लोणावळा नगरपरिषदेची धडक कारवाई,कर न भरणाऱ्या मालमत्ता धारकांवर होणार जप्तीची कारवाई

मावळ मराठा न्युज :- लोणावळा,जिल्हाधिकारी, पुणे यांनी कर वसूली संदर्भात जो आढावा घेतला त्यामध्ये लोणावळा नगरपरिषदेच्या करवसुली संदर्भात मोठी नाराजगी व्यक्त केली व कर वसूलीचे काम अत्यंत तीव्रपणे मोहीम स्वरुपात हाती घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. लोणावळा नगरपरिषदेकडून कर वसूलीसाठी पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच आज अखेर नगरपरिषद हद्दीतील एकूण ६ मिळकर्तीवर कर न भरल्याबद्दल जप्तीची कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच पॅनकार्ड क्लब हॉटेलच्या ४ रुमवर जप्तीची कारवाई करण्यात आलेली आहे.जे मालमत्ता धारक नगरपरिषदेचा कर थकविणार आहेत त्यांच्या मालमत्तेला कोणत्याही स्वरुपाचे कसलेही कर्ज मंजूर करण्यात येवू नये यासाठी सर्व राष्ट्रीयकृत बँकांना कळविण्यात येणार आहे. तसेच त्या मालमत्तांचे कसलेही खरेदी विक्री व्यवहार करण्यात येवू नये यासाठी दुय्यम निबंधक लोणावळा यांचे कार्यालयाकडे अशा थकबाकीदारांची यादी सादर करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त जे थकबाकीदार कराचा भरणा नगरपरिषद कार्यालयाकडे करणार नाही त्यांची यादी फ्लेक्स बोर्डवर तयार करुन ती शहरातील मुख्य ठिकाणी लावण्यात येणार आहे.नगरपरिषदेचा कर भरणे हे प्रत्येक मालमत्ताधारकाचे कर्तव्य असून त्याने आपल्या कर्तव्याचे पालन करणे अपेक्षित व अभिप्रेत आहे. प्रत्येक मालमत्ताधारकाने लवकरात लवकर नगरपरिषदेकडील संपर्ण कराच्या रक्कमेचा भरणा करुन अप्रिय कारवाई टाळावी असे जाहीर आवाहन नगरपरिषदेकडून सर्व मालमत्ता धारकाना करण्यात येत आहे.लोणावळा नगरपरिषद हद्दीतील जे मालमत्ताधारक ज्येष्ठ आहेत व त्यांना नगरपरिषद कार्यालयात येवून त्यांच्या कराचा भरणा करणे शक्य होत नाही अशा मालमत्ताधारकांनी नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी श्री. शरद कुलकर्णी यांचे मोबाईल क्रमांक ८८०५३५११०० या क्रमांकावर माहिती दयावी. अशा मालमताधारकांचा कर त्यांचे निवासस्थानी जाऊन भरून घेण्याची व्यवस्था नगरपरिषद कार्यालयाकडून करण्यात येईल. दि.३१/०३/२०२४ पर्यंत लोणावळा नगरपरिषदेचे कार्यालय सर्व प्रकारचे करभरणा करीता शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीचे दिवशीही सुरु राहणार आहे अशी माहिती लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page