*इंडियन म्युझिकल क्लब प्रस्तुत अरिजित गीतांनी श्रोते मंत्रमुग्ध*

मावळ मराठा न्युज – पिंपरी,(प्रदीप गांधलीकर) दिनांक : २४ ऑक्टोबर २०२६ इंडियन म्युझिकल क्लब प्रस्तुत ‘गाता रहे मेरा दिल!’ या सांगीतिक मालिकेच्या अंतर्गत ‘दी सोल ऑफ बाॅलीवूड’ अर्थातच सुप्रसिद्ध गायक, संगीतकार पद्मश्री अरिजित सिंह यांनी गायलेल्या आणि संगीतबद्ध केलेल्या नि:शुल्क ७० व्या चित्रपटगीतांच्या प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहातील गुरुवार, दिनांक २२ ऑक्टोबर २०२६ रोजी संपन्न झालेल्या सांगीतिक मैफलीत रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सलीम शिकलगार यांच्यासह पिंपरी – चिंचवड आणि पुणे परिसरातील संगीत श्रेत्रातील विविध तंत्रज्ञ, गायक कलाकार, समाजातील मान्यवर आणि रसिक श्रोत्यांची सभागृहात मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती. राखी झोपे यांची संकल्पना आणि अनिल झोपे यांच्या निर्मितीतून साकार झालेल्या या विशेष मैफलीत इंडियन म्युझिकल क्लब अर्थातच आय. एम. सी. चे गुणी गायक राजेंद्र पाटील, स्वप्निल शेठ, प्रमोद शर्मा, विकी थोरात, प्रशांत कुलकर्णी, सुयश गोडबोले, हृषीकेश क्षत्रिय, अमिता जाधव, स्वाती केसकर, गौरी पाटील, श्रिया दास, नयना कालकर यांनी आपल्या प्रभावी सादरीकरणातून मैफल रंगतदार केली. विशेष बाब म्हणजे अनन्या नायर – राजेश नायर, रावी उत्तरवार – क्षितिज उत्तरवार आणि स्वरा टांकसाळे – धनंजय टांकसाळे या जेन झी गटाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नवयुवतींनी आपल्या वडिलांसह केलेल्या अप्रतिम सादरीकरणाने सर्व श्रोत्यांची मने जिंकून घेतली. संगीताच्या माध्यमातून समाजाला निखळ आनंदाची अनुभूती मिळावी; तसेच समाजातील हौशी अन् नवोदित गायक कलाकारांना व्यासपीठ मिळावे या उद्देशातून कार्यरत असलेल्या आय. एम. सी. ने आपल्या वैविध्यपूर्ण सांगीतिक संकल्पनांची परंपरा कायम राखून सादर केलेल्या या सांगीतिक मैफलीने श्रोत्यांना शेवटपर्यंत खिळवून ठेवले.म्युझिक व्हिजनने उत्तम ध्वनिसंयोजन केले. आय एम सी इव्हेंटचे संजय वाघचौरे यांनी दृकश्राव्यचित्रण केले; तर कल्याणी नलगे हिने छायाचित्रण केले; तसेच दीपक निस्ताने, धनश्री भोळे आणि प्रशांत चौधरी यांनी संयोजन आणि रंगमंच व्यवस्थेची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली. शलाका नायर यांनी खुसखुशीत शैलीतून मैफलीचे निवेदन केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page