*बुद्धविचार हा समाज जोडणारा विचार! – डॉ. श्रीपाल सबनीस; प्रा. डाॅ. महेश देवकर लोकशिक्षक बाबा भारती साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित*








मावळ मराठा न्युज – पिंपरी (प्रदीप गांधलीकर) दिनांक : २४ जुलै २०२६ ‘विश्वाला शांततेची गरज आहे. या पार्श्वभूमीवर बुद्धविचार हा समाज जोडणारा विचार आहे!’ असे प्रतिपादन ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रस्ता, पुणे येथे गुरुवार, दिनांक २३ जुलै २०२६ रोजी केले. महाराष्ट्र साहित्य परिषद – पुणे, लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान – पिंपरी आणि महात्मा फुले महाविद्यालय – पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने पाली – मराठी भाषेचे पहिले शब्दकोशकार बाबा भारती यांच्या स्मरणार्थ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील बुद्धिस्ट स्टडीज विभागप्रमुख प्रा. डाॅ. महेश देवकर यांना लोकशिक्षक बाबा भारती साहित्यरत्न पुरस्कार प्रदान करताना डाॅ. श्रीपाल सबनीस बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषद – पुणे अध्यक्ष योगेश सोमण, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले यांची व्यासपीठावर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची सभागृहात प्रमुख उपस्थिती होती. सन्मानचिन्ह, रोख ₹५०००/-, संविधानाची उद्देशिका, शाल असे सन्मानाचे स्वरूप होते. डॉ. श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले की, ‘भारतीय संस्कृतीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी जातीयवादाला मूठमाती देऊन व्यापक मानवतावादी भूमिका अंगीकारणे आवश्यक आहे. पाली ही संस्कृती समृद्ध करणारी प्राचीन भाषा असून लोकभाषा आणि प्रमाणभाषा यांचा समन्वय गरजेचा आहे. याबाबत कोणतेही पद अथवा पदवी नसताना बाबा भारती यांनी गेल्या शतकात छोट्याशा गावात राहून केलेले पाली भाषा संवर्धनाचे कार्य महनीय आहे; तसेच महेंद्र भारती यांनी जपलेला वडिलांचा बौद्धिक अन् वैचारिक वारसा अतिशय स्तुत्य आहे!’ योगेश सोमण यांनी, ‘अंत:करणातील प्रज्ञेची ज्योत प्रज्वलित झाली की महेश देवकर यांच्यासारखे डोळस व्यक्तिमत्त्व घडते!’ असे गौरवोद्गार काढले. प्रदीप निफाडकर यांनी बाबा भारती यांच्या मराठी ‘धम्मपदा’तील काव्यपंक्ती उद्धृत करीत आपण राहुल सांस्कृत्यायन किंवा धर्मानंद कोसंबी यांना पाहिले नाही; परंतु आपण महेश देवकर यांना पाहिले आहे, असे अभिमानाने म्हणू शकतो!’ असे मत व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना प्रा. डाॅ. महेश देवकर यांनी आपल्या मनोगतातून, ‘भगवान बुद्ध आणि महावीर हे खऱ्या अर्थाने लोकशिक्षक होते. बाबा भारती यांचा पाली – मराठी शब्दकोश हा परिपूर्ण असून पाली भाषेच्या अभ्यासाने मला निकोप दृष्टिकोन प्रदान करून माणूस म्हणून घडविले. बाबा भारती यांचे कार्य विस्मरणात गेले असताना महेंद्र भारती यांनी ते समाजापुढे आणले आहे. कोणत्याही भाषेला धर्माशी जोडणे ही संकुचित वृत्ती आहे!’ अशा भावना व्यक्त केल्या.दीपप्रज्वलन आणि बाबा भारती यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. राम सर्वगौड यांनी बाबा भारती गौरवगीताचे गायन केले. यावेळी कोरिया आणि व्हिएतनाम येथील पाली भाषेच्या दोन विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. पुरुषोत्तम सदाफुले, आनंदा कांबळे, रवींद्र भारती, निमिष भारती, प्रकाश कांबळे, विजय कांबळे, शार्दुल भारती, जय भारती, अमोल ढाले, सुजल कांबळे यांनी संयोजनात सहकार्य केले. सीमा गांधी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डाॅ. पांडुरंग भोसले यांनी आभार मानले.



