*”कामगार चळवळ राजकारण विरहित असावी”डॉ.भारती चव्हाण यांचे प्रतिपादन*







पिंपरी, दि.२६, “अनेक उद्योगात कामगारांचे लढे होतात, संघर्ष होतो; त्यांना यश प्राप्त होते. परंतु ज्या लढ्यात राजकारण घुसते, तेथील कामगार चळवळ संपुष्टात आल्याचे अनेक दाखले आपल्याकडे आहेत.” असे प्रतिपादन गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण यांनी केले. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्याकडे मगर स्टेडियमच्या मोबदल्यात हस्तांतरित झालेल्या भूखंडाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आयोजित करण्यात आलेल्या निमंत्रित कामगार कार्यकर्ते आणि गुणवंत कामगारांच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. गुणवंत कामगार कल्याण मंडळ, पिंपरी चिंचवड शहर यांच्या तर्फे अल्फा लावल संघटनेचे अध्यक्ष तथा प्रमुख निमंत्रक किरण देशमुख यांनी ही सभा आयोजित केली होती. मगर स्टेडियमच्या संदर्भातील ३४ वर्षाच्या संघर्षाचा आणि इतिहासाचा मागोवा घेत डॉ.भारती चव्हाण पुढे म्हणाल्या की,”पिंपरी-चिंचवड नगरी ही कामगारांची नगरी समजली जाते.त्या अनुषंगाने महानगरपालिकेकडून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाला देऊ केलेल्या भूखंडावरील भव्य सांस्कृतिक भवन उभारण्याच्या आणि संपूर्ण विकासाच्या दृष्टीने गुणवंत कामगार कल्याण मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.परंतु येथे कामगारांच्या हिताचा विचार केला जात नाही. त्यासाठी संपूर्ण कामगारांची एकजूट होणे आणि एकत्र लढा देणे गरजेचे आहे”. कामगारांच्या घामातून उभारलेल्या मगर स्टेडियमसारख्या इतर योजनांचा लाभ कामगारांना व्हावा. तो त्यांचा हक्क आहे. अशा प्रकारची भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. सदरहू मेळाव्यास प्रमुख निमंत्रक किरण देशमुख,तानाजी एकोंडे, राजेश हजारे, बशीर मुलानी,बाळासाहेब साळुंके,भरत शिंदे,ज्ञानेश्वर मलशेट्टी,प्रकाश यादव, शंकर नाणेकर,दीपक पवार,शिवाजी वलवणकर, आकाश पालकर,विजय बडगुजर,सुरेश शिंदे, प्रकाश हुंबे,मुस्तफा मुलाणी असे अनेक युनियन प्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंडळाचे कोषाध्यक्ष बशीर मुलाणी यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या कार्याची ओळख करून देत म्हणाले की, “गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार प्राप्त कामगारांना राष्ट्रीय प्रवाहात सक्रिय राहण्याचा दृष्टिकोनातून मंडळ सातत्याने प्रयत्न करीत असते”. सचिव राजेश हजारे यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की,”पिंपरी चिंचवड कामगार नगरीत आगामी काळात उभारल्या जाणाऱ्या सांस्कृतिक भवनातून श्रमिकांचे आणि श्रमिक परिवारांचे मोल जपण्याच्या दृष्टिकोनातून विचार करणे क्रमप्राप्त आहे. त्यास विधायक कार्यांची आणि दीर्घकालीन योजनांची जोड द्यायला हवी”. कार्याध्यक्ष तानाजी एकोंडे यांनी आपल्या मनोगतातून अपेक्षित सांस्कृतिक भवनाची रूपरेषा कशी असेल, यावर प्रकाशझोत टाकला. यावेळी अनेक कार्यकर्त्यांसह प्रमुख निमंत्रक किरण देशमुख यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.तेव्हा ते म्हणाले की,”इतिहास घडवणारी माणसे कधी इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसे कधीही इतिहास घडवू शकत नाहीत. त्या अनुषंगाने आपल्याला इतिहास घडवायचा आहे. “कामगार हिताय कामगार सुखाय” याप्रमाणे आपणास कामगारांचे हित जोपासणे गरजेचे आहे. त्यासाठी कामगारांनी एकत्र येणे गरजेचे आहे”. कार्यक्रमाच्या प्रारंभी २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना व शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. बाळासाहेब साळुंके, बशीर मुलाणी,शिवराज शिंदे,अशोक सरतापे, नंदकुमार धुमाळ,पांडुरंग सुतार, विजय गुजर, विजय पाटील, पोपट भालेराव, दिलीप कोंडे, पंडितराव पवार,हेमंत पवार यांनी कार्यक्रमाच्या संयोजन कार्यात सहकार्य केले.महेंद्र गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले आणि आण्णा गुरव यांनी आभार मानले.तानाजी एकोंडे,कार्याध्यक्ष,गुणवंत कामगार कल्याण मंडळ महाराष्ट्र राज्य.सं. क्र.९४२१९६५८२५



