“लोणावळा महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा,डॉ.राहुल परमणे यांचे संशोधनाची संधी,गरज यावर मार्गदर्शन”

मावळ मराठा न्युज -लोणावळा,२८ फेब्रुवारी २०२५ लोणावळा एज्युकेशन ट्रस्टच्या डॉ. बी. एन. पुरंदरे कला, श्रीमती एस. जी. गुप्ता वाणिज्य आणि श्रीमती एस. ए. मिठाईवाला विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. राहुल तानाजी परमणे यांनी उपस्थित राहून विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधनाच्या महत्त्वावर मार्गदर्शन केले.आपल्या प्रेरणादायी भाषणात डॉ. परमणे यांनी विज्ञान व तंत्रज्ञानाच्या मूलभूत तत्त्वांवर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, “मूलभूत आणि उपयोजित संशोधन यांच्यातील समतोल महत्त्वाचा आहे. गरज हीच संशोधनाची खरी प्रेरणा आहे.” विद्यार्थ्यांनी लहान स्तरावरून संशोधनाला सुरुवात करून जागतिक स्तरावर पुढे जाण्याची संधी शोधली पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.यावेळी त्यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे स्वप्नही आठवले. “संशोधन आणि नवोपक्रमाच्या जोरावर भारताने ज्ञान आणि आर्थिक महासत्ता होण्याचे स्वप्न डॉ. कलाम यांनी पाहिले होते. आजच्या तरुणांनी त्यांचा आदर्श घेऊन विज्ञानाच्या क्षेत्रात पुढे जाणे आवश्यक आहे.”कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख होते त्यांनी सर्वांना राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक मा. श्रीकृष्ण वर्तक उपस्थित होते. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विलास पाटील यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्त्व नमूद केले. या कार्यशाळेचे समन्वयक डॉ. मल्हारी नागटिळक यांनी कार्यक्रमाची सुरुवात करत राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या महत्त्वावर प्रकाश टाकला आणि प्रसिद्ध वैज्ञानिक सर सी. व्ही. रमण यांच्या योगदानावर सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस. एन. लबडे यांनी केले., प्रमुख अतिथींची ओळख डॉ. संदीप सोनटक्के यांनी करून दिली, तर आभार प्रदर्शन डॉ. नितीन बोडके यांनी केले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page