शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक; खुल्या वयोगटात सुवर्णपदकाची कमाई; जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

मावळ मराठा न्युज -मावळ तालुक्यातील उर्से येथे झालेल्या शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसे येथील पवना विद्या मंदिर विद्यालयाचा विद्यार्थी ओंकार सचिन ठाकर याने खुल्या वयोगटात प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक मिळविले. इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या ओंकारने कुस्तीच्या मैदानावर दमदार कामगिरी करत जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे.क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच मावळ तालुका क्रीडा शिक्षक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने उर्से येथील जय बजरंग तालीम, श्री पद्मावती मंदिर परिसरात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत मावळ तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.ओंकारने आपल्या गटातील प्रतिस्पर्ध्यांशी जोरदार लढत देत कुस्तीचे उत्कृष्ट डावपेच सादर केले. आत्मविश्वास, ताकद, चपळाई आणि नियमित सरावाच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांवर मात करत त्याने प्रथम क्रमांक पटकावला. दहावीच्या अभ्यासासोबतच कुस्तीच्या सरावावर लक्ष केंद्रित करून मिळविलेले ओंकारचे हे यश विशेष कौतुकास्पद ठरले आहे. तालुकास्तरीय स्पर्धेतील या कामगिरीमुळे त्याची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.ओंकारच्या यशाबद्दल नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री संजय तथा बाळा भेगडे, संस्थेचे सचिव व शालेय समितीचे अध्यक्ष संतोष खांडगे, मुख्याध्यापक शितल शेटे आणि पर्यवेक्षक रोशनी मराडे यांनी त्याचे अभिनंदन केले.ओंकारला कुस्तीच्या सरावासाठी शाळेतील शिक्षक गणेश ठोंबरे, राजकुमार वरघडे, भारत काळे, सुनिता कळमंकर, ज्योती कोंडभर, सुप्रिया पुंडले आणि निकीता काळे यांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षकांचे मार्गदर्शन, कुटुंबीय व ग्रामस्थांचे प्रोत्साहन आणि नियमित मेहनतीच्या जोरावर ओंकारने हे यश संपादन केले.ओंकारच्या या कामगिरीमुळे येळसे गावासह पवना विद्या मंदिर विद्यालयाचे नाव क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल झाले आहे. जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेतही त्याने उल्लेखनीय कामगिरी करावी, अशा शुभेच्छा शिक्षक, कुटुंबीय, ग्रामस्थ आणि मित्रपरिवाराकडून देण्यात आल्या.मावळ मराठा न्युज परिवाराच्या वतीने पैलवान ओंकार ठाकर याचे मनापासून अभिनंदन.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page