*संपर्क संस्थेसाठी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल eClerx कंपनीला प्रतिष्ठित ‘महात्मा पुरस्कार’; २७ हजारांहून अधिक नागरिकांच्या जीवनात घडविला सकारात्मक बदल*

मावळ मराठा न्युज -लोणावळा, प्रतिनिधी :सामाजिक विकासासाठी आणि वंचित घटकांच्या सक्षमीकरणासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल eClerx Services Limited या कंपनीला प्रतिष्ठित ‘महात्मा पुरस्कार – CSR Excellence 2026’ प्रदान करण्यात आला आहे. संपर्क (SAMPARC) संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांना सहकार्य करत ग्रामीण आणि आदिवासी समाजाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल eClerx कंपनीच्या कार्याचा या पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. या सन्मानामुळे संपर्क संस्था आणि eClerx यांच्यातील दीर्घकालीन सामाजिक भागीदारीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.गेल्या १२ वर्षांहून अधिक काळापासून संपर्क आणि eClerx या संस्था परस्पर सहकार्याने सामाजिक परिवर्तनासाठी कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागांतील मुलांना, युवकांना आणि गरजू कुटुंबांना विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या दोन्ही संस्थांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केले आहेत. या संयुक्त उपक्रमांच्या माध्यमातून आतापर्यंत २७ हजारांहून अधिक नागरिकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम घडवून आणण्यात यश आले आहे.शिक्षण, रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण आणि उपजीविकेच्या संधी निर्माण करणे, या क्षेत्रांमध्ये या भागीदारीने महत्त्वपूर्ण काम केले आहे. वंचित मुलांना दर्जेदार शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे, पालकांचे छत्र हरवलेल्या मुलांना आधार देणे, ग्रामीण युवकांना रोजगारासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्यास मदत करणे, तसेच आदिवासी कुटुंबांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी उपजीविकेच्या संधी बळकट करणे, अशा विविध उपक्रमांद्वारे समाजातील गरजू घटकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.केवळ मदत करण्यापुरते मर्यादित न राहता गरजू व्यक्तींना स्वावलंबी बनविणे, त्यांना सन्मानाने जगण्यासाठी संधी उपलब्ध करून देणे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, हा या भागीदारीमागील प्रमुख उद्देश आहे. सामाजिक बांधिलकी, परस्पर विश्वास आणि सातत्यपूर्ण सहकार्य यांच्या बळावर या दोन्ही संस्थांनी तळागाळातील समाजाच्या उन्नतीसाठी मोलाचे योगदान दिले आहे.eClerx कंपनीला मिळालेला हा पुरस्कार सामाजिक उत्तरदायित्वाच्या क्षेत्रातील तिच्या उल्लेखनीय कार्याची पोचपावती मानला जात आहे. या यशामागे कंपनीचे नेतृत्व, CSR बोर्ड, CSR टीम आणि विविध उपक्रमांमध्ये सहभागी असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या सहकार्यामुळे संपर्क संस्थेला समाजातील वंचित आणि गरजू घटकांपर्यंत पोहोचून विविध विकासात्मक उपक्रम राबविण्यास बळ मिळाले आहे.या भागीदारीच्या जडणघडणीत कै. श्री. एस. रमेशजी कचोलिया, संस्थापक – केअरिंग फ्रेंड्स, मुंबई, आणि श्री. पी. डी. मुंध्रा, सह-संस्थापक व कार्यकारी संचालक – eClerx Services Limited, यांचे योगदानही विशेष महत्त्वाचे आहे. त्यांनी संपर्क संस्थेच्या कार्यावर विश्वास व्यक्त करून या भागीदारीला प्रोत्साहन दिले. त्यांची दूरदृष्टी, मार्गदर्शन आणि सहकार्य यामुळे सामाजिक परिवर्तनाच्या या प्रवासाला अधिक बळ मिळाले.संपर्क संस्था आणि eClerx यांच्यातील ही भागीदारी म्हणजे सामाजिक संस्थांनी आणि कॉर्पोरेट क्षेत्राने एकत्र येऊन समाजाच्या विकासासाठी कशा प्रकारे प्रभावी योगदान देता येते, याचे प्रेरणादायी उदाहरण आहे. असे उदगार संपर्क संस्थेचे संस्थापक सचिव अमितकुमार बॅनर्जी यांनी काढले तसेच या उपक्रमासाठी सातत्याने काम करणारे संपर्क संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुज सिंग आणि सर्व टीम यांचे ही आभार मानले आगामी काळातही शिक्षण, रोजगार, आर्थिक स्वावलंबन आणि समाजातील वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा या भागीदारीचा संकल्प आहे.सामाजिक बांधिलकीतून सक्षम समाजनिर्मितीचा ध्यास घेतलेल्या eClerx कंपनीला मिळालेला ‘महात्मा पुरस्कार – CSR Excellence 2026’ हा सन्मान केवळ एका कंपनीच्या यशाचा गौरव नसून, समाजातील गरजू घटकांच्या जीवनात सकारात्मक आणि दीर्घकालीन परिवर्तन घडवून आणणाऱ्या कार्याचा गौरव ठरला आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page