*देशात संवेदनशीलतेचा दुष्काळ! – डाॅ. श्रीपाल सबनीस**पद्मश्री नारायण सुर्वे काव्यजागर आणि सन्मान सोहळा संपन्न*

मावळ मराठा न्युज -पिंपरी (प्रदीप गांधलीकर) दिनांक : १६ ऑक्टोबर २०२६) ‘देशात संवेदनशीलतेचा दुष्काळ जाणवत असला तरी कविवर्य नारायण सुर्वे यांची कविता माणुसकीचा दिलासा देणारी आहे!’ असे गौरवोद्गार ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डाॅ. श्रीपाल सबनीस यांनी बहार सोसायटी, निगडी येथे गुरुवार, दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ रोजी काढले. पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी आणि सुनेत्रा महिला प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित काव्यजागर आणि सन्मान सोहळ्यात डाॅ. श्रीपाल सबनीस बोलत होते. याप्रसंगी टाटा मोटर्स ग्रामविकासाचे प्रणेते मनोहर पारळकर अध्यक्षस्थानी होते; तसेच पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, माजी नगरसेवक जयवंत उर्फ अप्पा बागल यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुप्रिया सोळांकुरे(मास्तरांची सावली कृष्णाबाई नारायण सुर्वे सन्मान), ज्येष्ठ पत्रकार डाॅ. विश्वास मोरे (पद्मश्री नारायण सुर्वे भला माणूस पुरस्कार), कवी आणि ज्येष्ठ पत्रकार पीतांबर लोहार (पद्मश्री नारायण सुर्वे काव्यसाधना पुरस्कार) यांना प्रदान करून सन्मानित करण्यात आले.डाॅ. श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले की, ‘संत अन् सामान्यांतील भलेपणावर आपली संस्कृती टिकून आहे. सुर्वेंची कविता संस्कृतीच्या संचिताचा विकास करते म्हणून त्यांच्या स्मृतींचा सन्मान करणे औचित्यपूर्ण आहे. वास्तविक मानवापासून मानवाची निर्मिती ही कोणत्याही परिस्थितीत अन् संस्कृतीत पवित्रच असते. त्यामुळे त्याला नैतिक – अनैतिक असे निकष लावू नयेत; तसेच आपल्या पश्चात पत्नीने दुसरे लग्न करावे, हा नारायण सुर्वे यांचा विचार मानवतेची सर्वोच्च उंची गाठणारा आहे!’पुरुषोत्तम सदाफुले यांनी प्रास्ताविकातून कविवर्य पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वर्षभर काव्यजागरासह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्या उपक्रमातील हे बारावे कार्यक्रमपुष्प आहे, अशी माहिती दिली. सुदाम भोरे यांनी, ‘सुर्वे सरांनी आपल्या कवितेतून कष्टकऱ्यांचा आवाज अधोरेखित केला!’ अशी भावना व्यक्त केली; तर अप्पा बागल यांनी, ग्रामजागर साहित्य संमेलनात नारायण सुर्वे यांचे जवळून दर्शन घडले, अशी आठवण जागवली.सत्काराला उत्तर देताना सुप्रिया सोळांकुरे यांनी, ‘पुरस्काराला जागून अजून चांगले समाजकार्य करण्याचा नारायण सुर्वे यांची मानसकन्या म्हणून मी प्रयत्न करीन!’ अशी ग्वाही दिली. डाॅ. विश्वास मोरे यांनी, ‘सुर्वे सरांना पाहण्याचा, भेटण्याचा योग आला होता!’ अशी कृतार्थता व्यक्त केली; तर पीतांबर लोहार यांनी, ‘पाणी संपावर जातंय…’ ही दुष्काळाचे सावट व्यक्त करणारी कविता सादर केली. काव्यजागर कविसंमेलनात राजेंद्र वाघ, संगीता झिंजुरके, रजनी कानडे, कुमार खोंद्रे, जयश्री श्रीखंडे, प्रतिमा काळे, वर्षा बालगोपाल, सीमा गांधी, विनीता श्रीखंडे, सारंग पोटफोडे, सुभाष चव्हाण यांनी नारायण सुर्वे यांच्या वैविध्यपूर्ण कवितांचे अभिवाचन केले. मानसी चिटणीस यांनी कविसंमेलनाचे निवेदन केले. यावेळी ज्येष्ठ कवयित्री शोभा जोशी यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला.मनोहर पारळकर यांनी अध्यक्षीय मनोगतातून, ‘साहित्यासारखे क्षेत्र नाही, लेखणीसारखे शस्त्र नाही; तर वाणीसारखे अस्त्र नाही!’ असे मत मांडले. बाजीराव सातपुते, प्रभाकर वाघोले, प्रदीप गांधलीकर, सविता इंगळे, रोहित खर्गे यांनी संयोजनात परिश्रम घेतले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. अरुण गराडे यांनी आभार मानले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page