पावसाअभावी मावळातील भातपिकांचे अतोनात नुकसान; आमदार सुनील शेळके शेतकऱ्यांच्या बांधावर, उद्यापासून पंचनामे सुरू करण्याचे कृषी अधिकाऱ्यांना आदेश!

मावळ मराठा न्युज -मावळ, पावसाने ओढ दिल्याने मावळ तालुक्यातील भातपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, हाताशी आलेले पीक डोळ्यांसमोर करपल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. दिवाळीचा सण तोंडावर आलेला असताना पिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांसमोर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या परिस्थितीची दखल घेत मावळचे आमदार सुनील शेळके यांनी आज थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला आणि शासनाकडून योग्य नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.मावळ तालुक्यात भात हे प्रमुख पीक असून, यंदा पावसाअभावी भातपिकांच्या वाढीवर आणि उत्पादनावर गंभीर परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी भाताची पिके तयार होण्याच्या अवस्थेत असतानाच पाण्याअभावी करपली आहेत. त्यामुळे वर्षभर कष्ट करून पिकवलेले पीक हातातून जात असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतीसाठी केलेला खर्च, कुटुंबाच्या दैनंदिन गरजा आणि सणासुदीचा खर्च भागवायचा कसा, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.या पार्श्वभूमीवर आमदार सुनील शेळके यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी संबंधित कृषी अधिकाऱ्यांशी जागेवरूनच संपर्क साधत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. उद्यापासून म्हणजेच १९ ऑक्टोबरपासून भातपिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्याचे आदेश त्यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिले. तसेच हे पंचनामे तातडीने पूर्ण करून त्यांचे अहवाल शासन दरबारी सादर करण्याचे निर्देशही दिले.पावसाअभावी झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन होणे आवश्यक असून, कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासनाने गांभीर्याने काम करावे, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. पंचनाम्यांची प्रक्रिया वेळेत पूर्ण झाल्यास नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली असताना शेतकऱ्यांच्या हातात पैसा नसल्याने त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. त्यामुळे शासनाने या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन पंचनाम्यांची प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी आणि पात्र नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी योग्य नुकसानभरपाई देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.आमदार सुनील शेळके यांनी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पाहणी करत कृषी अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनांमुळे आता पंचनाम्यांच्या प्रक्रियेकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. शासनाकडून नुकसानभरपाई कधी मिळणार आणि संकटात सापडलेल्या बळीराजाला दिवाळीपूर्वी दिलासा मिळणार का, याकडे संपूर्ण मावळ तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page