आयपीएस सत्यसाई कार्तीक यांची संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत धडाकेबाज कारवाई; ४८ किलो गांजासह पंधरा लाखांचा मुद्देमाल जप्त; तिघांना अटक

मावळ मराठा न्युज :-लोणावळा,लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. गेल्या काही दिवसांपासून लोणावळा विभागात अमली पदार्थांची चोरून विक्री होत असुन त्यामुळे परिसरातील तरुणाई नशेच्या आहारी जात असल्याची माहिती श्री कार्तिक यांना मिळाली होती. त्यासाठी श्री सत्यसाई कार्तिक यांनी संकल्प नशामुक्ती अभियान हाती घेऊन त्याअंतर्गत परिसरातील युवकांमध्ये जनजागृती करणे, तसेच अमली पदार्थांचे सेवन, साठवणुक व विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. संकल्प नशामुक्ती अभियानाचाच एक भाग म्हणून श्री सत्यसाई कार्तिक यांनी मावळ परिसरातील अमलीपदार्थ विकणाऱ्या गुन्हेगारांविरोधात गेल्या काही दिवसात कठोर कायदेशीर कारवाया करून अनेक आरोपींना जेरबंद करून त्यांचेकडून मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ हस्तगत केले आहेत. दिनांक ११/०७/२०२४ रोजी श्री सत्यसाई कार्तीक यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, लोणावळा भागातील कार्ला फाटा परिसरात काही इसम हे चारचाकी वाहनांमधून गांजा विक्रीकरिता घेऊन येणार आहेत. बातमीचे गांभीर्य ओळखून श्री सत्यसाई कार्तिक यांनी मध्यरात्रीपासूनच कार्ला फाटा परिसरात त्यांचे पथकासह सापळा रचला होता. मिळालेल्या बातमीप्रमाणे दि.११/०७/२०२४ रोजी पहाटे ०३ .०५ वाजताच्या सुमारास जुने मुंबई पुणे हायवे रोडवरील तेजस धाब्याचे समोर एक संशयित वाहन थांबल्याने श्री कार्तिक व पथकाने सदर वाहन थांबवून गाडीतील इसमांकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने व त्यांच्यावर संशय बळावल्याने पोलीस पथकाने जागेवरच पंचांसमक्ष नमूद इसमांचे घेतलेल्या झडतीमध्ये नमूद इसमांचे सोबत असलेल्या चारचाकी वाहनाचे डिक्किमधील दोन पोत्यांमध्ये रू.९ ,२० ,००० /-(अक्षरी नऊ लाख वीस हजार रु.) किमतीचा ४८ किलो गांजा मिळून आल्याने सदरचा माल पंचांसमक्ष सीलबंद करून ताब्यात घेण्यात आला आहे. तसेच नमूद इसमांकडे केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये सदरचा माल हा विक्रीकरीता घेऊन जात असल्याचे सांगितले आहे. सदरच्या कारवाई मध्ये इसम नामे १) नितीन शिवाजी लेहने, वय ३८ वर्ष, रा. औरंगपूर तालुका शिरूर जिल्हा बीड, २) संदिपान पाटलोबा गुट्टे, वय ३९ वर्ष, राहणार परळी वैजनाथ, तालुका परळी, जिल्हा बीड, ३) गणेश सुरेश दराडे, वय ३० वर्ष, राहणार केज, तालुका केज, जिल्हा बीड यांना त्यांचे चारचाकी वाहनासह ताब्यात घेऊन लोणावळा ग्रामीण पो.स्टे येथे आणून सदरबाबत पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा ग्रामीण पो.स्टे. गु र.न. २२३/२०२४ एन.डी.पी.एस ॲक्ट १९८५ चे कलम ८ (क), २० (ब) (क), २९ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास लोणावळा ग्रामीण पो.स्टे चे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे हे करत आहेत.संकल्प नाशामुक्ती अभियानांतर्गत केलेल्या वरील कारवाईमध्ये ४८ किलो गंजासह एकूण रु.१४ लाख ६० हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन पोलीस यंत्रणा सखोल तपास करत आहे.सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा.पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पो.हवा नितेश (बंटी) कवडे, पो.हवा अंकुश नायकुडे, पो.ना दत्ता शिंदे, पो.कॉ गणेश येळवंडे, पो.कॉ सुभाष शिंदे, पो.कॉ महेश थोरात यांचे पथकाने केली आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page