तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष नि नगरसेवक पदाच्या निवडणुकीत रंगत;अपक्षांना फक्त चार दिवसांचीच प्रचाराची संधी







मावळ मराठा न्युज -तळेगाव दाभाडे( श्रावणी कामत)येथील नगरपरिषदेच्या निवडणुकीत अधिकृत पक्षनिशाणी असलेल्या उमेदवारांना नामनिर्देशनासोबतच चिन्ह निश्चित मिळत असल्याने त्यांच्या प्रचाराला वेळेची मोकळीक असते. मात्र, अपक्ष उमेदवारांची खरी कसोटी आता सुरू झाली आहे. कारण, त्यांना मिळणाऱ्या प्रचाराच्या कालावधीवर मर्यादा येऊ लागल्या आहेत.शुक्रवारी नामनिर्देशन मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यानंतर अपक्ष उमेदवारांचे अर्ज निश्चित झाल्यानंतर ते आपल्या निवडणूक चिन्हांच्या प्रतीक्षेत आहेत. ही प्रतीक्षा २६ नोव्हेंबरपर्यंत कायम राहणार आहे. काही अपक्ष उमेदवारांनी अनौपचारिक प्रचार सुरू केला असला, तरी चिन्ह जाहीर झाल्यानंतर त्यांना नव्याने प्रचाराची आखणी करावी लागणार आहे.अपक्ष उमेदवारांना चिन्हवाटप २६ नोव्हेंबरला होणार असून त्यानंतर प्रत्यक्ष प्रचारासाठी केवळ चार दिवस (२७ ते ३० नोव्हेंबर) अशी अल्प मुदत मिळणार आहे. मतदारांपर्यंत प्रभावीरीत्या पोहोचण्यासाठी ही वेळ अतिशय कमी असल्याने अपक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी दुप्पट मेहनत घ्यावी लागणार असून प्रचारातील धावपळ शिगेला जाणार आहे.नगरपरिषद क्षेत्रातील २८ पैकी १९ जागा बिनविरोध राहिल्या असून उर्वरित ९ जागांसाठी चुरस वाढली आहे. एकूण २३ उमेदवार रिंगणात असून त्यात राष्ट्रवादी काँग्रेस चे६ भाजप चे ३ शिवसेना चे१ या पक्षांचे उमेदवार तसेच १३ अपक्षांचा समावेश आहे. नगराध्यक्षपदासाठी तिन उमेदवार रिंगणात उतरले आहे त्यामुळे या वेळची लढत अधिक चुरशीची होणार हे स्पष्ट आहे.दरम्यान, अपक्ष उमेदवारांची परिचयपत्रे तयार असली तरी त्यावर छापता येणाऱ्या अधिकृत चिन्हांचा उल्लेख नसल्याने ती परिचयपत्रे अपुरी ठरत आहेत. चिन्ह मिळेपर्यंत त्यांचा अधिकृत प्रचार वेग पकडू शकणार नाही. त्यामुळे काही अपक्षांना पुन्हा नवीन परिचयपत्रे तयार करण्याची वेळ येणार असल्याचे दिसते.अल्पावधीत मतदारांमध्ये ओळख निर्माण करणे आणि प्रचाराचे नियोजन नव्याने आखणे, ही अपक्ष उमेदवारांसमोरची मोठी धावपळ ठरणार आहे. निवडणूक रिंगणातील या रंगतीमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची निवडणूक अधिकच लक्षवेधी ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.



