“प्रारब्धभोग भोगल्याशिवाय सुटका नाही,”दु:खाची चिंता करू नये!”- ह.भ.प. संदीप मांडके


मावळ मराठा न्यूज,पिंपरी (प्रदीप गांधलीकर)दिनांक : १२ डिसेंबर २०२२ “प्रारब्धभोग भोगल्याशिवाय सुटका नाही म्हणून वाट्याला आलेल्या दु:खाची चिंता करू नये!” असे विचार ह.भ.प. संदीप मांडके यांनी श्रीराम मंदिर, पेठ क्रमांक २७, निगडी प्राधिकरण येथे रविवार, दिनांक ११ डिसेंबर २०२२ रोजी व्यक्त केले. पाच दिवसीय नारदीय परंपरेतील कीर्तन महोत्सवात चतुर्थ पुष्पाचे निरूपण ह.भ.प. संदीप मांडके यांनी केले. माजी उपमहापौर शैलजा मोरे, माजी नगरसेविका शर्मिला बाबर, राजेंद्र बाबर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. “सदासर्वदा प्रीती रामी धरावी |दु:खाची स्वयें सांडी जीवी करावी |देहेदु:ख ते सुख मानीत जावे |विवेके सदा स्वस्वरूपी भरावे ||”या समर्थ रामदासस्वामी यांच्या श्लोकावर निरूपण करताना संदीप मांडके यांनी, “मानवी संबंधातील प्रीतीमध्ये स्वार्थ असतो; परंतु भगवंतावर केलेली प्रीती मोक्षप्राप्ती देते. संतांनी सर्वांवर निष्काम प्रेम केले; कारण सर्व जीव हे भगवंताचेच अंश आहेत, असे गोंदवलेकर महाराज म्हणतात. परमार्थ ही वृद्धावस्थेत करण्याची बाब नव्हे!” असे सांगून पूर्वरंगात त्यांनी शांतिब्रह्म एकनाथमहाराज यांच्या सोशीकतेची अन् औदार्याची कथा सांगितली; तर कीर्तनाच्या उत्तररंगात रामवनवासाचे आख्यान कथन केले. निरूपणाची मिस्कील शैली आणि त्याला प्रसंगानुचित पदांचे सुरेल सादरीकरण यामुळे संदीप मांडके यांनी श्रोत्यांना हसवता हसवता अंतर्मुख केले. कानिफनाथ घैसास (तबला) आणि धनवर्षा प्रभुणे (संवादिनी) यांनी साथसंगत केली. श्रीराम मंदिर विश्वस्त मंडळाने संयोजनात सहकार्य केले. संजय दातार यांनी सूत्रसंचालन केले. सामुदायिक आरतीने चतुर्थपुष्पाचा समारोप करण्यात आला.




