देशात १९ एप्रिल ते १ जून या कालावधीत सात टप्प्यात लोकसभेच्या निवडणुका,मावळ,शिरूर, पुणे १३ मे ला

मावळ मराठा न्युज :-मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तर महाविकास आघाडीकडून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संजोग वाघेरे हे उमेदवार असणार आहेत. तसेच शिरूरमधून महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे मैदानात उतरणार आहेत. तर महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. दरम्यान पुणे लोकसभा मतदार संघातून भाजपाने महायुतीचे उमेदवार म्हणून मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे. तर महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवार घोषित करण्यात आलेला नाही. लवकरच या तीनही लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुती यांचे उमेदवार जाहीर होतील.महाराष्ट्रात पाच टप्प्यामध्ये निवडणुका होणार असून १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि २० मे ला मतदान होणार आहे. तर ४ जूनला मतमोजणी होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.पुणे जिल्ह्यातील सर्वात लक्षवेधी ठरणारी मावळ, शिरूर आणि पुणे लोकसभेची निवडणूक चौथ्या टप्प्यात म्हणजेच १३ मे रोजी होणार आहे. चौथ्या टप्प्यात प्रामुख्याने नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड या लोकसभा मतदारसंघांचा समावेश निवडणूक आयोगाने केला आहे. महाराष्ट्रातील मतदार संघात मतदानाच्या तारखा.. पहिला टप्पा – १९ एप्रिल – गडचिरोली, भंडारा गोंदिया, नागपूर, रामटेक चंद्रपूर. दुसरा टप्पा – २६ एप्रिल – वर्धा, अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम. तिसरा टप्पा – ७ मे – रायगड, धाराशिव, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, बारामती, हातकणंगले, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, माढा. चौथा टप्पा – १३ मे – नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड, पाचवा टप्पा – २० मे – कल्याण, ठाणे, मुंबईतील सर्व सहा मतदार संघ.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page