SSC व HSC बोर्ड परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या सर्वांचे अभिनंदन,करिअर पुढे काय ❓-संतोष गुरव,समुपदेशक



मावळ मराठा न्यूज – SSC व HSC बोर्ड परीक्षा उत्तीर्ण सर्व यशस्वी विद्यार्थी मित्रांचे व त्यांच्या पालकांचे हार्दिक अभिनंदन निकालानंतर अनेकांना एकच वेध लागलेत ते पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी योग्य तो पर्याय निवडण्याचे त्यासाठी धावपळ, सल्लामसलती, नातेवाईक, मित्रमंडळी, इंटरनेट,करिअर मार्गदर्शनाचे रकानेच्या रकाने भरून ओंसडणारी वृत्तपत्रे, साप्ताहिके…..डोक्यात फक्त गोंधळ…गोंधळ ….आणि गोंधळ.त्यात भर करियर समुदशनाचे ढीगभर प्रोग्राम,त्यात दाखवलेली (अर्थातच)स्पाॅन्सर्ड दिवास्वप्ने…..यात बिचाऱ्या विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या डोक्याचा अक्षरक्षः भुगा होऊन जातो.त्यात भरीस भर म्हणजे पारंपारिक शिक्षणानंतर करिअर होवू शकते ही आशाच जवळपास संपुष्टात आलेली असताना, इंजिनिअरींग,मेडिकल वा तत्सम व्यावसायिक शिक्षण सर्वसामान्य मध्यमवर्गीय पालकांच्या आर्थिकदृष्ट्या आवाक्या बाहेरचे झाले आहे.त्यात ॲडजेस्टमेंट करून तयारी केली तरी मार्कांचा फुगवटा एवढा प्रमाणाबाहेर वाढलाय की त्या तणावाखाली विद्यार्थ्यांना दहावी ते बारावी ही तीन चार वर्ष नकोशी वाटत आहेत…अपेक्षांचे ओझे,पालकांची आर्थिक ओढाताण पहाताना,त्यासाठी संपुर्ण कुटुंबाला कराव्या लागणार्या तडजोडी बघताना मुलं त्याचं वयानुसार नैसर्गिक वागणं विसरून अकाली प्रौढ होत आहेत व यांचा त्यांच्या मानसिक जडणघडणीवर परिणाम होताना दिसत आहे.चिडचिडेपणा, मोबाईल ॲडिक्शन, एकलकोंडेपणा,मनस्वीपणा, आत्महत्या इ.अनेक प्रकार आपणास आजूबाजूला पहायला मिळतात.प्रश्न फक्त एवढाच आहे की करिअर म्हणजे नक्की काय?आईवडीलांना जे आपल्याला जमलं नाही ते मुलांनी करावं याचा धोशा लावला की घडतं ते करिअर,पाटीभर पैसा मिळवून देतं ते करिअर की प्रतिष्ठेसाठी आवडीनिवडी,छंद विसरून मानेवर जून ठेवून,डोळ्याला झापडं लावून पदवीच्या पाट्या मिरवणं म्हणजे करिअर?माझ्या मते फक्त शैक्षणिक धोरणात बदल करून भागणार नाही,तर जोपर्यंत समाज म्हणून तुम्ही आम्ही श्रमाला व श्रमिकांना प्रतिष्ठा प्राप्त करून देणार नाही,कौशल्य,कला, संशोधन, नवनवीन आविष्कार यांना सन्मानाच्या नजरेनं बघणार नाही.त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पुढाकार घेणार नाही तोपर्यंत ही स्थिती बदलणार नाही.करिअर तुमच्या मुलांच्या आनंदात आहे,त्यांच्या सदृढ शरिरातील निकोप,सदाचारी व सद्वर्तनी मनाने कमावलेल्या प्रत्येक पैशात आहे मग ते क्षेत्र कोणतेही असो.समाजाच्या, राष्ट्राच्या उभारणीसाठी जेवढी गरज बुद्धीवादी समाजाची आहे तेवढीच किंबहुना त्यापेक्षाही काकणभर जास्त श्रमजीवींची आहे.चला संकल्प करूयात, करिअर, करिअरच्या खेळात आपल्या भावी पिढीला न दमवता,थकवता,त्यांना त्यांच्या आवडीच्या,त्यांच्या जन्मजात क्षमतांना न्याय देणार्या क्षेत्रात काम करण्याची संधी देऊन कायम आनंदी, ताजेतवाने व कार्यक्षम बनवु यात.




