*झाडे तोडू नका!**पर्यावरण अभ्यासक तानाजी एकोंडे यांचे आवाहन*

मावळ मराठा न्युज -पिंपरी, दि. २६ नोव्हेंबर २०२६: “वृक्षारोपण नाही केले तरी चालेल, परंतु लावलेली किंवा जोपासना केलेली झाडे तोडू नका,” असे विनम्र आवाहन पर्यावरण अभ्यासक तानाजी एकोंडे यांनी पिंपरी येथे केले.महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र, संत तुकाराम नगर, पिंपरी आयोजित ‘कौमी (राष्ट्रीय) एकता सप्ताह’ कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोककवी सुरेश कंक, तर प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प. अशोक महाराज गोरे उपस्थित होते.एकोंडे म्हणाले की, “विकासाच्या नावाखाली प्रचंड वृक्षतोड होत आहे. घनदाट जंगले नष्ट केली जात आहेत आणि डोंगर पोखरले जात आहेत. त्यामुळे पर्यावरण संतुलन बिघडले असून ऋतुचक्र विस्कळीत होत आहे. पाणीटंचाई जाणवत असल्यामुळे शेती करणे दुरापास्त होत आहे. त्यामुळे आगामी काळात तीव्र अन्नटंचाई भासणार असून महागाईचे संकट ओढवणार आहे. त्यासाठी वृक्षसंपदेसह पाण्याचे जतन करणे अनिवार्य आहे.”कार्यक्रमाचा प्रारंभ शोभा जोशी यांनी सादर केलेल्या ‘श्री गणेश स्तुती’ या बालगीताने झाला. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना ह.भ.प. अशोक महाराज गोरे म्हणाले की, “कौमी एकता अर्थात राष्ट्रीय एकता सप्ताहाच्या निमित्ताने एकता, बंधुता आणि राष्ट्रीय एकात्मता यांचे जतन व्हावे. कुटुंब आणि समाज यांच्या समन्वयातून राष्ट्राची प्रगती व्हावी.” संत तुकाराम महाराज यांच्या *”विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेद भ्रम अमंगळ॥”* या अभंगाचे सोप्या भाषेत निरूपण करीत त्यांनी राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुता ही मूल्ये जिवापाड जपण्याचे आवाहन केले.अध्यक्षपदावरून बोलताना सुरेश कंक म्हणाले की, “क्रांतिकारकांच्या आणि देशभक्तांच्या समर्पणातून आपण स्वातंत्र्य मिळवले आहे, याची जाणीव ठेवून आपण सर्वांनी मिळून लोकोपयोगी कामे करणे हीच खरी राष्ट्रसेवा आहे. यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहिले पाहिजे.”कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्राचे प्रमुख अनिल कारळे यांनी केले. प्रदीपा मरळ, शैलजा आवडे अरुण कळंबे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले, तर केंद्र कर्मचारी सुरेखा मोरे यांनी आभार मानले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page