.नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचार व हत्येच्या घटनेने संपूर्ण समाज हादरला असून, ही केवळ एक घटना नसून मानवतेवर झालेला क्रूर आघात असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. “हा प्रश्न एका आरोपीपुरता मर्यादित नसून समाजात वाढत चाललेल्या विकृत मानसिकतेचा आहे,” असे मत आंदोलनकर्त्यांनी मांडले.तसेच, पर्वती-स्वारगेट परिसरात नऊ वर्षांच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचाही तीव्र निषेध करण्यात आला. आंदोलनादरम्यान “नराधमाला फाशी द्या”, “कठोर शिक्षा द्या” अशा घोषणा देत संतप्त भावना व्यक्त करण्यात आल्या.या जनआक्रोशात स्थानिक नागरिकांसह रस्त्यावरील वाहनचालकांनीही थांबून सहभाग नोंदवला. समाज जागृत व्हावा आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सर्वांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले.या आंदोलनात महेश पाटील, कविता घाडगे, प्रसाद तनपुरे, सुनंदा कांबळे, संध्या शिंदे, मंगल भोसले, सागर वानखेडे, वर्षा आयटे, कौसल्या इंगळे, वैशाली चौहान, नंदा सोनावणे, सुलभा बुचुंडे, नैन्सी कदम, ओंकार लोंढे, अयान शेख यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.vही फक्त एका चिमुकलीची लढाई नाही, तर प्रत्येक मुलीच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. ‘न्याय हवा’ हा घोष नसून प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे,असा ठाम संदेश या आंदोलनातून देण्यात आला.



