निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आमदार सुनील शेळके यांच्यावर आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी आजपर्यंत चार गुन्हे दाखल



मावळ मराठा न्युज :- तळेगाव,निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आमदार सुनील शेळके यांच्यावर आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी आजपर्यंत चार गुन्हे दाखल झाले आहेत. आमदार शेळके यांच्या ‘चमकोगिरी’च्या वागण्याला जनता थारा देणार नाही. आचारसंहितेच्या मर्यादा काय असाव्यात हे आमदारांना कळायला हव्यात. काल घडलेल्या लाजिरवाण्या घटनेत आमदार शेळके यांचे समर्थक सचिन मुऱ्हे यांच्या कार्यालयातून सुमारे ३६ लाखांची रोकड जप्त करण्यात आली. त्याबाबत चौकशी पूर्ण झाल्यानंतर आमदार शेळके यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची आम्ही मागणी करणार आहोत असे बाळा भेगडे म्हणाले. आमदार शेळके यांचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे बाळा भेगडे मावळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार सुनील शेळके यांच्याकडून प्रचारात धनशक्ती, गुंडगिरी, हुकूमशाही, दडपशाही यांचा सर्रास वापर सुरू आहे. आतापर्यंत आचारसंहिता भंगाचे चार गुन्हे त्यांच्यावर दाखल झाल्यामुळे त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे, अशी घणाघाती टीका माजी मंत्री बाळा भेगडे यांनी पत्रकार परिषदेत केली.तळेगाव दाभाडे येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत भेगडे बोलत होते. यावेळी काँग्रेसचे नेते रामदास काकडे, भाजपचे नेते गणेश भेगडे, माजी नगरसेवक आयुब सिकीलकर, कृष्णराव भेगडे पतसंस्थेचे माजी अध्यक्ष अंकुश भेगडे आदी उपस्थित होते.आमदार शेळके यांना पराभव दिसू लागल्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यामुळे ते निवडणुकीत गैरमार्गांचा अवलंब करत आहेत. मतदारांना प्रलोभने देण्याचा तसेच दमदाटी करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी चालविला आहे. मावळची सूज्ञ जनता अशा प्रकारांना थारा देणार नाही व शेळके यांना त्यांची जागा दाखवून देईल, असे ते म्हणाले.रामदास काकडे म्हणाले की, लोणावळा येथील परवाच्या अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांच्या प्रचार रॅलीमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होते. त्यावेळी आमदार शेळके यांनी आपला मार्ग बदलून सुज्ञपणा दाखवायला हवा होता; मात्र ते बालिशपणाने वागत असून जाणून-बुजून भांडण उकरून काढण्याचा हेतूनेच तो प्रकार होता. अशा गर्दीत शिरून धक्काबुक्की करत हुल्लडपणा करणे हा सूज्ञपणा नाही, असा टोला काकडे यांनी लगावला.विविध फंडे वापरून पैशांचे कितीही वाटप केले तरी मावळच्या जनतेने आता निवडणूक हातात घेतली आहे. त्यामुळे आमदार शेळके यांनी कितीही प्रयत्न केले तरी उपयोग नाही. जनशक्तीपुढे धनशक्तीचा निभाव लागणार नाही, असे गणेश भेगडे म्हणाले.लोणावळाकर नागरिक व पोलिसांनी अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळल्यामुळे मोठा वादंग टळला. त्याबद्दल काकडे यांनी त्यांना धन्यवाद दिले. आमदार शेळके यांना थोडा संयम ठेवून शांततेने प्रचार करावा, अशी विनंती देखील काकडे यांनी केली.




