“वैभवशाली इतिहासाचा नव्याने शोध घ्यावा!”जिजाऊ व्याख्यानमाला – अंतिम पुष्प

मावळ मराठा न्यूज,पिंपरी दिनांक (प्रदीप गांधलीकर०१ मे २०२३) “तरुणाईने वैभवशाली भारतीय इतिहासाचा नव्याने शोध घ्यावा!” असे आवाहन पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी चापेकर स्मारक उद्यान, चापेकर चौक, चिंचवड येथे केले. गांधीपेठ तालीम मित्रमंडळ आणि अनंत नागरी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच दिवसीय जिजाऊ व्याख्यानमालेत ‘भारतीय इतिहासातील वंचित घटनांची सुवर्णपाने’ या विषयावरील अंतिम पुष्प गुंफताना गिरीश प्रभुणे बोलत होते. सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, गांधीपेठ तालीम मित्रमंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. गिरीश प्रभुणे पुढे म्हणाले की, “ब्रिटिशांनी कपटनीती वापरून दीडशे वर्षांच्या कालावधीत भारतीय इतिहासाचे विकृत चित्रण केले. त्यांची खुशामत करणारा इतिहास लिहिला अन् छापला गेला. इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून भारतावर अनेक आक्रमणे झालीत; परंतु आपल्या कार्यकर्तृत्वाने अनेक वीरांनी भारताला पुन्हा पुन्हा समृद्धीकडे नेले. जिजाऊ माँसाहेबांनी ज्या पुनवडीच्या भूमीला सोन्याच्या फाळाने नांगरले, त्याच भूमीत छत्रपती शिवाजीमहाराज यांच्यासह असंख्य क्रांतिकारक निर्माण झालेत. प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजांनी पूर्व भारतातील सात राज्यांमधील असंख्य क्रांतिवीरांना जंगलात जाळून मारले. राजस्थानातील सुस्थितीतील समाजाला ब्रिटिशांनी गुन्हेगार पारधी म्हणून ठरवले. बंदुकांची निर्मिती करणारा आणि सर्वात प्रथम स्वदेशीचा नारा देणाऱ्या उमाजी नाईक या आदिवासी राजाला आणि त्याच्या दीडशे साथीदारांना ब्रिटिशांनी कपटाने फासावर लटकवले. त्यांच्या हौतात्म्यानंतरही सुमारे सत्तर वर्षे उमाजी नाईक यांचा दरवडेखोर म्हणून उल्लेख केला गेला. त्यामुळे उमाजींसारख्या देशातील अनेक क्रांतिकारकांच्या कुटुंबीयांची वाताहत झाली. अजिंठा, वेरूळ यांसारख्या लेण्यांमधील कलाकृती पाहून प्राचीन काळापासून भारतीय समाज हा सांस्कृतिकदृष्ट्या किती समृद्ध आणि ज्ञानसंपन्न होता याची कल्पना करता येते. तक्षशिलासारखी जागतिक दर्जाची विद्यापीठे, सर्व जातींमधून निर्माण झालेले संत यामुळे भारत ही समृद्ध, सुसंस्कृत भूमी होती म्हणूनच कोलंबस वैभवसंपन्न भारताच्या शोधात निघाला होता. तरीही बहुजन समाजाला ज्ञानापासून वंचित ठेवले गेले, असा धादांत खोटा प्रचार केला जातो. ज्ञात असलेल्या पंधराशे क्रांतिवीरांच्या सूचीत सुमारे बाराशे क्रांतिवीर हे बहुजन समाजातील आहेत. त्यामुळे १८७१ साली ब्रिटिशांनी गुन्हेगार जमातीचा कायदा निर्माण करून भारतीयांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचले. त्यामुळे तरुणांनी पुन्हा एकदा भारतीय इतिहासाचा शोध घेऊन तो जगापुढे मांडला पाहिजे!”गांधीपेठ तालीम मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी संयोजनात परिश्रम घेतले. विजय बोत्रे यांनी सूत्रसंचालन केले. नाना जाधव यांनी आभार मानले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page