“शिक्षणातून माणूस घडला पाहिजे!” – किसनमहाराज चौधरी

पिंपरी (प्रदीप गांधलीकर )दिनांक : २३ जून २०२४” शिक्षणातून माणूस घडला पाहिजे!” असे प्रतिपादन ज्येष्ठ प्रवचनकार ह. भ. प. किसनमहाराज चौधरी यांनी न्यू इंग्लिश स्कूल माण, ता. मुळशी, जि. पुणे येथे शुक्रवार, दिनांक २१ जून २०२४ रोजी केले. दिलासा संस्था आणि न्यू इंग्लिश स्कूल, माण यांच्या संयुक्त विद्यमाने वै. मुरलीधर कंक (मास्तर) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एस. एस. सी. शालान्त परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यात किसनमहाराज चौधरी बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक ह. भ. प. अशोकमहाराज गोरे अध्यक्षस्थानी होते; तसेच ज्येष्ठ कवयित्री राधाबाई वाघमारे, साहित्यिक प्रदीप गांधलीकर, सुभाष चव्हाण, शामराव सरकाळे, मुरलीधर दळवी, न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक अंबादास रोडे, दिलासाचे अध्यक्ष सुरेश कंक यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी दिलासा समूहातील गुणवंत विद्यार्थी आत्रेय गांधलीकर, न्यू इंग्लिश स्कूलचे गुणवंत विद्यार्थी यश मगर, नेहा बिरारे, रूपाली गोसावी यांना सन्मानचिन्ह, रोख रक्कम, ग्रंथ, शाल, श्रीफळ प्रदान करून गौरविण्यात आले. त्याचबरोबर उज्ज्वल यश संपादन करणार्‍या आणि निबंधलेखन स्पर्धेतील विजेत्या अन्य विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. ह. भ. प. किसनमहाराज चौधरी पुढे म्हणाले की, “गुण या शब्दाचा अर्थ संख्यात्मक आणि गुणात्मक असा दोन्ही प्रकारे होतो. परीक्षेतील गुणांसोबत परिपूर्ण व्यक्तिमत्त्वाचे गुणदेखील विद्यार्थ्यांच्या अंगी असणे आवश्यक असते. जीवनातील योग्य आणि अयोग्य काय याची जाणीव शिक्षणातून होते. स्वतःसाठी सर्वच जगतात; पण समाजासाठी जगणे म्हणजे खरे जीवन होय. सुरेश कंक यांनी वडाच्या पारंब्यांप्रमाणे कंक मास्तर यांचे कार्य पुढे चालवले आहे!””योग करावा, योग करावाध्यान लावून विठ्ठल पहावा”ही कविता सादर करून सुरेश कंक यांनी वै. मुरलीधर कंक मास्तर यांच्या प्रेरणादायी शैक्षणिक कार्याच्या आठवणींना उजाळा दिला. निरक्षर पतीने आपल्याकडून कशाप्रकारे अक्षरे गिरविली याचे हृद्य कथन राधाबाई वाघमारे यांनी केले; तर शामराव सरकाळे यांनी शालेय जीवनावरील कवितेचे सादरीकरण केले. सुभाष चव्हाण यांनी “शोधीशी मानवा…” या गीताचे सुरेल सादरीकरण केले. अंबादास रोडे यांनी वटपौर्णिमा, जागतिक योग आणि संगीत दिनाची माहिती देत मार्गदर्शन केले. अशोकमहाराज गोरे यांनी अध्यक्षीय मनोगतातून, “सात्त्विक, सद्गुणी मुलांचा देवालाही अभिमान वाटतो. त्यामुळे संत आणि सत्पुरुषांचे आदर्श डोळ्यांसमोर ठेवून जीवनात वाटचाल केली पाहिजे!” असे विचार मांडले.वटवृक्षाच्या रोपाचे रोपण आणि पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. संभाजी थिटे, विजय भांगरे, भीमराव वाढवे, लता सणस, शीतल टकले, मंगल गायकवाड, मनीषा मोरे यांनी संयोजनात परिश्रम घेतले. तानाजी एकोंडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश रणदिवे यांनी आभार मानले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page