इंद्रायणी महाविद्यालयात ‘महाभोंडला आणि रास दांडिया’ उत्साहात संपन्न ;विद्यार्थ्यांनी लुटला रास दांडियाचा आनंद

मावळ मराठा न्युज -तळेगाव दाभाडे, दि.१७: इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी महाविद्यालय, कृष्णराव भेगडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासुटिकल एज्युकेशन अँड रिसर्च आणि यशोदा महादेव काकडे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या तीन महाविद्यालयांच्या संयुक्त सांस्कृतिक सहभागातून आयोजित करण्यात आलेला ‘महाभोंडला आणि रास दांडिया’ हा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. पारंपरिक लोकसंस्कृतीचे जतन आणि विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक एकात्मतेची भावना वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत भोंडल्याला विशेष महत्त्व आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात साजरा होणारा भोंडला हा महिलांच्या सामूहिक आनंदाचा, लोकगीतांचा आणि पारंपरिक खेळांचा उत्सव आहे. तर रास दांडिया हा गुजरातच्या लोकसंस्कृतीशी जोडलेला असून, आज देशभरात नवरात्रोत्सवात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दोन्ही सांस्कृतिक परंपरांचा सुरेख संगम या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला. संगीताच्या तालावर आणि उत्साहपूर्ण वातावरणात सहभागी विद्यार्थ्यांनी रास दांडियाचा आनंद घेतला.इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, खजिनदार निरुपा कानिटकर, कार्यवाह चंद्रकांत शेटे तसेच संस्थेच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी या सांस्कृतिक उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाला इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, कृष्णराव भेगडे फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय आरोटे, डॉ. गुलाब शिंदे, यशोदा महादेव काकडे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या प्राचार्या डॉ. अमृता सुराणा आणि व्यवस्थापन विभागाच्या संचालिका विद्या भेगडे आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी इंद्रायणी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागातील प्राध्यापकांनी विशेष पुढाकार घेतला. तिन्ही महाविद्यालयांतील सांस्कृतिक विभागाच्या सदस्यांनी आणि सहकाऱ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवत आपापल्या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या. कार्यक्रमाचे नियोजन, समन्वय आणि अंमलबजावणी यासाठी सर्वांनी घेतलेली मेहनत कौतुकास्पद ठरली.पारंपरिक लोकसंस्कृतीचा आनंद घेत तीन महाविद्यालयांतील विद्यार्थी आणि प्राध्यापकांना एकत्र येण्याची संधी या उपक्रमामुळे मिळाली. सांस्कृतिक परंपरांचे जतन, परस्पर सहकार्य आणि संस्थेतील विविध महाविद्यालयांमध्ये स्नेहभाव वाढविणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page