वै.प्राचार्य मामासाहेब दांडेकर : निष्कलंक सेवेचा आदर्श -संजीव प्र कुसूरकर

मावळ मराठा न्युज :- मावळ,वै प्राचार्य शं.वा.तथा मामासाहेब दांडेकर ह्यांची आज पुण्यतिथी, आजच्या दिवशी ५६ वर्षांपूर्वी आषाढ शु १४ रोजी त्यांचे पुणे येथे निधन झाले.आषाढी वारीसाठी पंढरीत आलेले वारकरी भक्त ह्या महात्म्याचे अखेरचे दर्शन व्हावे म्हणून लाखोंच्या संख्येने पुण्यात दाखल झाले होते.न भूतो अशी पुणे ते आळंदी संपूर्ण रस्ता भाविकांनी भरलेली प्रचंड महायात्रा निघाली होती.वै मामांचे स्मरणार्थ हा लेख….काही व्यक्तींचे कर्तृत्व एव्हढे विशाल असते की त्यांच्यानंतर येणाऱ्या अनेक पिढ्यांना अशा थोर व्यक्तींचे उपकार कायम स्मरणात राहतात, गुरुवर्य मामासाहेब त्यापैकीच एक होते. मामा मूळचे पालघर येथील घरंदाज शेतकरी कुटुंबातून पुण्यात शिक्षणासाठी आले होते आणि पुण्याचे नव्हे तर महाराष्ट्राचे भूषण ठरावे असे अलौकिक योगदान त्यांनी वारकरी संप्रदाय आणि शिक्षण क्षेत्रासाठी दिले आहे.एस पी कॉलेज पुणे, वारकरी शिक्षण संस्था आळंदी आणि सार्थ ज्ञानेश्वरी ही मामांच्या जीवनातील तीन महत्वपूर्ण मानचिन्हे आहेत.एस पी कॉलेज मध्ये तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी कारकीर्द सुरू केली, पुढे शिक्षण प्रसारक मंडळीचे आजीव सदस्य आणि एसपीचे प्राचार्य म्हणून त्यांनी बजावलेली भूमिका कॉलेजला एक प्रतिष्ठेचे स्थान मिळवून देती झाली.पुणे विद्यापीठाच्या स्थापनेत त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता.निवृत्ती वयापेक्षा पाच वर्षे आधी राजीनामा देऊन त्यांनी ज्ञानेश्वरी,तुकाराम गाथा प्रसार कार्य आणि संस्थेचे कामकाज पाहिले.*यालागी बाह्य विभागु | कर्मे धुतला चांगु | आणि ज्ञाने फेडिला वंगु | अंतरीचा ||(श्रीज्ञानेश्वरी १३.४७३) असेच मामांचे निर्मळ जीवन होते.त्यांचे गुरू वै विष्णुबुवा जोग ह्यांनी स्थापन केलेल्या वारकरी शिक्षण संस्थेच्या प्रमुख धुरिणांचे पैकी मामा एक होते! संस्थेचा विद्यार्थी अध्यात्मिक ग्रंथावर प्रभुत्व मिळवणारा असला पाहिजे त्याच बरोबरीने चरीतार्थासाठी व्यावसायिक शिक्षणाची सोय संस्थेने केली होती.प्रवचन कीर्तन करताना वैयक्तिक नीती मूल्यांची बूज राखली गेली पाहिजे असा त्यांचा आग्रह असे आणि स्वआचरणाने त्यांनी स्वत:ला तसे सिद्ध केले होते. प्रवचन कीर्तनासाठी प्रवासखर्चा शिवाय एक रुपयाही अधिक मानधन ते घेत नसत. संस्थेच्या विद्यार्थ्यांना आळंदीत होणाऱ्या विविध कीर्तन, उत्सवास जाण्याची मुभा असे आणि चांगले ते जरूर घ्या हाच विचार त्यामागे होता.आज संस्थेतून मामांच्या पठडीत तयार झालेले अनेक मान्यवर जनजागरणाचे काम करीत आहेत, ज्येष्ठ कीर्तनकार मारुतीबुवा कुऱ्हेकर (वय ९५) हे सर्वांच्या आदराचे व्यक्तिमत्त्व आहे.गुरुवर्य मामा संपूर्ण महाराष्ट्रात फिरून कीर्तन,प्रवचने करीत असत. शुध्द परमार्थ काय असतो ह्याचा विस्तृत विचार ते आपल्या चिंतनातून लोकांना पटवून देत असत. बुवाबाजी, उपाधी, प्रसिध्दी ह्यापासून ते कायम दूर राहिले आणि आपल्या वाटेस आलेले काम सचोटीने करा हाच उपदेश ते करीत.तरी स्वाधिकाराचेनि नावे | जें वांटिया आले स्वभावें | तें आचरे विधीगौरवे | शृंगारोनि ||(श्रीज्ञानेश्वरी १८.२००) हे माउलींचे सांगणे त्यांनी लोकांचे मनात खोलवर रुजवले. ज्ञानभक्ती संगमाचे मामासाहेब एक साधे तितकेच उत्तुंग उदाहरण होते.एस पी कॉलेजचे प्राचार्य असताना आळंदी ते पंढरपूर अशी वीस दिवसांची पायी वारी त्यांनी कधी चुकवली नाही. गुरुवर्य धुंडा महाराज देगलूरकर आणि मामासाहेब ह्या दोघांनी वारकरी संप्रदायास मोलाचे मार्गदर्शन केले. प्रसाद प्रकाशनचे य.गो. जोशी ह्यांनी मामांना सार्थ ज्ञानेश्वरी लिहा अशी आग्रहपूर्ण विनंती केली आणि पुढील अनेक पिढ्यांसाठी हा ग्रंथ उपकारक ठरला हे मामांचे मोठे ऋण ज्ञानेश्वरी भक्तांसाठी आहे.वारकरी शिक्षण संस्थेच्या मार्फत बाराशे पानी ह्या ग्रंथाच्या आजवर दोन लाखांचे पेक्षा जास्त प्रती वितरित झाल्या आहेत आणि तेही वाजवी मूल्यात!मामा ब्रह्मचारी होते पण अवघाचि संसार सुखाचा करीन, ही माऊलींची प्रतिज्ञा खरी करून दाखवण्याची हातोटी आणि सामर्थ्य त्यांचे अंगी विलसत होते. पुण्यातील अनेक सामाजिक संस्थांच्या कार्यात ते सहभागी असत, पानशेत धरण फुटीवेळी मोठा मदत निधी उभा करण्यात मामासाहेब अग्रेसर होते.मार्ग दाऊनि गेले आधी | दयानिधी संत ते |ह्याची आठवण ठेवून वै. दिगंबरअण्णा कवठे व वै बाबुराव शिंगण ह्यांनी स्थापन केलेले सोलापूरचे मामासाहेब दांडेकर सेवा मंडळ गेल्या साठ वर्षांपासून निष्ठेने सेवाकार्य रुजू करीत आहे. संस्थेचे अध्यक्ष बाबूशेठ तोष्णीवाल, गोविंदशेठ मुंदडा, सूर्यनारायण रघोजी, बाळकृष्ण कवठे आणि सर्व विश्वस्त नित्य आणि नैमित्तिक उपक्रम, उत्सवांचे माध्यमातून मामांच्या स्मृती जतन करीत आहेत!परी श्रुतिस्मृतींचे अर्थ | जे आपण होऊन मूर्त | अनुष्ठानें जगा देत | वडील जे जे || श्रीज्ञानेश्वरी १७.८६अशा प्राचार्य मामासाहेब दांडेकर ह्यांच्या निश्चयी, निःस्वार्थ आणि निष्कलंक सेवाकार्यास त्यांचे पुण्यस्मरण दिनानिमित्त लक्ष लक्ष प्रणाम !

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page